युतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल काहींची नाराजी

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रविवारी जाहीर केली आहे. या भूमिकेबाबत समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त करत काही समाजबांधवांनी समन्वयकांवर टीका केली आहे. समाजमाध्यमांवरील तीव्र प्रतिक्रियांमुळे मराठा क्रांती मोर्चामध्ये फूट पडली असून मराठा आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झालेल्या काही आंदोलकांनी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतलेल्या भूमिकेस जाहीर विरोध केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाणे जिल्ह्य़ात मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या माध्यमातून मूक मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चाना राजकीय रंग चढू नये म्हणून राजकीय नेत्यांना मोर्चाच्या व्यासपीठावर स्थान दिले नव्हते. त्यानंतरही शहरात मराठा समाजाचे पक्षविरहित मोर्चे निघाले होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षण, हॉस्टेल, समाजाचे अनेक प्रश्न आणि मागण्या मार्गी लावण्यासाठी समाजाच्या आंदोलनात सहभाग आणि पुढाकार घेणाऱ्या मराठा उमेदवारांसह ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ातील शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका समन्वयकांनी जाहीर केली. यामुळे शिवसेना-भाजप महायुतीचे पारडे जड झाल्याची चर्चा सुरू झाली असतानाच काही समाजबांधवांनी समाजमाध्यमांचा आधार घेऊन त्यावर पाठिंब्याबाबतच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

‘आमचा केवळ वापर’

मूक आणि ठोक मोर्चा काढण्याआधी बैठका घेण्यात आल्या होत्या आणि त्यात सर्वानुमते दोन्ही मोर्चाचे नियोजन ठरविण्यात आले होते. मात्र शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा देण्याआधी तशा प्रकारची कोणतीही बैठक घेण्यात आली नाही. त्यामुळे समन्वयकांची ही व्यक्तिगत भूमिका असावी. आमच्यावर गुन्हे दाखल झाले आणि आमचे भविष्य संकटात आले. आम्ही जामिनावर सुटल्यानंतर समन्वयक आमची विचारपूस करायला आले नाहीत. याविषयी बोलणार होतो, परंतु समाजात गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून ते टाळले. आमचा केवळ वापर गेला आणि स्वत:चे खिसे भरले, असा आरोप करणारी प्रतिक्रिया नावानिशी समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यात निखिल जाधव, अक्षय आंबेरकर, विनोद जाधव, सुनील पाटील, अनिकेत गावडे, अल्पेश महाडिक, राजेश बागवे आणि तेजस रेणुसे यांच्या नावासह मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत, तसेच फेसबुकवरही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.