लोकसभेचे आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. मोदी द्वेषाचे राजकारण करीत असल्याचा आरोप यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस बेरोजगारी, शेतकरी आणि भ्रष्टाचार तसेच नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यांवरुन निवडणूक लढवत आहे. मात्र, मोदींनी प्रचारात द्वेष भावनेचा वापर केला तर आम्ही प्रेमाचा केला. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की यामध्ये प्रेमचं जिंकणार आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी पती रॉबर्ट वढेरा यांच्यासोबत लोधी इस्टेट येथील सरदार पटेल विद्यालयात मतदान केले. मतदानानंतर त्यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, ही खूपच महत्वाची निवडणूक आहे. कारण, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहोत. देशासाठी आमची लढाई सुरु आहे, या सर्व बाबी लक्षात घेऊनच मी मतदान केले आहे.

पंतप्रधान मोदींनी नुकतेच एका निवडणूक रॅलीमध्ये म्हटले होते की, त्यांनी देशासाठी तपश्चर्या केली आहे. यावरुनही प्रियंकांनी मोदींना टीकेचे लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, ५० तासही आपण तपश्चर्या केली तरी त्याचा उल्लेख करायचा नसतो. मोदींनी २ कोटी रोजगाराचा मुद्दा तसेच १५ लाख रुपये जनतेच्या खात्यात जमा करण्याबाबत निवडणूक का लढवली नाही, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

प्रियंका गांधींनी यावेळी मोदींना असाही प्रश्न केला की, ते राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे का देत नाहीत. २०१९ या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.