India Longest Train : भारतात रेल्वे हे केवळ प्रवासाचे साधन नाही, तर कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. गावं-शहरं यांना जोडणाऱ्या लोकल, एक्स्प्रेसपासून हाय-स्पीड ‘वंदे भारत’सारख्या अनेक आधुनिक रेल्वेगाड्यांनी देशाचा चेहरामोहराच बदलून टाकला. पण या रेल्वेगाड्या लोकांना फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठीच नाही, तर देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती देतात. त्यात विशेषत: मालवाहतुकीत रेल्वेची भूमिका फार मोठी आणि महत्त्वाची आहे. कोळसा, धान्य, सिमेंटपासून अनेक मोठ्या यंत्रांपर्यंत सर्व काही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालगाड्यांद्वारे नेले जाते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, भारतात धावणाऱ्या अनेक ट्रेनपैकी सर्वांत लांब ट्रेन कोणती? तिला किती डबे आहेत आणि ती का बांधली गेली असेल? याच ट्रेनविषयी जाणून घेऊ…
भारतातील सर्वांत लांब ट्रेनविषयी फार कमी लोकांना माहीत असेल. सुपर वासुकी ट्रेन ही भारतातील सर्वांत लांब ट्रेन म्हणून ओळखली जाते. ही विशेषत: कोळसा वाहून नेण्यााठी डिझाइन करण्यात आली आहे. या ट्रेनला एकूण २९५ डबे आहेत, जे सहा शक्तिशाली इंजिनद्वारे खेचले जातात. या ट्रेनची इंजिनासह लांबी सुमारे ३.५ किलोमीटर आहे, जेव्हा ती ट्रेन एखाद्या रेल्वेस्थानकावरून पुढे जाते तेव्हा तिला संपूर्ण फलाट ओलांडण्यासाठी चार मिनिटे लागतात.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय रेल्वेने सुपर वासुकी लाँच केली. वीज प्रकल्पांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय कोळसा पोहोचवणे हा या मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनचा मुख्य उद्देश आहे. ही ट्रेन एकाच वेळी २७ हजार टन कोळसा वाहून नेऊ शकते, जो तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या वीज प्रकल्पाला वीजनिर्मिती करण्यासाठी एका दिवसाकरिता पुरेसा आहे.
ही ट्रेन कोणत्या मार्गावर धावते?
ही ट्रेन छत्तीसगडमधील कोरबा ते महाराष्ट्रातील नागपूरमधील राजनांदगावपर्यंत धावते. सुपर वासुकीला सुमारे २६७ किमीचा प्रवास करण्यासाठी ११ तास २० मिनिटांचा अवधी लागतो. ही ट्रेन पाच मालगाड्यांना जोडून तयार करण्यात आली आहे. तिची मालवाहतुकीची क्षमता सामान्य मालगाडीपेक्षा तिप्पट आहे.
ट्रेनचे डबे मोजण्यासाठी किती वेळ लागतो?
जर एखाद्या व्यक्तीने या ट्रेनचे डबे मोजत एकेक करून पुढे जायचे ठरवले, तर त्याला ट्रेनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास एक तास लागेल. यावरून ही ट्रेन किती लांबलचक आहे याचा अंदाज येईल.
नावामागे आहे हा पौराणिक अर्थ
सुपर वासुकी हे नाव हिंदू पौराणिक कथेवरून घेण्यात आले आहे. वासुकी हा सापांचा राजा होता, ज्याचा समुद्रमंथनात दोरी म्हणून वापर केला जात असे. या ट्रेनच्या नावातही तीच शक्ती, संयम आणि उदारता लपलेली आहे. त्यामुळे सुपर वासुकी ही फक्त ट्रेन नाही, तर ते भारतीय अभियांत्रिकीचे अदभुत उदाहरण आहे.