अनेकजण प्रस्ताव आणि ठराव हे शब्द एकाच अर्थाने वापरतात. परंतु, या दोन्ही शब्दांचे अर्थ वेगवेगळे आहेत. तसेच हे शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरायला हवेत. काहीजण प्रस्ताव मांडला, ठराव मांडला असे वाक्प्रकार सर्रास वापरतात. अनेक शासकीय कार्यालये आणि संस्थादेखील ही चूक करतात. परंतु, प्रस्ताव हा शब्द माहिती देणे, प्रस्तुत करणे या अर्थाने वापरला जातो. तर प्रस्तावावर सर्व बाजूंनी विचार करून त्याला मान्यता दिली जाते किंवा नाकारली जाते. याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये लेखी नोंद केली जाते. त्याला ठराव मांडणे असे म्हटले जाते.

प्रस्ताव आणि ठराव हे दोन वेगवेगळ्या अर्थांचे शब्द आहेत. परंतु, बहुतेक जण ते वापरताना गल्लत करतात. प्रस्तु पासून प्रस्ताव हा शब्द तयार झाला आहे. प्रस्तु म्हणजे खरी माहिती देणे, असे केले तर योग्य होईल असं सूचित करणे. अर्थातच, एखाद्या गोष्टीची ‘पूर्ण कल्पना देऊन तसे केल्यास योग्य ठरेल’ अशी शिफारस करणे म्हणजे प्रस्ताव. त्यावर सर्व बाजूंनी विचार करून ती गोष्ट करावी की न करावी हे ठरविणे, तसे करण्यास किंवा न करण्यास मान्यता देणे, तशी लेखी नोंद करणे म्हणजे ठराव. सार्वजनिक संस्थांत असे ठराव अनेक होतात, पण त्यावर काहीच कार्यवाही होत नाही हा तर आपला नित्याचा अनुभव. ‘कहाणी शब्दांची: मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी हा अर्थ दिला आहे.

तमिळनाडू विधानसभेने गेल्या आठवड्यात केंद्राच्या प्रस्तावित ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ धोरणाविरोधात ठराव मंजूर केला आहे. ही बातमी प्रस्ताव आणि ठराव शब्दाचा नेमका अर्थ स्पष्ट करते. प्रस्ताव आणि ठराव शब्दाचा वापर कुठे केला जातो? याबाबतचं हे एक उत्तम उदाहरण आहे.

केंद्रातलं मोदी सरकार एक राष्ट्र एक निवडणूक या धोरणावर गेल्या काही महिन्यांपासून काम करत आहे. अशातच तमिळनाडू विधानसभेने गेल्या आठवड्यात केंद्राच्या प्रस्तावित ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ धोरणाविरोधात ठराव मंजूर केला. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी हा ठराव मांडला. त्यानंतर हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. ‘एक राष्ट्र एक निवडणूक’ हा केंद्र सरकारचा एक प्रस्ताव आहे. केंद्राचे हे पाऊल लोकशाहीच्या विरोधात, अव्यवहार्य आहे आणि ते भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केलेले नाही, असे या ठरावात म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने त्याची अंमलबजावणी करू नये, असं आवाहन केलं आहे.

हे ही वाचा >> रजा अन् नोकरी! माणसाच्या आयुष्यात रजा हा शब्द नेमका कुठून आला ? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्हालाही ही माहिती नव्याने समजली असेल तर तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला नक्की शेअर करा. तसेच जी व्यक्ती प्रस्ताव आणि ठऱाव या शब्दात गल्लत करत असेल त्या व्यक्तीला तर आठवणीने शेअर करा.