पिंपरी : मावळ लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, रयत शिक्षण संस्था आणि पुणे जिल्हा सहकारी बँकेचे कर्मचारी मतदार संघात फिरत असून मतदारांना प्रलोभन दाखवत असल्याची तक्रार शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मावळ लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांच्याकडे बारणे यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, रयत शिक्षण संस्था आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक या तीनही संस्था राष्ट्रवादीच्या प्रमुखांशी संबंधित आहेत.

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी या संस्थेचे कर्मचारी मावळ मतदार संघात फिरत आहेत. पत्रके वाटणे, माहिती गोळा करणे, मतदारांना प्रलोभन दाखवणे असे काम हे कर्मचारी करत आहेत, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होतो आहे. या संदर्भात यापूर्वीही तक्रार केली होती. तथापि, तरीही हा प्रकार सुरूच असल्याचे बारणे यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.

भाजपकडून बैठकांचा सपाटा

पिंपरीत शिवसेना-भाजपमधील वितुष्टाच्या पाश्र्वभूमीवर युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी भाजपने बैठकांचा सपाटा लावला आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड आणि पपरी विधानसभा मतदार संघात घेतलेल्या विविध बैठकांमधून ‘झालं गेलं विसरून जा,’ असे आवाहन करत भाजप पदाधिकाऱ्यांना युती धर्माचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचे आवाहन जगतापांनी केले आहे.