प्रवासी बस, एस.टी. बस, परिवहन सेवेची बस, स्कूल बस, ऑटो रिक्षा, काळी पिवळी टॅक्सी, टुरिस्ट टॅक्सी ही वाहने चालविण्यासाठी परवाना तसेच बॅज असणे आवश्यक असते.
बॅजचा अर्थ सार्वजनिक सेवा वाहन चालवण्यासाठीची परवानगी होय. बॅज शिवाय व्यावसायिक प्रवासी वाहन चालवताना आढळल्यास वाहनाच्या मालकाला आणि चालकाला शिक्षा होते तसेच वाहन मालकाच्या परमिटवर निलंबनाची कारवाई होते .
बॅज मिळण्यासाठी आरटीओ कार्यालयात परीक्षा घेण्यात येते.  या परीक्षेमध्ये  महाराष्ट्र मोटार वाहन नियमामध्ये सार्वजनिक सेवा वाहनाच्या चालकाने कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात त्याचे विवेचन असते. या नियमाची उमेदवारास माहिती असल्याबाबत खात्री केली जाते.  
ऑटो रिक्षा तसेच काळी पिवळी टॅक्सी परवाना  मिळणेसाठी एक महत्त्वाची पूर्व अट म्हणजे उमेदवाराकडे बॅज असायला पाहिजे.
ऑटो रिक्षा बॅज, टॅक्सी आणि बस बॅज यासाठी ज्या वर्गाचा बॅज पाहिजे त्या वर्गाचे ट्रान्सपोर्ट लायसेन्स असणे आवश्यक असते. ट्रान्सपोर्ट लायसेन्ससाठी वयाची २० वष्रे पूर्ण झालेली असणे आवश्यक असते. तसेच शिक्षण आठवी पास असणे आवश्यक असते. ऑटो रिक्षा बॅज आणि टॅक्सी बॅज यासाठी वेगळ्या अनुभवाची आवश्यकता नसते. मात्र बस बॅजसाठी दोन वर्षांच्या अनुभव असणे आवश्यक असते. बॅजची परीक्षा देणाऱ्या उमेदवाराचा चरित्र्य पडताळणी अहवाल पोलीस विभागाकडून येणे आवश्यक असते. म्हणजे उमेदवाराच्या विरोधात पोलीस केस नसावी.  
सर्वात महत्त्वाची अट म्हणजे बॅज काढण्यासाठी महाराष्ट्र राज्यात १५ वष्रे रहिवास असल्याचा दाखला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणे आवश्यक असते.
संजय डोळे,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे