रस्त्यावर असलेलं झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रस्ता क्रॉस करताना लागणाऱ्या पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्या. या काळ्या पट्ट्या आणि झेब्र्यासारख्या दिसत असल्याने त्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग असं नाव पडलं. मात्र हाच रंग का असतो? त्या जागी वेगळा रंग का वापरला जात नाही? या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
वाढते अपघात रोखण्यासाठी सुरु झालं झेब्रा क्रॉसिंग
३१ ऑक्टोबर १९५१ या दिवशी ब्रिटनमध्ये झेब्रा क्रॉसिंग पहिल्यांदा आखण्यात आलं. रस्ता ओलांडत असताना लोकांचे अपघात वाढल्याने हे पाऊल उचलण्यात आलं. त्याआधी रस्ता ओलांडायचा असेल तर मेटल स्टँड लावले जात असत. मात्र १९४८ मध्ये यावर चर्चा झाली आणि रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगच्या रेषा आखण्यास पहिल्यांदा ब्रिटनमध्ये सुरुवात झाली.
झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या या काळ्या पांढऱ्याच का?
झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या काळ्या पांढऱ्या असतात याचं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे डांबरी रस्त्यावर पांढरा रंग पटकन दिसतो. त्यामुळे लांबून येणाऱ्या चालकालाही वाहनाची गती कमी करण्यास वेळ मिळतो. मुंबई, दिल्ली, कोलकातासह महत्त्वाच्या शहरांमध्ये झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्या या मोठ्या आकारात दिसतात. तर बाकी शहरांमध्ये या रेषा काहीशा छोट्या आकारांमध्ये दिसतात. मात्र पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या या दुरुनही दिसाव्यात म्हणूनच त्या आखल्या जातात.
काळ्या पांढऱ्या या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग नाव कसं पडलं?
ब्रिटिश खासदार जेम्स कॅलाघन यांच्या डोक्यात काळ्या पांढऱ्या पट्ट्या रस्त्यावर असाव्यात ही संकल्पना आली. आपण याला झेब्रा रंगसंगती म्हणू शकतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यामुळे या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग असं म्हटलं जातं.
झेब्रा क्रॉसिंगचा नियम काय?
झेब्रा क्रॉसिंगचा महत्त्वाचा नियम हा आहे की जेव्हा सिग्नल लाल असतो तेव्हा चालकाने त्याची कार, बाईक किंवा कुठलंही वाहन हे झेब्रा क्रॉसिंगच्या अलिकडे थांबवलं पाहिजे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणं सुकर होतं. एखाद्या चालकाने जर झेब्रा क्रॉसिंगवर म्हणजेच या पांढऱ्या पट्ट्यांवर वाहन उभं केलं तर त्याला दंडही भरावा लागू शकतो.
थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग
ठाण्यात २०१६ मध्ये थ्रीडी झेब्रा क्रॉसिंगचा प्रयोग करण्यात आला. अभियंता अरविंद इताडकर यांनी हे थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग सुरू केलं. परदेशातही अनेक शहरांमध्ये अशा प्रकारचं थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग आहे. सपाट रस्त्यांवर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे काढून त्या पट्ट्यांना समांतर, असा तिरकस पिवळ्या रंगाचा पट्टा आखला जातो. लांबून पाहिल्यास रस्त्यावर उंचवटा असल्याचा भास होतो. त्यामुळे वाहनचालक आपल्या वाहनाचा वेग कमी करतात.
झेब्रा क्रॉसिंगचे प्रकार
एका रिपोर्टनुसार काही देशांप्रमाणे रस्त्यांवरच्या या पट्ट्यांचे रंग बदलतातही. स्पेनमध्ये एक शहर आहे तिथे पट्ट्यांऐवजी पोलका डॉट्स असतात. तिथल्या गायींच्या त्वचेवर असे डॉट्स असतात. त्यामुळे तिथे या क्रॉसिंगला ‘काऊ क्रॉसिंग’ असं म्हटलं जातं. हाँगकाँगमध्ये रस्त्यावर पिवळ्या पट्ट्या असतात त्यामुळे त्याला ‘टायगर क्रॉसिंग’ही म्हटलं जातं.