24 January 2021

News Flash

शशांक गणेश सोळंकी

असाच एक माणूस : शशांक गणेश सोळंकी.

मनोरंजन क्षेत्रात ‘निर्माता’ या व्यक्तिविशेषाकडे फार गमतीशीर नजरेनं पाहिलं जातं. तो अन्नदाता! त्यामुळे बहुतांश वेळा निर्मात्याशी वागता-बोलताना अनेकांच्या ठायी आपसुक एक विनम्रपणा येतो. चहा-साखरेचं प्रमाण बिघडून त्याची जशी कधी कधी बासुंदी होते, तसेच  अनेकांचा विनम्रपणा कधी कधी लाळघोटेपणाच्या कक्षेतही जातो. दुसरी भावना अगदीच टोकाची.. सगळे निर्माते हे एक नंबरचे चोर आहेत आणि ते आपले पैसे मारायलाच बसलेत.. अशी काहींची धारणा असते. त्यामुळे राजकारण्यांवर जसा आपण कधीच विश्वास ठेवत नाही, तसेच अनेक जण निर्मात्यांवरही ठेवत नाहीत. त्यामुळे ‘निर्माता’ नामक माणसाला त्याच्या आजूबाजूच्या लोकांचे खरे चेहरे फारच क्वचित दिसत असावेत. म्हणूनच मग त्यांनाही एक कठोरपणाचा, निबरपणाचा मुखवटा चढवणं भाग पडतं. पण अनेकदा टणक नारळातून मऊसूत खोबरं निघावं, तशी निर्मात्याच्या मुखवटय़ामागची हळवी माणसंही मी पाहिली आहेत. असाच एक माणूस : शशांक गणेश सोळंकी.

जून २००३ साली माझ्या एका मैत्रिणीनं मला एक नंबर दिला. ‘‘हा शशांक सोळंकीचा नंबर आहे. याची एक नवीन सीरियल येतेय.. ‘वादळवाट’! याला फोन कर.’’ हा नंबर या मालिकेच्या निर्मात्याचा आहे हे माझी ती मैत्रीण मला सांगायची विसरली म्हणा, किंवा मी ते ऐकलं नाही म्हणा; पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी फोन फिरवला तेव्हा मला वाटत होतं- मी एखाद्या असिस्टंट डिरेक्टरशी बोलतोय. पलीकडून अत्यंत प्रश्नार्थक ‘हॅलो’ आला. मी फोन का केलाय, ते सांगितलं.

‘‘ऑडिशनसाठी येऊ शकतो का?’’

पलीकडे एक बारीक पॉज गेला.

‘‘सी२२२, नितीन गोडांबे माझा प्रॉडक्शन मॅनेजर आहे. तू त्याच्याशी बोल. तो बोलवेल तुला ऑडिशनला.’’

‘माझा प्रॉडक्शन मॅनेजर! हा असिस्टंट जवळजवळ निर्माता असल्यासारखाच बोलतोय..’ माझ्या मनात  विचार आला. काही दिवसांतच मी नितीन गोडांबे याच्याशी संपर्क साधून ऑडिशनला गेलो. निघताना मी नितीनला सहज विचारलं, ‘‘बाय द वे, या सीरियलचा प्रोडय़ूसर कोण आहे?’’

‘‘नवीन निर्माता आहे.. शशांक सोळंकी.’’ तिथे माझी टय़ूब पेटली. ज्याला आपण असिस्टंट डिरेक्टर समजून फोन केला होता तो या मालिकेचा निर्माता होता. पुढे याच मालिकेचे मी संवाद लिहू लागलो. लेखक म्हणून माझं ते पहिलंच काम. आठवडाभर काम करूनही मी कधी सेटवर गेलो नव्हतो. एके दिवशी मालिकेचे मुख्य लेखक अभय परांजपे यांचा फोन आला.. ‘‘सेटवर ये आज. तिथेच भेटू.’’ मी कांदिवलीच्या ‘पारवाने स्टुडियो’ला संध्याकाळी  पाचच्या दरम्यान पोहोचलो. अभयसर अजून यायचे होते. मी शूटिंग बघत थांबलो. एक सीन संपला. पुढच्या सीनची तयारी सुरू झाली. रिमलेस चष्मा लावलेला, ग्रे टी-शर्ट आणि साधीशी जीन्स घातलेला एक माणूस माझ्या समोर आला.

‘‘तू चिन्मय ना?’’ मी मान हलवली.

‘‘तू गिरगावचा आहेस ना? शाळा कुठली तुझी?’’

‘‘सेंट सेबास्टियन.’’  मी उत्तरलो.

‘‘ओ२२! गुड..’’ एवढं बोलून तो त्या सेटवर कुठेतरी अंतर्धान पावला.

थोडय़ाच अंतरावर  एक धीरगंभीर वाटणारे गृहस्थ खुर्चीत बसले होते. लोक त्यांच्या जवळून चालताना उगीचच चंद्रावरून चालल्यासारखे चालत होते. मी मनोमन म्हटलं, हेच ते शशांक सोळंकी! त्याचवेळी मागून अभयसरांचा आवाज आला.. ‘‘तू पोहोचलास पण?’’ मी वळलो. मघाचचा तो रिमलेस चष्मेवाला माणूस त्यांच्याबरोबरच होता.

‘‘ही इज फ्रॉम गिरगाव.’’

या माणसाला आकारांत लांबवायची गमतीदार सवय होती. मी आणि अभयसर तिथे सेटवर बसूनच आमचं पटकथेचं काम करू लागलो. काही वेळानं मी त्यांना हळूच म्हणालो, ‘‘सर, त्या शशांकसरांशी ओळख करून द्या ना माझी.’’

‘‘तू भेटला नाहीस त्याला? मला वाटलं, झाली तुमची ओळख.’’ सरांच्या आवाजात आश्चर्य होतं. मी त्या धीरगंभीर माणसाकडे पाहत होतो. तो आता डोळ्यावरचा चष्मा डोक्यावर धरून काहीतरी वाचत होता. इतक्यात अभयसरांनी ‘‘शशांक..’’ अशी हाक मारली. मी चपापून त्यांच्याकडे पाहिलं. घरातल्या वडीलधाऱ्या माणसाला अचानक कुणीतरी आगंतुकानं ‘‘पांडू२२’’ म्हणून हाक मारल्यावर आपल्याला कसं वाटेल? पण धीरगंभीर माणूस काही हलला नाही. त्याचं वाचन तसंच सुरू होतं. आणि मग अचानक मघाचचा तो रिमलेस चष्मेवाला पुन्हा अवतरला.

‘‘अरे, याला तुला भेटायचं होतं. हा चिन्मय. माझ्याबरोबर डायलॉग लिहितोय. हा शशांक सोळंकी.’’

‘‘वी हॅव मेट..’’ असं म्हणत चष्मेवाल्यानं पुन्हा हात पुढे केला. मी काहीही न बोलता हात मिळवला. मनात म्हटलं, ‘मांडलेकर, निर्मात्याच्या बाबतीत तुमचा राँग नंबर लागावा? तोही एकदा नाही, दोनदा? कसं व्हायचं तुमचं?’ पण पुढे माझं जे काही झालं त्यात शशांक गणेश सोळंकी यांचा आणि त्यांच्या ‘सेवन्थ सेन्स मीडिया’ या निर्मिती संस्थेचा खूप मोठा हात आहे.

सेवन्थ सेन्स मीडिया आणि शशांक सोळंकी यांनी ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’, ‘लक्षमणरेषा’, ‘जीवलगा’, ‘झुंज’, ‘आपली माणसं’, ‘तू तिथे मी’, ‘कन्यादान’, अस्सं सासर सुरेख बाई’, ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘बालपण देगा देवा’ या मालिकांची निर्मिती केली आहे. यातल्या बहुतांश मालिकांचा मी लेखक किंवा अभिनेता या नात्यानं भाग होतोच. यातल्या काही मालिका अत्यंत  गाजल्या. काही अजिबात नाही गाजल्या. पण आज चौदा वर्षांनीही शशांकसरांचा उत्साह तोच आहे. अजूनही ते त्याच उत्साहानं गोष्ट- त्यांच्या भाषेत ‘गोस्ट’ बनवतात,  त्याच हिरीरीने वाद घालतात, आणि त्याच जिकिरीनं मालिका निर्मितीच्या तापदायक उद्योगाला भिडतात. आमच्या दोघांमध्ये जो काही बंध निर्माण झाला त्याचा पाया त्यांनी मला आमच्या पहिल्या भेटीत विचारलेल्या पहिल्या प्रश्नातच आहे बहुतेक.. ‘तू गिरगावचा ना?’ शशांक सोळंकी मूळ गिरगावचे. खोताच्या वाडीतले. सुप्रसिद्ध अभिनेते गणेश सोळंकी हे त्यांचे वडील. वडील सुप्रसिद्ध अभिनेते, स्वत: निर्माता म्हटल्यावर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या आणि तो चमचा तोंडात घट्ट धरून ठेवलेल्या माणसाचं चित्र डोळ्यांसमोर येतं. पण गणेश सोळंकींच्या मुलाचा ‘शशांक गणेश सोळंकी’ बनण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच सहज-सोपा नव्हता. चौदा वर्षांच्या आमच्या ओळखीत त्या प्रवासाबद्दल जुजबीच माहिती मला मिळाली असेल. जी आहे, ती पुढच्या आठवडय़ात तुमच्याशी नक्की शेअर करेन.

(क्रमश:)

चिन्मय मांडलेकर

aquarian2279@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2017 1:17 am

Web Title: chinmay mandlekar articles in marathi on shashank solanki
Next Stories
1 बज्जूभाई
2 चेतन
3 विनय सर (पेशवे)
Just Now!
X