Bajrang Punia Returns Padma Shri Award : भाजपाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. त्यांच्या निवडीनंतर कुस्तीपटूंमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भारताची महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली, यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली, बजरंग पुनिया याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते पत्र सोशल मीडियावरही शेअर केले. दरम्यान तो पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाण्यासाठी पोहोचला, मात्र यावेळी तिथे कर्तव्यावर असलेल्या दिल्ली पोलिसांनी त्याला अडवले. त्या निषेधार्थ तो पद्मश्री पुरस्कार पदपथावर ठेवून निघून गेला.

मात्र भारत सरकाराने दिलेला पद्म पुरस्कार परत करणारा बजरंग पुनिया हा पहिला व्यक्ती नाही , याआधीही अनेक विजेत्यांनी अशा घोषणा केल्या आहेत. त्यामुळे बजरंग पुनियाआधी कोणत्या व्यक्तींनी पद्म पुरस्कार परत देण्याची घोषणा केली होती यावर सविस्तर जाणून घेऊ….

mrunal thakur reveals she felt intimidated while working with Shahid Kapoor expert shares tips to overcome
मृणाल ठाकूरने सांगितले शाहिद कपूरबरोबर काम करताना दडपण येण्याचं कारण; वाक्यही न आठवण्याची स्थिती का आली?
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

स्वातंत्र्यानंतरचे सर्वात जुने उदाहरण द्यायचे झाले तर १९७४ मध्ये माजी खासदार ओपी त्यागी यांनी राज्यसभेत सांगितले होते की, स्वातंत्र्यसैनिक आशादेवी आर्यनायकम आणि सामाजिक कार्यकर्ते अमलाप्रोवा दास यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला आहे.

पत्रकार आणि लेखक खुशवंत सिंग यांना १९७४ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, मात्र त्यांनी १९८४ मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्लू स्टारच्या निषेधार्थ तो पुरस्कार परत केला होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित केले होते, १९८० ते १९८६ पर्यंत ते खासदार होते. त्यानंतर त्यांना २००७ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यानंतर रामकृष्ण मिशनचे स्वामी रंगनाथनंद यांनी देखील २००० साली हा पुरस्कार नाकारला, हा पुरस्कार त्यांना मिशनसाठी नव्हे तर वैयक्तिक म्हणून देण्यात आल्याने तो स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता.

इतिहासकार रोमिला थापर यांनीही दोनदा पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. एकदा १९९२ मध्ये आणि नंतर पुन्हा २००५ मध्ये त्यांनी हा सन्मान स्वीकरण्यास नकार दिला.

दरम्यान सप्टेंबर ते नोव्हेंबर २०१५ दरम्यान नरेंद्र मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना ३३ लेखक आणि विचारवंतांनी त्यांचे साहित्य अकादमी पुरस्कार परत केले. ९ सप्टेंबर रोजी हिंदी लेखक उदय प्रकाश यांनी त्यांच्या मोहनदास कादंबरीसाठी २०१० मध्ये मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार परत केला. हे सर्वजण प्रसिद्ध कन्नड लेखक एमएम कलबुर्गी यांच्या हत्येचा निषेध करत होते.

यानंतर जवळपास एक महिन्यानंतर लेखक नयनतारा सहगल, अशोक वाजपेयी पाठोपाठ लेखक कृष्णा सोबती आणि शशी देशपांडे यांनीही त्यांचे पुरस्कार परत केले. यावेळी नवनवीन लेखकांनी जवळपास दररोज आंदोलनात सहभागी होऊन पुरस्कार परत केले. पंजाबी लेखिका दलीप कौर तिवाना यांनीही त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत केला.

सईद मिर्झा, कुंदन शाह आणि दिबाकर बॅनर्जी आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकर आनंद पटवर्धन यांसारख्या दिग्दर्शकांनीही आपले राष्ट्रीय पुरस्कार परत केले. देशातील असहिष्णुतेच्या वाढत्या वातावरणाच्या निषेधार्थ आणि FTII विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ त्यांनी त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार परत केले. लेखकांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून या मोहिमेला सुरुवात केली होती, यामध्ये अनेक चित्रपट निर्माते आणि शास्त्रज्ञ देखील सहभागी झाले होते.

सर्वात अलीकडील उदाहरण द्यायचे झाले तर जानेवारी २०२२ मध्ये पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीआयचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांनी घोषणेच्या काही तासांनंतर पद्मभूषण नाकारला होता. त्यानंतर भट्टाचार्य केरळचे पहिले मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट आयकॉन ईएमएस नंबूदिरीपाद यांच्या पंक्तीत सामील झाले. या दोघांनी नरसिंह राव सरकारने दिलेला पद्मविभूषण पुरस्कार नाकारला होता.

दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी २०२० मध्ये मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात राज्यातील शेतकऱ्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पद्मविभूषण पुरस्कार परत केला होता.