Indian Railway General Knowledge: भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कच्या यादीत चौथ्या स्थानी येते. दिवसभरात लाखो प्रवाशांना परवडणाऱ्या दरात हजारो किलोमीटरचा प्रवास करण्याची संधी भारतीय रेल्वे देते. या रेल्वे नेटवर्कचा इतिहास सुद्धा तितकाच रंजक आहे. बहुतांश वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये या इतिहासाविषयी व रेल्वेच्या विविध महत्त्वाच्या पैलूंविषयी प्रश्न केले जातात. जरी तुम्ही अशा परीक्षांसाठी तयार करत असाल तर आज आम्ही भारतीय रेल्वे व जगभरातील विविध रेल्वे नेटवर्कविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. किंबहुना सामान्य ज्ञान म्हणूनही या गोष्टी आपल्याला माहित असायला हव्यात. GK Railway Questions: भारतीय रेल्वेबाबत १० मुख्य प्रश्न १) भारतातील सर्वात पहिल्या रेल्वेचा शुभारंभ कोणी केला होता? भारतात रेल्वे सेवा सुरु करण्याचे श्रेय हे लॉर्ड डलहौसी यांना जाते, त्यांनी १८५३ मध्ये पहिल्यांदा भारतात रेल्वेचा शुभारंभ केला होता. २) भारतातील पहिल्या ट्रेनने मुंबई ते ठाणे प्रवासात किती किमी अंतर पार केले होते? १६ एप्रिल १८५३ ला मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेल्या ट्रेनने तब्ब्ल ३४ किमी अंतर पार केले होते. ३) भारतातील सर्वात मोठ्या रेल्वे मार्गाची लांबी किती आहे? आसामच्या डिब्रूगढ़ पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वेमार्गाची लांबी ४,१८९ किमी इतकी आहे. ४) जगात पहिल्यांदा ट्रेनची सुरुवात कधी झाली? २७ सप्टेंबर १८२५ ला वाफेच्या इंजिनाच्या मदतीने ३८ डब्ब्यांची ट्रेन धावली होती. या ट्रेनमध्ये ६०० प्रवासी होते व त्यांनी लंडनच्या डार्लिंगटन पासून ते स्टॉकटोन पर्यंत ३७ मैलांचा प्रवास केला होता. ५) मैत्री एक्सप्रेस कोणत्या दोन देशातुन जाते? मैत्री एक्सप्रेस भारत व बांग्लादेश या दोन देशातून प्रवास करते. या एक्सप्रेसची सुरुवात १४ एप्रिल २००८ ला झाली होती. ६) भारतात सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन कोणती? तिचा प्रवास किती तासांचा असतो? देशात सर्वात लांब पल्ल्याचा प्रवास करणारी ट्रेन विवेक एक्सप्रेस आहे. जी डिब्रूगढ़ ते कन्याकुमारीअसा प्रवास ७६ तासात करते. या प्रवासात ४,१८९ किमी इतके अंतर पार केले जाते. ७) देशात पहिली बुलेट ट्रेन कुठे सुरु होणार आहे? देशातील पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास करणार आहे. ८) जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन कोणते? लिवरपूल स्ट्रीट स्टेशन, इंग्लंड हे जगातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन आहे. ज्याची स्थापना १५ सप्टेंबर १८३० ला झाली होती. ९) भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य काय आहे? भारतीय रेल्वेचे ब्रीदवाक्य आहे ‘राष्ट्र की जीवन रेखा म्हणजेच देशाची लाईफलाईन. हे ही वाचा<< ट्रेन स्टेअरिंग नसताना ट्रॅक कसा बदलते? भारतीय रेल्वेने Video मध्ये दाखवलेली प्रक्रिया बघून व्हाल चकित १०) भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे मार्ग आहेत? उत्तर प्रदेशात भारतातील सर्वाधिक रेल्वे मार्ग आहेत. अशाच नवनवीन माहितीसाठी लोकसत्ताच्या FYI पेजला नक्की भेट द्या.