पनवेल मतदारसंघात सर्वाधिक मतदार

मावळ लोकसभा मतदारसंघात तब्बल २२ लाख ९७ हजार ४०५ मतदार असून हे मतदार मावळचा खासदार कोण, हे ठरवणार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ रायगड, तर उर्वरित तीन पुणे जिल्ह्य़ातील आहेत.

या मतदारसंघातील सर्वाधिक मतदार पनवेल विधानसभा मतदारसंघात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारसंघात पाच लाख ३९ हजार १८७ मतदार आहेत. मावळसाठी येत्या २९ एप्रिलला मतदान होणार आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. सर्वाधिक मतदार पनवेलमध्ये असून त्याखालोखाल चिंचवडचा क्रमांक आहे.

सर्वाधिक महिला मतदारांची संख्याही पनवेलमध्ये आहे. तर, सर्वाधिक तृतीयपंथी मतदार चिंचवड मतदारसंघात आहेत. याबरोबरच पनवेल, कर्जत, मावळ मतदारसंघात एकही तृतीयपंथी मतदार नसल्याचे निवडणूक शाखेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

मतदार यादीत नाव असे शोधा

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी http://electoralsearch.in, www.ceo.maharashtra.gov.in,  www.nvsp.in ही संकेतस्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या संकेतस्थळावर जाऊन, त्यावर मतदाराने आपले नाव, वडील किंवा पतीचे नाव, आडनाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ ही माहिती भरल्यानंतर संबंधित मतदाराचे नाव यादीमध्ये आहे किंवा नाही, हे समजू शकेल. या बरोबरच केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे ‘व्होटर हेल्पलाइन’ नावाचे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातूनही मतदार यादीतील नावाची माहिती मिळवता येईल. तसेच १९५० या  हेल्पलाइनवर संपर्क साधून मतदारांना माहिती मिळू शकणार आहे.