How to complete e kyc Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवून देण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती. ही योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी काल एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य शासन देत असल्याचं म्हणत सर्व लाभार्थी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन केलं आहे. त्यामुळं येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या योजनेतील १५०० रुपये यापुढेही मिळत राहावे, असे वाटत असल्यास ही प्रक्रिया करणे अनिवार्य असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया.

ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची? Ladki Babin Yojana E-KYC Step To Stop Process

१. लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.

२. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.

३. यात तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल.

४. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.

५. आधार प्रमाणीकरण संमती मधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, सध्या तांत्रिक कारणांमुळे पोर्टलवर ही प्रक्रिया पूर्णपणे सुरू झालेली दिसत नाहीये. मात्र, शासनाने लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाईल असे सांगितले आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी वेळोवेळी वेबसाइट तपासत राहावे आणि प्रक्रिया सुरू झाल्यावर तातडीने ती पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

यामुळे, योजनेच्या लाभासाठी पात्र नसलेल्या व्यक्तींना वगळण्यास मदत होईल आणि योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांपर्यंत पोहोचेल याची खात्री होईल.