काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. वर्षानुवर्षे काँग्रेसने हेच काम केले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाही. मात्र, शरद रावांना काय झाले आहे, त्यांचा राष्ट्रवाद गेला कुठे? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुन्हा एकदा हल्लाबोल केला. अहमदनगर येथील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी आज मोदी नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.

मोदी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे जम्मू-काश्मीरला वेगळं करण्याची भाषा करणाऱ्यांसोबत आहेत. काँग्रेसच्या लोकांकडून मला अपेक्षा नाही. मात्र, शरदरावांना काय झालंय तेच मला कळतं नाही. तुम्ही देशाच्या नावाने काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधान होण्याची भाषा होत असताना तुम्ही कधीपर्यंत गप्प राहणार? काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर तुम्ही देशाला आता विदेशी चष्म्यातून पाहत आहात का? तुमच्या पक्षाचे राष्ट्रवादी हे नाव केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीच ठेवलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतले असतानाही तुम्हाला झोप कशी येते? असे सवालही त्यांनी यावेळी केले.

तसेच हे पक्ष भारताला आणि महाराष्ट्राला लुटत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच हे लोक गरीब शेतकऱ्यांचे दुश्मन आहेत. त्यांनी आजवर सर्वांना फक्त जखमाच दिल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी तुमच्या मतांची गरज आहे. आपले एक मत या चौकीदाराला मजबूत करेल, असे मोदी यावेळी म्हणाले.

सैन्याच्या कारवाईचे श्रेय घेण्यावरुन देशात वातावरण तापलेले असताना मोदींनी या सभेत पुन्हा एकदा नवमतदारांना राष्ट्रभक्तीच्या नावाखाली भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तुम्हाला मंजूर आहे का? असा सवाल करताना जवानांच्या शौर्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी येथे पुन्हा एकदा केले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मोदी म्हणाले, पुन्हा सत्तेत आल्यानंतर पाण्याच्या नियोजनासाठी आम्ही वेगळे मंत्रालय तयार करणार आहोत. शेतकरी कृषी योजनेत बदल करणार आहोत. ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन देणार आहोत. उसापासून इथेनॉल निर्मितीला बळ देणार आहोत.