मी कधीही चहावाला म्हणून स्वत:ची ओळख सांगितली नव्हती. काँग्रेसने चहावाला म्हणून आपली खिल्ली उडवयाला सुरुवात केली तसेच गरीबीच्या नावाखाली मते मागणे आपल्याला कधीही मान्य नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वाराणसीमध्ये आज तकला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

मी इतकी वर्ष मुख्यमंत्री होतो पण चहावाला असल्याचा कधीही उल्लेख केला नाही. जेव्हा काँग्रेस नेत्यांनी माझी खिल्ली उडवयाला सुरुवात केली. चहावाला हा देश कसा चालवू शकतो? तेव्हा हा मुद्दा बनला असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांना जेव्हा चहावाला की चौकीदार तुम्ही कशाला प्राधान्य द्याल असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी गरीबीच्या नावाखाली मते मागणे आपल्याला पटत नाही. आत्मसम्मानाने कसे जगायचे हे मला गरीबांना शिकवायचे आहे. गरीबीमध्ये आहे म्हणून रडणे मला मान्य नाही असे मोदी म्हणाले. चहावाला किंवा चौकीदार हा विषय नाही. काँग्रेसचा अहंकार हा मूळ मुद्दा आहे. ते चायवाला आणि चौकीदार दोन्ही क्षेत्रांकडे अप्रतिष्ठीत या नजरेतून पाहतात असे मोदी म्हणाले.