दिवसभर थकल्यानंतर प्रत्येकालाच रात्रीची शांत झोप ही हवी असते. निरोगी राहण्यासाठी चांगली झोप ही आवश्यक आहे. परंतु आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण झोपेशी संबंधित समस्यांना बळी पडत आहेत. या परिस्थिती लोकांना झोपेचे महत्व समजावे आणि झोपेशी संबंधित विविध समस्यांवर मात करता यावा यासाठी दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो. यावर्षी १७ मार्च रोजी म्हणजे आज जगभरात वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जात आहे. पण हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय? महत्व आणि यंदाची थीम नेमकी काय आहे? जाणून घेऊ…

‘वर्ल्ड स्लीप डे’ साजरा करण्याचा मागचा उद्देश?

अपुऱ्या झोपेमुळे आपल्याला अनेक आजारांना बळी पडावे लागत आहे, अशा परिस्थितीत झोपेशी संबंधीत समस्या रोखण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने ‘वर्ल्ड स्लीप डे’ सुरु केला आहे. हा दिवस पहिल्यांदा २००८ मध्ये साजरा करण्यात आला. जगभरातील ८८ पेक्षा जास्त देशांमध्ये वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो. झोपेच्या मूल्याविषयी जागरुकता निर्माण करणे आणि झोपेशी संबंधित विविध समस्यांचे निराकरण करणे हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे.

या दिनानिमित्त पुरेशी झोप का गरजेची असते याचे महत्त्व जगभरात पटवून सांगितले जाते. यासह एपनिया, निद्रानाश आणि झोपेसंबंधीत इतर आजारांची आणि परिस्थितीतीची माहिती दिली जाते. यात झोपेच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास आणि झोपेच्या सुधारित सवयींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जगभरातील लोक सेमिनार, कार्यशाळा आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा करतात.

‘वर्ल्ड स्लीप डे’ची यंदाची थीम

दरवर्षी कोणत्या ना कोणत्या थीमवर हा दिवस साजरा केला जातो. त्याप्रमाणे यंदाची वर्ल्ड स्लीप डेनिमित्त एक खास थीम ठेवण्यात आली आहे. या वर्षाची थीम आहे ‘झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे’. चांगले आरोग्य राखण्यासाठी यंदा झोपेच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वर्ल्ड स्लीप डे’चे महत्व

वर्ल्ड स्पील डे महत्त्वाचा आहे कारण यानिमित्ताने झोपेचे मूल्य आणि त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दल जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. यानिमित्ताने वैद्यकीय तज्ञ आणि संस्थांना झोपेशी संबंधित आजारांविषयी संवाद साधण्याची, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याची आणि झोपेच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहित करण्याची संधी मिळते.