लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. निवडणुकांचे टप्पे याच महिन्यात सुरु होत आहेत. महाराष्ट्रातही लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम रंगला आहे. अशात चर्चा आहे ती मावळच्या जागेची. म्हणजेच जिथून पार्थ पवारांना राष्ट्रवादीने तिकिट दिलं आहे त्या जागेची. मावळमध्ये पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या मेळाव्यात पार्थ पवार यांना दीड तास उशीर झाला. पार्थ पवार हे जेव्हा नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने पोहचले तेव्हा त्यांना पाहून अजित पवार तिथून निघून गेले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार असोत किंवा अजित पवार असोत हे दोघेही वेळेच्या बाबतीत पक्के आहेत. पार्थ पवार हे दीड तास उशिरा आल्याने अजित पवार हे त्यांच्याशी काहीही न बोलता निघून गेले. पार्थ पवार यांच उशिरा येणं अजित पवारांना पटलं नाही हेच यातून स्पष्ट झालं. उशिरा आलेल्या पार्थ पवारांनी भाषण करणं टाळलं. याबद्दल विचारलं असता अजितदादांनी जे विचार मांडले तेच माझे विचार असा युक्तिवाद करून त्यांनी वेळ मारून नेली. तसेच विजय शिवतारेंच्या टीकेला कार्यकर्तेच उत्तर देतील असं म्हण वेळ मारून नेली आणि तिथून ते निघून गेले. कामगार मेळाव्याच्या निमित्ताने जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटीलही या वेळी हजर होते.