तुम्ही नाटय़गृहात जाता- तिसरी घंटा- संपूर्ण काळोख – पाश्र्वसंगीताच्या तालावर नकळत पडदा उलगडलेला असतो- समोरच्या अंधाराला चिरत प्रकाशाचा तीव्र झोत तुमच्या आवडत्या कलाकारांवर पडतो- तुम्ही त्या नाटकात शिरता – त्या नाटकाचे होऊन जाता- आता नाटक आणि तुम्ही यात कोणीही नसतं. या सर्वामध्ये योग्य वेळी पडणारा प्रकाश नसेल तर? प्रकाशाची उपयुक्तता ही अशी सिद्ध होते.. तीच दाखवत गेली २७ वर्षे ‘एक शक’, ‘तू तर चाफेकळी,’,‘हाच खेळ उद्या पुन्हा’, असा मी असा मी’,‘चंद्रपूरच्या जंगलात’, ‘लोच्या झाला रे’,‘तुंबारा’, ‘एका लग्नाची गोष्ट’,‘ हा शेखर खोसला कोण?’ आदी नाटकाद्वारे रंगभूमी गाजवणाऱ्या, विविध पुरस्कार पटकावणाऱ्या प्रकाशयोजनाकाराविषयी..

अ‍ॅण्ड गॉड सेड, ‘लेट देअर बी लाइट.’ अ‍ॅण्ड देअर वॉज लाइट’ हाच प्रकाशाचा उगम आहे. ही धार्मिक समजूत असली तरी ४.५ अब्ज वर्षांपूर्वी सौरप्रणालीमध्ये वायू आणि धुळीच्या ढगांची निर्मिती झाली आणि तेच पुढे प्रकाशाच्या मूळ स्रोताचे (सूर्याचे) उगम स्थान झाले. अगदी सुरुवातीचे नाटक याच सूर्यप्रकाशाच्या नजरेसमोर होत होतं. इजिप्शियन लोकांची ‘रे’ ही प्रकाश देवता, ड्रॅगनरूपी, अंधाराचा नायनाट करीत पृथ्वीवर येते आणि कलाकारांना प्रोत्साहन देते हा समज होता.
रात्रीच्या वेळी मशाली, तेलदिवे, मेणबत्त्या, शेकोटय़ा यांच्या उजेडात नाटकं सादर होत. ग्रीक, रोमन थिएटर्स, या सर्वाचा विचार करूनच उभी केली होती. १५८० ते ८४ या काळात पहिलं कायमस्वरूपी क्लासिक थिएटर उभं राहिलं. जे अजूनही इटलीमध्ये ठामपणे उभे आहे. प्रबोधन काळात नाटय़निर्मितीच्या प्रवासात प्रकाशयोजना या संकल्पनेचा प्रथम विचार झाला. आणि अर्थातच पुढे विजेच्या वापरामुळे रंगमंच प्रकाश योजनेत खूप बदल झाले. विविध उपकरणांच्या साहाय्याने प्रकाशयोजना नाटकाच्या उपयोगी पडू लागली. वेगवेगळे प्रयोग होऊ लागले ते बघायला लोक गर्दी करू लागले. भारतीय रंगभूमीवर देखील तापस सेन या विख्यात प्रकाश योजनाकाराने थक्क करणारे प्रयोग केले. मखमली पडद्याआड जे नाटक बघायला प्रेक्षक आतुर असतात ते नीट दिसावं हे प्रकाशयोजनेचं काम! तुम्ही नाटय़गृहात जाता-थंड हवेचे शिडकावे घेत खुर्चीवर रेलता- तिसरी घंटा- संपूर्ण काळोख – पाश्र्वसंगीताच्या तालावर नकळत पडदा उलगडलेला असतो- समोरच्या अंधाराला चिरत प्रकाशाचा तीव्र झोत तुमच्या आवडत्या कलाकारांवर पडतो- तुम्ही त्या नाटकात शिरता – त्या नाटकाचे होऊन जाता- आता नाटक आणि तुम्ही यात कोणीही नसतं. या सर्वामध्ये योग्य वेळी पडणारा प्रकाश नसेल तर? प्रकाशाची उपयुक्तता ही अशी सिद्ध होते..

Emotional fan hugs Atif Aslam during live concert kisses his hands singers response viral video
चाहती अचानक स्टेजवर आली, मिठी मारली, हाताचं चुंबन घेतलं अन्…; प्रसिद्ध गायकाने केलं असं काही की… पाहा VIDEO
desi jugaad video man prepare solar bike with 200 km range harsh goenka share video
ना पेट्रोल, ना वीज! तरुणाने जुगाडद्वारे बनवली ७ सीटर सोलर बाईक; VIDEO पाहून हर्ष गोयंका अवाक्, म्हणाले, क्या होगा उनका?
spruha joshi new serial sukh kalale starts from 22 april
Video : स्पृहा जोशीचं छोट्या पडद्यावर कमबॅक! ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार नवी मालिका, सेटवरून शेअर केला खास व्हिडीओ
73 Years Old Man voice Leaves Singer Shaan speechless and Anand Mahindra Got Impressed
प्रसिद्ध गायक शान अन् ७३ वर्षीय आजोबांची जुगलबंदी, VIDEO पाहून आनंद महिंद्राही झाले इम्प्रेस; म्हणाले,
नाटक- 'ढोलताशे'
नाटक- ‘ढोलताशे’

नाटकाचं आकर्षण मला बऱ्याच आधीपासून होतं. आम्ही सोलापूरला होतो. अलिबागला होतो. तेव्हापासनं नाटक बघितलीत. त्या गावात सणासुदीला जावं तसे लोक नाटकाला जात. थिएटरमधलं वातावरण, धुंद वास, बंद पडद्याआड काय दडलंय याची लोकांत चाललेली चर्चा, तीन घंटा, तिसऱ्या घंटेबरोबर मंद होणारा प्रकाश आणि नंतर उजळत जाणाऱ्या रंगमंचावर पात्रांची नजरबंद पेशकश याचं मला वेड होतं पण शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाशिवाय कोणतीच संधी नाटकं करण्यासाठी उपलब्ध नव्हती. ती संधी नरसी मोनजी महाविद्यालयात आणि नंतर ‘माध्यम’ या हौशी नाटय़संस्थेत उपलब्ध झाली. तिथे अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, बॅकस्टेज, मिळेल ते करावं लागायचं. आमच्या ‘माध्यम’ संस्थेत सर्व जण होते- लेखक, दिग्दर्शक, कलाकार, संगीतकार, नेपथ्यकार, जबरदस्त ताकदीचे होते. मात्र प्रकाशयोजनेच्या बाबतीत आम्ही पूर्णपणे बाहेरच्या व्यक्तींवर अवलंबून होतो. पैसे मोजून त्या माणसाला आमची संस्था बोलावत असे. मग त्यांचे नखरे. दिलेल्या वेळी तालमीला न येणं या गोष्टी घडत होत्या. त्याचा परिणाम नाटय़प्रयोगावर होत असे. एका नाटकाचा स्पर्धेसाठीचा प्रयोग होता. त्यात मी छोटीशी भूमिका करीत होतो. आमचा प्रकाशयोजनाकार आलाच नाही. दोन प्रवेश सोडले तर मला बाकी काहीच काम नव्हतं. मी त्या दिवशी त्या नाटकाची प्रकाशयोजना केली, मला बक्षीस मिळालं आणि संस्थेला त्यांचा हक्काचा प्रकाशयोजनाकार मिळाला. नंतर लगेच राज्यनाटय़ स्पर्धेत केलेल्या नाटकाच्या प्रकाशयोजनेला बक्षीस मिळालं.
हे सर्व घडत असताना माझे मार्गदर्शक होते महेंद्र जोशी आणि डॉ. अनिल बांदिवडेकर. एन. एम. कॉलेजच्या एकांकिकांच्या प्रकाशयोजनेतील माझा सहभाग बघून महेंद्रने मला त्याच्या ‘एक शक’ या हिंदी नाटकाची जबाबदारी दिली. मानसोपचारतज्ज्ञ व त्याचा रुग्ण यांच्यातील नाटय़पूर्ण संघर्षांचा वेध घेणारं हे नाटक. नेपथ्याचा खूप पसारा नव्हता त्यात, पण मर्यादित रंगमंचीय घटकांच्या साहाय्याने दृश्यसंकल्पना निर्माण करण्यात महेंद्र वाकबगार होता. डॉक्टर, रुग्ण यांच्यातील सेशन्स, व रुग्णाची उलगडत जाणारी मनोवस्था, हे प्रकाशयोजनेच्या मदतीने आम्ही उभं केलं. डॉक्टर व रुग्णाची भावावस्था प्रभावीपणे उभी करण्यासाठी रंगांचा वापर कसा करायचा, यासाठी हे नाटक आदर्श आहे. रंगांचा बेधडक पण समर्पक वापर करण्याची महेंद्रची परवानगी असे. त्यानंतर महेंद्रचे ‘खेलय्या’ (गुजराती) नाटक मी केलं. ही मुक्त नाटय़ स्वरूपातली सांगीतिका होती. प्रेम, मिलन, गैरसमज, जुदाई आणि पुनर्मिलन हे या प्रेमकथेचं सूत्र होतं. यातही जुजबी नेपथ्यामुळे प्रकाशयोजना खूप महत्त्वाची ठरत होती. प्रेमकथेतले वेगवेगळे मुड्स, गीत-संगीताच्या साहाय्याने सादर होत होते. त्यात सप्तरंगी प्रकाशयोजनेमुळे बहार येत होती. महेंद्रचं पुढचं नाटक होतं ‘ताथैया’. याला मात्र महेंद्रनं सांकेतिक पण पृथ्वी थिएटरच्या अवकाशला भेद देणारं नेपथ्य उभं केलं होतं- भवई लोककलेचा आधार घेऊन सादर होणाऱ्या या नाटकात सुसंगत गाणी तर होतीच पण घर, पोटमाळा, स्मशान, रस्ता ही स्थळंदेखील होती. हे सर्व ठाशीवपणे दाखवण्यासाठी प्रकाशाचा पुरेपूर वापर मी करायचो. क्षणार्धात नाटकाचा आकृतिबंध बदलायची कामगिरी या तीनही नाटकात प्रकाशयोजना करीत असत. ही तीनही नाटकं पृथ्वी थिएटर आणि एन.सी.पी.ए. या नाटय़गृहात प्रामुख्याने सादर होत. त्या काळातली आधुनिक उपकरणं तिथे उपलब्ध होती. आजही आहेत. प्रकाशाचे असंख्य स्रोत तिथे उपलब्ध होतात. वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं हाताळायला मिळत. माझ्या सुरुवातीच्या काळात या दोन सुसज्ज नाटय़गृहात मला काम करायला मिळालं, हे माझं नशीबच. या दोन नाटय़गृहांतील रंगमंचीय अवकाशाचा महेंद्र जोशी चातुर्याने उपयोग करत असे आणि हे करण्यासाठी मी केलेली प्रकाशयोजना खूप महत्त्वपूर्ण ठरत होती. त्याबाबतीत महेंद्र कोणतीही तडजोड करत नसे.
महेंद्र जोशी अकाली हे जग सोडून गेला. सशक्त भारतीय नाटकाची जागतिक पातळीवर दखल घ्यायला भाग पाडण्याची ताकद त्याच्या नाटकांमध्ये होती. पण त्याच्या अचानक जाण्यानं त्याचं नाटक तिथेच थांबलं. याच काळात एन एम महाविद्यालय आणि ‘माध्यम’ या संस्थेमधून डॉ. अनिल बांदिवडेकर नाटकं करायचा. अनिलने मी केलेलं ‘खेलैया’ पाहिलं होतं. म्हणून त्याने मला त्याच्या ‘किमयागार’ या सांगीतिकेची जबाबदारी दिली. ही दोन्ही नाटकं ‘फॅन्स्टास्टिक’या ब्रॉडवेवरच्या सुपरहिट नाटकावर आधारित होती. ‘किमयागार’ हे नाटक प्रोसीनियम रंगमंचावर होणार होतं. ‘खेलैया’पेक्षा त्याच्या नृत्यरचनेत व नेपथ्यात खूप बदल झाले. साहजिकच प्रकाशयोजनेतही खूप बदल करावे लागले. त्यात हे नाटक हौशी नाटय़ संस्था स्पर्धेत करणार असल्यामुळे बजेटचा प्रश्न होताच. पण डॉ. अनिलदेखील नाटकाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाहीत. ‘खेलैया’ला मी डोक्यातून पूर्णपणे बाजूला ठेवून या मराठी प्रेमकथेला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
पूर्ण नाटकाला एक फ्रेश लुक दिला. प्रोसीनियममध्ये स्रोताच्या मर्यादा असल्या तरी सोबतीला रंग आणि रंगछटा होत्या. नाटकातला पॉझिटिव्ह मूळ प्रकाशयोजनेच्या साहाय्याने दृश्यसंरचनेत आणला तर योग्य प्रभाव पडेल याची खात्री होती. आपण हे नाटक स्पर्धेत न करता, व्यावसायिक रंगभूमीवरच करत आहोत याचा फील देऊन डिझाइन करायचं हे मी पक्कं केलं होतं. मराठी रंगभूमीवरचं माझं अशा तऱ्हेचं हे पहिलंच नाटक होतं. याचं डिझाइन फसलं असतं तर पुढची वाट बंद झाली असती. पण नाटकाच्या परिणामकारकतेत भर घालणारी प्रकाशयोजना आहे, हे बऱ्याच बुजुर्ग तज्ज्ञांनी मला आवर्जून सांगितले. आजही मी नाटकाला डोईजड होईल, नाटकावर उलटा परिणाम करील, असं डिझाइन करत नाही.
‘किमयागार’नंतर २ वर्षे गेली. आमच्या अशाच एका नाटकाचा पाल्र्यात प्रयोग होता. तो पाहायला प्रदीप मुळे आला होता. प्रयोगानंतर मला म्हणाला, ‘‘कधी तरी आपण एकत्र काम करू.’’ मी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. स्वत: उत्तम डिझानयर असलेला प्रदीप एखाद्या नवख्याबरोबर का काम करेल? पण दोन वर्षांनंतर प्रदीपने मला तो नेपथ्य करत असलेल्या ‘हाच खेळ उद्या पुन्हा’ या नाटकाची जबाबदारी दिली. हे नाटक वास्तव आणि फ्लॅशबॅक या दोन स्तरांवर बांधलेलं होतं. त्याला थोडा फॅन्टसीचा देखील टच होता. नेपथ्यातील एकच स्थळ वेगवेगळ्या काळात व रूपात दाखवायचं होतं आणि ते एक आव्हानच होतं. कारण पूर्ण वेळ एक प्रसंग एकाच रंगात सादर केला असता तर ते ओंगळवाणं दिसलं असतं. त्या दृश्याला साजेशा सूचक रंगानं दृश्याची सुरुवात करून नंतर योग्य प्रमाणात पांढऱ्या शुभ्र प्रकाशात नाटक व्हावं असं मी ठरवलं. प्रसंगाला व दृश्याला अनुरूप असा अ‍ॅम्बियन्स तयार करून प्रेक्षकाला नाटकात नेऊन सोडायचं आणि नंतर कलाकारांचा अभिनय नीट दिसेल अशा प्रकाशात नाटक पुढे न्यायचं, हे तंत्र नंतर मला व्यावसायिक रंगभूमीवर काम करताना खूप उपयोगी पडलं.
या हौशी नाटकानंतर गोवा हिंदूनं मला त्यांचं व्यावसायिक नाटक ‘तू तर चाफेकळी’ हे दिलं. बालकवींचे व्यक्तिगत जीवन त्यांच्या कवितेतला निसर्ग आणि त्यांचा अपघाती मृत्यू हे सर्व प्रकाशयोजनेच्या मदतीने ठाशीवपणे मांडायचं होतं. वैविध्यपूर्ण प्रकाशयोजनेला वाव असलेलं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर करायला मला मिळालं. हे माझं भाग्य.’’ बालकवींचे संघर्षपूर्ण जीवन निसर्गाच्या रंगांची उधळण आणि अपघाती शेवट हे सर्व प्रकाशयोजनेच्या साहाय्याने व्यावसायिक रंगभूमीवर समर्थपणे सादर करता येतं याचा मला आणि समकालीन तंत्रज्ञांना विश्वास देऊन गेला.
प्रदीप मुळेनी ‘राजा सिंह’ हे नाटक व्यावसायिक बालनाटय़ म्हणून सादर केलं. जंगल, त्यातले प्राणी, त्यांच्यातला संघर्ष, जंगलात झिरपणारा प्रकाश, प्राण्यांमधल्या लढाया आणि नाटकातली नृत्यरचना यासाठी प्रकाशयोजना खूप महत्त्वाची होती. बालरंगभूमीवर अशा तऱ्हेचे कुठलेही तांत्रिक तडजोडी न करता सादर केलेलं नाटक तोपर्यंत आलंच नव्हतं. प्रकाशयोजनेचे वेगवेगळे इफेक्टस हे या नाटकाचे वैशिष्टय़.

नाटक- 'चंद्रपूरच्या जंगलात'...
नाटक- ‘चंद्रपूरच्या जंगलात’…

यानंतरचं नाटक होतं. ‘सुयोग’ निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘असा मी असा मी’ विनोदी नाटक किंचित फॅन्टसीचा टच, शेवटाकडे काही भावपूर्ण प्रसंग अशी या नाटकाची रचना आहे. नायकाच्या बापाच्या भुताची ‘एन्ट्री’ झाली की पाश्र्वसंगीताच्या तालावर संपूर्ण रंगमंच वेगळ्या रंगाच्या प्रकाशात उजळून जाई आणि त्याच्या ‘एग्झिट’ बरोबर प्रकाश पूर्ववत होई. पण हे सर्व करताना, नाटकाचा विनोदी बाज लक्षात ठेवावा लागत असे. या नाटकाच्या थोडं आधी, चेतन दातारने मला त्याचं ‘चंद्रपूरच्या जंगलात’ हे नाटक दिलं. नाटकातील नाटक हा नाटकाचा फॉर्म होता आणि पात्र फक्त दोन. प्रकाशाचा झोत रंगमंचाच्या मध्यभागी असलेल्या टेबलातून येत असे व खालच्या बाजूने कलाकारांवर पडत असे त्यामुळे कलाकारांची वेगळी प्रतिमा तयार होत असे. जी त्या नाटकाची गरज होती. असाध्य रोग जडलेल्या रुग्णांची कटकट, अवहेलना, त्रागा, तडफड हे सर्व त्यातील कलाकार समर्थपणे पेश करत आणि त्याला जाणीवपूर्वक बदलत जाणाऱ्या प्रकाशयोजनेची मदत होत होती. मी केलेला हा एक वेगळा प्रयोग यशस्वी झाला. या नाटकानंतर चेतननं माझं नाव ‘रस्ते’ या नाटकासाठी पं. सत्यदेव दुबे यांच्याकडे सुचवलं. खरं तर त्यांची शैली वेगळी आणि अनुभव जबरदस्त होता. त्यांना तंत्राचं खूप अवडंबर आवडत नसे, पण त्यांनी मला संपूर्ण स्वातंत्र्य दिलं. याही नाटकात नेपथ्याचा सपोर्ट नव्हताच. १९७७ ते १९९५ हा या नाटकाचा कालावधी होता. त्यात निवेदन विविध स्थळं आणि मूड्स उभं करायची जबाबदारी माझी होती. नेपथ्याचं काम प्रकाशयोजना करत असे.
हे सर्व मराठी रंगभूमीवर चालू असताना मकरंद देशपांडे पृथ्वी थिएटरला त्याच्या संस्थेतर्फे हिंदी नाटकांचे प्रयोग करायचा. हादेखील महेंद्र जोशीचाच शिष्य. त्याच्या नाटकात रंगमंचीय अवकाशाचा पुरेपूर वापर करून दृश्यरचना उभी करायला नाटकाला प्रतिमा, स्थळ आणि पात्रांच्या संरचना ठाशीवपणे उभं करण्यात तो प्रवीण आहे. मी त्याच्याबरोबर जी नाटकं केली ती तांत्रिकदृष्टय़ा काळाच्या खूप पुढे होती. मकरंदच्या नाटकातला प्रकाशाचा वापर हा एक अभ्यासाचाच विषय आहे.
सयाजी शिंदेने एक नाटक लिहिलं होतं ‘तुंबारा’. ज्याचा दिग्दर्शक होता सुनील शानबाग. सुनील स्वत: दुबेजींचा लाडका प्रकाशयोजनाकार, पण ‘रस्ते’ बघून ‘तुंबारा’ची जबाबदारी मला दिली. ‘तुंबारा’मध्ये देखील निसर्गाचे अनेक घटक आहेत. नायकाच्या जीवनातील अनेक कवडसे तो प्रेक्षकांसामोर उलगडतो. उपलब्ध असलेल्या छोटय़ातल्या छोटय़ा दिव्यापासून ते अगदी प्रखर दिव्यापर्यंत वेगवेगळ्या दिव्यांचा यात मी वापर केला होता. पण रंगमंचीय अवकाश, नेपथ्य या सर्वामध्ये आपण हरवून जाऊ अशी सयाजीला भीती वाटत होती, कारण संपूर्ण नाटक तो एकटाच सादर करणार होता. त्याची भीती घालवण्याचं काम प्रकाशाच्या साहाय्याने केलं गेलं. प्रकाशाच्या साहाय्याने नेपथ्य व अभिनय लोकांपर्यंत पोहोचलं. तेही सयाजीच्या मनातली भीती घालवून. हीच भीती सदाशिव अमरापूरकर यांना ‘ज्याचा त्याचा विठोबा’ या नाटकात वाटली होती. तेही एकटेच निवेदन रूपात नाटक सादर करत होते. त्यांच्याही मदतीला समर्पक प्रकाशयोजनाच धावून आली.
‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकानं मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला आहे. यातही रंगांचा फ्रेश लूक मी वापरला. गाण्यांच्या सादरीकरणामध्ये प्रकाशयोजना खूप महत्त्वपूर्ण ठरते. हे व्यावसायिक रंगभूमीवर ठामपणे सांगणारे हे नाटक यशस्वी झाल्यामुळे रंगांची उधळण करणारी गाणी अनेक नाटकांचा अविभाज्य भाग बनली.
‘सही रे सही’ च्या प्रचंड यशानंतर केदार शिंदेने ‘लोच्या झाला रे’ ही फॅन्टसी माझ्याकडे दिली. नायकाच्या वेगवेगळ्या जन्मातील पूर्वजांना स्वत:चा वेगळा रंग मी दिला होता. क्लायमॅक्सला असलेलं गाणं आणि प्रकाशाच्या साहाय्याने त्याचं सादरीकरण हे या नाटकाचा हायलाइट ठरला. क्षणार्धात बदलणाऱ्या अद्भुत अशा प्रकाशयोजनेची मी भर दिली होती. हे सर्व त्या काळात खूप गाजलं.
साधारण या काळानंतर टेलिव्हिजन या माध्यमाचा प्रभाव मनोरंजन क्षेत्रावर वाढू लागला. दर सेकंदाला बदलणारी चॅनेल्स घरबसल्या हाताच्या बोटांवर उपलब्ध झाली. हे सर्व नाटकाच्या दृश्य संरचनेत बदल करण्याची गरज वाढवणारं ठरलं. महेश मांजरेकरने ‘मी शाहरूख मांजरसुंभेकर’ या नाटकाची संकल्पनाच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने उभारली. संपूर्णपणे डिजिटल तंत्रज्ञान, फिरते दिवे, एखाद्या पाश्चात्त्य रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकाप्रमाणे प्रकाशयोजना. डोळे दिपवून टाकणारे चकचकीत दृश्य प्रसंग, ही सर्व नजरबंदी महेशने या नाटकात आणली. पण हे करताना तंत्र नाटकापेक्षा डोईजड होणार नाही याची मी काळजी घेत होतो. असाच काहीसा प्रकार केदार शिंदेने त्याच्या ‘ढॅण ट् ढॅण’ या नाटकात आणला. इथेही मी डिजिटल अत्याधुनिक तंत्र वापरून डिझाइन केलं आहे. आतापर्यंत कुठल्याही व्यावसायिक नाटकात न झालेल्या फॉलो लाइटचा वापर, हे या नाटकाचं वैशिष्टय़. या दोन नाटकांमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानानं प्रकाशयोजना, व्यावसायिक रंगभूमीवर करता येते हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, इतकंच नाही तर त्यांना आवडलंही.
गेल्या डिसेंबरमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर ‘हा शेखर खोसला कोण आहे’ हे नाटक आलं. गूढ रहस्यपूर्ण असलेल्या या नाटकात जर गुंतागुंतीची प्रकाशयोजना केली असती तर मी चुकलो असतो. साधं सोपं डिझाइन करावं आणि नाटकाच्या गतीप्रमाणे ते हलतं ठेवावं असा मी विचार केला. हा प्रयोग यशस्वी झाला. नाटक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास त्यामुळे मदत झाली.
आज व्यावसायिक रंगभूमीवर निर्माते दिग्दर्शक खूप प्रयोग करताहेत. दृश्य रचनेमध्ये बदल होत आहेत. हे सर्व प्रकाशाच्या साहाय्याने होणार हे निश्चित. त्यामुळे येत्या काळात उपलब्ध तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रेक्षकांना अभूतपूर्व दृश्यसंरचना असलेली नाटकं दाखवण्यासाठी आम्ही सर्व जण सज्ज आहोत.
sheetaltalpade@hotmail.com