Gold Buying Tips: सर्वत्र सणांचा हंगाम सुरू झाला आहे. अशावेळी तुम्ही बाजारात सोने खरेदी करायला गेलात तर कोणते सोने घेणे चांगले असा प्रश्न नक्कीच मनात येतो. २२ कॅरेट आणि २४ कॅरेट असे विविध प्रकारचे सोने बाजारात उपलब्ध आहे. पण बऱ्याच जणांना या दोघांमधील अर्थ माहीत नसतो. तर, आज आम्ही तुम्हाला २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामधील फरक सांगणार आहोत. तसंच सोने गुंतवणूकीसाठी या दोघांपैकी कोणता पर्याय चांगला याबदल देखील जाणून घेऊया..
सर्वात आधी जाणून घेऊया कॅरेट म्हणजे काय?
कॅरेट किंवा के हा शब्द सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरला जातो. वास्तविक, कॅरेट हे एक युनिट आहे जे सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाते. कॅरेटचे मूल्य जितके जास्त असते तितकी सोन्याची शुद्धता जास्त असते. सोन्याच्या शुद्धतेची मोजमाप ० ते २४ या स्केलच्या प्रमाणात केले जाते. त्याप्रमाणात २४ कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध मानले जाते.
२४ कॅरेट सोने म्हणजे काय?
२४ कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. याचा अर्थ यामध्ये त्यात इतर कोणत्याही धातूची भेसळ नाही. याला ९९.९९% टक्के शुद्धतेचे सोने म्हटले जाते आणि त्याचा रंग विशेष पिवळा आणि चमकदार असतो. २४ कॅरेट पेक्षा जास्त सोन्याचा प्रकार नसतो. त्यामुळे हे सोने २२ कॅरेट सोन्यापेक्षा महाग आहे. हे खूप मऊ आणि नाजूक असते आणि सामान्य दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. हे इलेक्ट्रॉनिक आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये देखील वापरले जाते.
२२ कॅरेट सोने म्हणजे काय?
२२ कॅरेट सोने म्हणजे सोन्याचे २२ भाग आणि उरलेले दोन भाग इतर धातूंचे दागिन्यांमध्ये मिसळले जातात. हे सोने साधारणपणे दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. २२ कॅरेट सोन्यात फक्त ९१.६७ टक्के शुद्ध सोने असते. इतर ८.३३ टक्के मध्ये चांदी, निकेल, जस्त आणि इतर मिश्रधातू मिश्रित असतात. या मिश्रधातूंच्या भेसळीमुळे हे सोने कठीण बनते आणि त्यापासून बनवलेले दागिने अतिशय टिकाऊ असतात.
( हे ही वाचा; ‘हा’ आहे जगातील शेवटचा रस्ता, जिथे लोकांना एकट्याने जाण्यास परवानगी नाही)
२२ कॅरेट की २४ कॅरेट? सोने गुंतवणुकीचा योग्य मार्ग कोणता?
भारतात लोकं गुंतवणूकीच्या उद्देशाने किंवा दागिने बनवण्यासाठी सोने खरेदी करतात. तर गुंतवणूकीच्या दृष्टीने २४ कॅरेट सोने हा योग्य पर्याय आहे कारण त्यामध्ये ९९.९% सोने असते. २४ कॅरेट सोने टिकाऊ किंवा नाजूक असले तरीही २२ कॅरेट सोन्यापेक्षा त्याचे मूल्य जास्त असते. त्यामुळेच २४ कॅरेट सोने खरेदी करताना त्याची शुद्धता तपासण्यासाठी हॉलमार्क प्रमाणपत्र तपासा. तसंच सोने खरेदी करताना बीआयएस हॉलमार्क असलेल्या ज्वेलर्सकडून सोने खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो.
दागिने बनवण्यासाठी कोणते सोने चांगले?
दागिने बनवण्यासाठी २२ कॅरेट सोने सर्वोत्तम आहे. २४ कॅरेटमध्ये बनवलेले दागिने हे मऊ असतात. त्यामुळे ते सहजपणे तुटू शकतात. २२ कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी चांगले आहे कारण यात तांबे, चांदी, जस्त हे इतर धातूही मिसळले जातात. ज्यामुळे ते कठीण होते आणि टिकाऊ देखील बनते.