शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.  राजगुरूनगर-खेड येथे डॉ. कोल्हेंच्या प्रचाराची आज (शनिवार) सांगता झाली. या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र बाबा इथं येऊन बघ किती शेतकऱ्यांची कर्ज माफी झाली. नुसतं पोपट वाणी बोलू नका. मुख्यमंत्री झाल्यापासून ते जॅकेट घालू लागलेत. त्यांनी ते घालावं पण शेतकऱ्यांची फसवणूक का केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसली. त्यांच्या मालाला हमीभाव मिळाला नाही. विजेचे दर वाढवले. गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. सांगा, गेल्या ५ वर्षात माझ्या पुणे जिल्ह्यात कोणती नवी इंडस्ट्री आली? मागच्या वेळेस फसलात, यंदा फसू नका! आपली नाणी खणखणीत दिली आहेत. ती खणखणीत वाजलीच पाहिजेत!

डॉ अमोल कोल्हे यांना निवडून दिल तर दोन-दोन काम होणार. एकतर तुम्ही त्यांच्याकडे प्रश्न घेऊन आला तर ते पण सुटणार आणि काही दुखत असलं की लगेच इंजेक्शन, इलाज. त्यांना लगेच आठवण करून द्यायचं घड्याळ्याचं बटन दाबलं होतं. असे अजित पावर म्हणाले.

पवार घराण्याने यांचं काय घोड मारलंय. जे गांधी घरण्यासह हे पवार घराण्याला टार्गेट करतायेत. एखाद्या घराण्याला टार्गेट करून शिरूर लोकसभेचे प्रश्न सुटणार आहेत का? असा प्रश्नही यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, नुसते झेंडे लावू नका. रात्री एक दिवसा एक झेंडा. अरे घड्याळाचे बटन दाबा म्हणजे झालं. आता तू तसा नाही हे माहितेय पण इतरांचं काय? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. मावळ गोळीबार प्रकरणात मी दोषी असेल तर मला भर चौकात फाशी द्या. पण आरोप करणारे दोषी निघाले तर त्यांची ही तयारी असावी. असेही अजित पवार म्हणाले.