लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने भाजपाची वाटचाल सुरु असून त्यावर केवळ औपचारिक शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. भाजपा आणि मित्रपक्षांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. मात्र सलग दुसऱ्यांना बहुमत मिळवून मोदींनी मानाच्या पंक्तीमध्ये स्थान मिळवले आहे. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सलग दुसऱ्यांदा पूर्ण बहुमत मिळवण्याचा पराक्रम केला आहे. २०१४ साली मोदींच्याच नेतृत्वाखील भाजपान आणि मित्रपक्षाने २८२ जागा जिंकल्या होत्या. सध्याचा कल पाहता यंदाही भाजपा बहुमतासाठी लागणारा २७२ चा बहुमताचा आकडा सहज गाठेल. त्यामुळे फिर एक बार मोदी सरकार ही भाजपाची घोषणा खरी ठरणार असून मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार हे निश्चित झाले आहे.

याआधी अशाप्रकारे सलग दोन वेळा बहुमताचा आकडा गाठत पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा पराक्रम १९५१-५२ भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी केला होता. देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तीन चतुर्थांश जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर झालेल्या १९५७ आणि १९६२ च्या निवडणुकामध्येही नेहरुंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बहुमत मिळवले होते. मात्र या निवडणुकांपैकी १९५१ च्या निवडणुका या देशातील पहिल्याच निवडणुका असल्याने त्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घेण्यात आल्या होत्या. ऑक्टोबर १९५१ पासून ते फेब्रुवारी १९५२ दरम्यान देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या काळामध्ये देशामध्ये काँग्रेस हा एकमेव मोठा पक्ष असल्याने त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले. याच काळामध्ये भारतीय जनता संघ, किसान मझदूर प्रजा पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेड्रेशन आणि समाजवादी पक्षांच्या बांधणीचे काम सुरु झाले होते. १९५१-५२ च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने एकूण ४८९ जागांपैकी ३६४ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी एकूण मतदानापैकी ४५ टक्के मते काँग्रेसला मिळाली होती. १९५७ साली झालेल्या निवडणुकामध्ये नेहरुंना हिंदू विवाह कायदा १९५५ च्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधाला तोंड द्यावे लागले होते. या काळामध्ये देशामध्ये अनेक घडामोडी घडत होत्या. प्रदेशिक भाषांच्या आधारावर राज्य निर्मिती करण्यासाठी १९५३ साली राज्य निर्मिती समितीची स्थापनाही नेहरुंच्या कार्यकाळातच झाली. याच काळात देशात अन्नटंचाईची समस्याही भेडसावत होती. इतक्या समस्या असतानाही नेहरुंनी १९५७ च्या निवडणुकांमध्ये ३७१ जागांवर विजय मिळवला होता. मागील निवडणुकापेक्षा या निवडणुकामध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या संख्येत वाढ झाली. १९५१-५२ साली ४५ टक्के मते मिळवणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीमध्ये ४७.७८ टक्के मते मिळाली होती.

नेहरुंनी बहुमत मिळवण्याची हॅट-ट्रीक १९६२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये केली. या निवडणुकीत काँग्रेसने एकूण ४९४ जागांपैकी ३६१ जागा जिंकल्या होत्या. सलग २० वर्षे राजकीय पटलावर वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रसेला पहिला फटका बसला तो १९६७ साली. या वर्षी काँग्रेसला सहा राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा समाना करावा लागाला. पहिल्यांदाच काँग्रेसचा तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला. याच वर्षी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नेहरुंची मुलगी इंदिरा गांधी यांनी ५२० जागांपैकी २८३ जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली होती.

त्यानंतर पक्षांतर्गत वादामुळे इंदिरा गांधींनी काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांची हकालपट्टी केली. हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्यांचे नेतृत्व मोरारजी देसाई यांनी केले. या काळातच इंदिरा यांनी ‘गरिबी हटाओ’ची घोषणा दिली. या घोषणाला भारतीयांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत १९७१ इंदिरांना विजय मिळवून दिला. १९७१ च्या निवडणुकांमध्ये इंदिरांनी ३५२ जागा जिंकल्या.

नेहरु आणि इंदिरांनंतर सलग दुसऱ्यांना बहुमत मिळवण्याचा असा पराक्रम थेट ४८ वर्षांनी भाजपाच्या नरेंद्र मोदींनी केला आहे. २०१० ते २०१४ दरम्यान संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्यांचे अनेक आरोप झाले. याच वेळी प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाने गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखील निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. विकास घडवण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली २८२ जागा जिंकत सत्ता स्थापन केली. पाच वर्षांपूर्वी मोदींनी केलेला हा पराक्रम आज पुन्हा केला आणि बहुमताच्या आकड्याबरोबरच ३०० जागांचा टप्पा सहज ओलांडला आहे. त्यामुळेच मोदी सलग दुसऱ्यांदा सत्तेत येणारे तिसरे पंतप्रधान ठरणार आहे.