21 January 2021

News Flash

अमित सुळे

मला फेसबुक, ट्विटर, अलीकडे इन्स्टाग्राम या गोष्टी आवडतात. पण कधी कधी मला त्यांचा प्रचंड नॉशिया येतो.

अमित सुळे सेन्ट यू अ फ्रेंड रिक्वेस्ट

‘अमित सुळे सेन्ट यू अ फ्रेंड रिक्वेस्ट.’ मी फोनवर हे नोटिफिकेशन वाचलं आणि पुढच्याच क्षणी विसरून गेलो. मग एके दिवशी मेसेन्जरवर मेसेज वाचला. ‘सत्यजीत, तुम्हाला फ्रेंड  रिक्वेस्ट  पाठवली आहे. प्लीज, अ‍ॅक्सेप्ट करा. – अमित सुळे.’ मी मेसेज वाचला. विसरून गेलो. दोन दिवसांनी पुन्हा तोच मेसेज. एव्हाना मला अमित सुळेचं प्रोफाइल पिक्चर असलेलं गणपतीचं चित्र ओळखू यायला लागलं होतं. त्यानंतर सलग १५-१६ दिवस रोज हाच मेसेज. त्यात एका टिंबाचाही बदल नसे. हा मुलगा रोज तोच मेसेज कट-पेस्ट करून पाठवत असावा. माझं आणि फेसबुकचं नातं हे मुंबईच्या पावसासारखं आहे. तो आला की धो-धो येतो, नाहीतर रजेवर गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यासारखा गायब होतो. मला फेसबुक, ट्विटर, अलीकडे इन्स्टाग्राम या गोष्टी आवडतात. पण कधी कधी मला त्यांचा प्रचंड नॉशिया येतो. इतका, की मी महिनोन् महिने फेसबुकचं तोंडही पाहत नाही. लोक ते कुठे जेवले, कसे जेवले याचे फोटो टाकू लागले, किंवा जातीय, भाषीय मुद्दय़ांवरून रण माजवू लागले, ओठ पुढे काढून घेतलेल्या सेल्फ्यांनी उच्छाद मांडू लागले, किंवा पावसापाण्याच्या फडतूस कविता टाकून बेजार करू लागले की मी सोशल मीडियाचा टेम्पररी संन्यास घेतो. बरं, माझं काय चाललंय, मी माझ्या कुटुंबासमवेत जगाच्या कुठल्या कोपऱ्यात उंडारायला गेलोय, किंवा आता या क्षणी मला लोन्ली वाटतंय की हॅपी वाटतंय, हे जगाला कळलंच पाहिजे असा माझा अजिबातच आग्रह नाही. ते कळल्यानं जगात कुणाच्याच आयुष्यात तसूभरही फरक पडेल असं मला वाटत नाही. असो. त्यावेळी असंच महिना-दीड महिना या प्रांतातून अंतर्धान पावून परत आलो होतो. मेसेंजर उघडला. अमित सुळेचे शंभरेक मेसेजेस होते. मजकूर तोच. आता त्यानं दिवसाला दोन या गतीनं मेसेजेस पाठवले होते. मराठय़ांच्या गनिमी काव्यासमोर मोगलांनी शरणागती पत्करली, तशी अखेर मी या अमित सुळेच्या मेसेज- बाणांसमोर शरणागती पत्करली. आणि पेंडिंग रिक्वेस्टस्च्या रकान्यात जाऊन ‘अ‍ॅक्सेप्ट’वर क्लिक् केलं. आणि इथे मी विकतचं दुखणं नाही, संकटच ओढवून घेतलं.

गोष्ट २०१२- १३ ची आहे. ‘तू तिथे मी’ ही माझी झी मराठीवरची मालिका तेव्हा जबरदस्त लोकप्रिय झाली होती. आपल्या पत्नीवर- मंजिरीवर संशय घेणाऱ्या, पण तिच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या ‘सत्यजीत मुधोळकर’ला लोक शिव्याही घालत होते आणि त्याच्यावर प्रेमही करत होते. एकदा मुंबई पोलिसांच्या एका फंक्शनमध्ये तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटलांनीच मला धमकी दिली होती, की ‘मंजिरीला छळायचं बंद करा, नाहीतर अटक करतो.’ हे सगळं उगाळायचं तात्पर्य इतकंच ,की त्यावेळी सत्यजीत आणि मंजिरी लोकांच्या घराघरांत पोहोचले होते. अमित सुळेची फ्रेन्ड रिक्वेस्ट मी त्याच काळात अ‍ॅक्सेप्ट केली. त्यानंतर काही दिवसांतच मला मेसेज आला. ‘सत्यजीतची मिशी काढून टाकलीत. लाज नाही वाटत?’ मी चक्रावलोच. मला काहीच कळेना. मी गंमत म्हणून माझ्या पत्नीला तो मेसेज दाखवला. तो वाचून ती किंचित गंभीर झाली. ‘सीरियलमध्ये सत्यजीतला मिशी आहे. आणि तुझे फेसबुकवर जे पर्सनल पिक्चर्स आहेत त्यात तुला मिशी नाही. हा मुलगा या दोन गोष्टींमध्ये गल्लत करतोय.’ बाप रे! मी घाबरलोच. त्या रात्री मी पहिल्यांदा अमित सुळेचं प्रोफाइल उघडून पाहिलं. मुलगा कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांला होता. तो माझ्यासारखाच कॉमिक्सप्रेमी असावा. कारण टाइमलाइनवर बॅटमॅन आणि आयर्न मॅनचे खूप फोटो होते. प्रोफाइल पिक्चर मात्र गणपतीचं होतं. गंमत म्हणजे स्वत:चा एकही फोटो नव्हता. मी लॅपटॉप बंद केला आणि अमित सुळेला मनातून काढून टाकला.

त्यानंतर अमित सुळेच्या मेसेजचा एक पाणलोटच निघाला. रोजचा एपिसोड झाला की अमित ‘सत्यजीत’ला एक छोटेखानी पत्रच लिहीत असे. ‘तुमचं मंजिरीवर संशय घेणं बरोबर आहे. मी समजू शकतो. पण ती इनोसंट आहे. तुम्हाला हे आता कळत नाहीये, पण जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचा आताचा सगळा त्रास कमी होईल. डोन्ट वरी. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ असं म्हणून माझा हा मित्र सत्यजीतचं सांत्वन करत होता. ‘तुम्हाला मुलगी झाली. अभिनंदन. काय नाव ठेवणार? ईवा नाव ठेवा. छान वाटेल. ईवा सत्यजीत मुधोळकर. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ मालिकेत सत्यजीत-मंजिरीच्या मुलीचं नाव ‘ईवा’ न ठेवता ‘शुभ्रा’ ठेवलं गेलं तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर ओठ पुढे काढून रडकुंडीला आलेला एक मुलगा उगीचच आला. ‘तुम्ही प्लीज दिवाळीला दादा होळकरकडे जुगार खेळायला जाऊ नका. त्याचा प्लान तुमचा अपमान करण्याचा आहे. मी तुम्हाला सांगतोय हे कोणाला सांगू नका. मुळात जुगार खेळणंच वाईट. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ या मेसेंजरनंतर मला खात्री पटली होती, की या मुलाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.

मालिकेतली पात्रं जिवंत, चालती-बोलती माणसं आहेत असं मानणारे अनेक भाबडे प्रेक्षक भेटतात. ‘तू तिथे मी’च्याच वेळी तेंडुलकरकाका नावाचे एक ७९ वर्षांचे गृहस्थ नित्यनेमानं सत्यजीत आणि मंजिरीच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी दर सोमवारी शंकराच्या देवळात पूजा करून त्याचा प्रसाद आमच्या सेटच्या पत्त्यावर पाठवायचे. तो पत्ता त्यांनी कुठून मिळवला, ते तो भोळा शंकरच जाणे. पुण्यातल्या एक आज्जी मला तुमच्या लेकीच्या बारशाला यायचंच आहे, असा हट्ट धरून बसल्या होत्या. त्या पोस्ट कार्डवर सुवाच्य अक्षरात लिहिलेलं पत्रं पाठवत. आमच्या घरी काम करायला आलेल्या एका बाईनं नोकरीच्या दुसऱ्या दिवशी माझ्या पत्नीला विचारलं होतं, ‘रात्री घरी येतात का? की मंजिरीकडेच असतात?’ पुढे ‘मंजिरी एक वेळ परवडली. भोळी आहे. पण ती प्रिया अवदसा आहे हां. सांगून ठेवते,’ असंही बजावलं होतं. त्यामुळे मालिकेतल्या पात्रांचं असं परसॉनिफिकेशन होणं काही नवी गोष्ट नव्हती. पण अमित सुळेची केस जरा हाताबाहेरची वाटत होती. आणि एकदा सत्यजीतचा अपघात होतो असा एक प्रसंग प्रक्षेपित झाला. त्यानंतर अमित सुळे पेटलाच. ‘तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला आहात? मला तुम्हाला भेटायचं आहे. काळजी घ्या. मला प्लीज हॉस्पिटलचं नाव कळवा. मी येतो. मला प्लीज एकदा भेटा. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आहे.’ ‘तुम्ही बेशुद्ध असताना मंजिरी सतत तुमच्या उशाशी आहे. प्रिया फक्त नाटक करतेय. शुद्धीत आल्यावर तुम्हाला उलटं वाटेल- माहित्ये मला. पण तुम्ही हे लक्षात ठेवा. मला अजूनही तुम्ही हॉस्पिटलचं नाव सांगितलेलं नाही. गणपतीबाप्पा लक्ष ठेवून आाहे.’ मला आता हळूहळू हे सगळं अस झालं होतं. इतके दिवस मी त्याच्या कुठल्याही मेसेजला रिप्लाय करायचं टाळलं होतं. अगदी सुरुवातीला मी त्याला ‘थँक यू’ असा औपचारिक मेसेज पाठवत असे. पण त्याचे मेसेजेस जेव्हा वास्तवाची सीमा ओलांडून फॅन्टसीच्या परिघात शिरले तेव्हा मी मौन राखणंच पसंत केलं. यावेळी मात्र मी कीबोर्ड पुढे ओढला. ‘प्रिय अमित सुळे. तुमची काळजी आणि तुमचे प्रेम मला मान्य आहे. पण ही एक टी. व्ही. मालिका आहे. तुम्ही जे पाहता ते सगळं खोटं आहे. कल्पनेतलं आहे. माझी प्रकृती ठणठणीत आहे. मला काहीही झालेलं नाही. आणि सत्यजीत आणि मंजिरीच्या आयुष्यातला तिढा पुढे कसा सुटेल, हे कळेलच तुम्हाला. तुम्ही मालिका बघताय, उत्तम आहे. पण अभ्यासावरही लक्ष द्या. मजेत राहा. तुमचा- चिन्मय मांडलेकर.’ एवढा मोठा मेसेज त्यानंतर मी सोशल मीडियावर कुणालाच पाठवलेला नाही. त्यानंतर काही दिवस अमितचं उत्तरच आलं नाही. माझ्या मेसेजचा त्याच्यावर काय परिणाम झाला असावा हे मला कळेना. काही दिवसांनी मला मेसेंजरवर एक मेसेज आला- ‘माझं नाव संयोगिता सुळे. मी अमित सुळेची आई. तो तुमचा फेसबुक फ्रेंड आहे. अमितला तुम्हाला भेटायचं आहे. प्लीज, एकदा भेटाल का?’  मी पेचात पडलो. जोवर हे सगळं सोशल मीडियाच्या व्हच्र्युअल जगात चाललं होतं तोवर ठीक होतं, पण आता प्रत्यक्ष भेटायचं म्हणजे..! पण माझ्याही नकळत मी मेसेज टाइप केला, ‘हा आमच्या शूटिंग स्टुडिओचा अ‍ॅड्रेस. कधीही या.’ आणि दोन दिवसांनी आमचा प्रॉडक्शन मॅनेजर मला सांगत आला- ‘सर, कुणीतरी भेटायला आलंय.’ मी बाहेर गेलो. एक किडकिडीत, सावळा मुलगा. साधं शर्ट आणि जीन्स घातलेला. मी तेव्हा माझ्या गेटअपमध्येच होतो. ओठांवर मिशी चिकटवलेली होती. मी हात पुढे केला. ‘हाय मी..’ माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत तो माझ्या पाया पडला. मी खजील होऊन उगीच इकडे तिकडे पाहू लागलो. खुच्र्या आल्या. चहा आला. ‘खूप मोठा फॅन आहे तुमचा. पण तुम्ही त्याला मागे काहीतरी मेसेज पाठवलात. तो हर्ट झाला.’ त्याच्या आईचं हे वाक्य ऐकून मला धक्का बसला. ‘तुम्ही त्याचं फेसबुक प्रोफाइल पाहिलंय?’ मी विचारलं. आईनं नकारार्थी मान हलवली. ‘त्याला असं वाटतंय, की सत्यजीत मुधोळकर नावाची व्यक्ती खरंच या जगात आहे. मालिकेतल्या पात्रांना खरं मानतोय तो.’ मी अमितकडे वळलो आणि माझ्या ओठांवरची मिशी काढली. अमितचा चेहरा भूत बघितल्यासारखा झाला. ‘मी चिन्मय मांडलेकर. मी एक अ‍ॅक्टर आहे.’ मी पुन्हा मिशी ओठांवर धरली. ‘सत्यजीत मुधोळकर- मी करत असलेलं एक कॅरेक्टर आहे. कळतंय तुला?’ अमित काहीच बोलला नाही. माझं काळीज तुटत होतं या मुलासाठी; पण मला काय करावं कळेना. मग मला काहीतरी सुचलं. ‘ब्रुस वेन मास्क लावला की बॅटमॅन होतो की नाही? मास्क काढला की तो ब्रूस वेन असतो. बरोबर ना!’ काहीतरी ओळखीचं कानावर पडल्यासारखा चेहरा त्यानं केला, पण शांतच राहिला. यानं प्रत्यक्ष चित्रीकरण होताना पाहिलं तर याच्या डोक्यात प्रकाश पडेल, म्हणून मी त्याला तिथे ओढायचा प्रयत्न केला. पण त्यानं त्या खुर्चीतून कुठेही हलण्यास नकार दिला. साधारण तासभर बसून ते मायलेक गेले. मी अमितच्या आईला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. त्याही थोडय़ा चिंतेत पडल्या. जाताना अमितनं फोटो काढला नाही की सही घेतली नाही. मी मिशी काढल्यानंतर त्यानं माझ्या अस्तित्वाची दखल घ्यायलाच नकार दिला. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी मीच एक मेसेज पाठवला. ‘कसा आहेस रे अमित? अभ्यास कसा चाललाय? आई कशी आहे?’ काहीच उत्तर नाही. मी त्यानंतर तीन-चार वेळा त्याची खबर घेण्याचा प्रयत्न केला, पण अमित सुळेनं दार कायमचं बंद केलं होतं. त्याला चिन्मय मांडलेकरशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. पुढे तो माझ्या फ्रेंड लिस्टवरूनही गायब झाला. आज ‘तू तिथे मी’ संपून तीन  वर्ष लोटली आहेत. सत्यजीतची झूल अंगावरून काढून मी तुकारामाची झूल पांघरली. पण अजूनही मधेच वीज चमकावी तसा प्रश्न पडतो- ‘काय झालं असेल अमित सुळेचं?’ एवढीच आशा करतो, की गणपतीबाप्पा त्याच्यावर लक्ष ठेवून असेल.

चिन्मय मांडलेकर – aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2017 12:33 am

Web Title: amit sule friend request to author chinmay mandlekar
Next Stories
1 कल्पना
2 जनार्दनकाका
3 कौतुक
Just Now!
X