लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागा वाटपचा पेच अद्याप सुटलेला नाही अशा चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्षांचा सन्मान करु असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे शिंदेंना जितक्या जागा सोडाल तितक्याच आम्हालाही हव्या असा आग्रह अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही धरला आहे. त्यामुळे लोकसभेच्या ४८ जागांचा तिढा कसा सुटणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशात रावसाहेब दानवेंनी भाजपाचे कुठले आणि किती उमेदवार ठरले ती यादीच वाचली आहे.

भाजपाचे नेते रावसाहेब दानवे नाशिकमध्ये

भाजपाचे नेते रावसाहेब दानवे हे आज नाशिकमध्ये होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एक कृती केली ज्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. पत्रकारांनी नाशिकमध्ये रावसाहेब दानवे यांना महायुतीच्या जागावाटपाविषयी विचारलं असता त्यांनी आपल्या खिशात असलेली यादीच वाचून दाखवली. त्यामुळे आता या यादीची चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

“हे कागद आहेत कालचे आहेत, कॅमेरा नको मारुस याच्यावर. धुळे, जळगाव, रावेर, भंडारा, अकोला, गडचिरोली, नाशिक, पालघर, भिवंडी हे सगळ्या महाराष्ट्रातले उमेदवारच आहेत. आमची कालच याबद्दल चर्चा झाली.” असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. ही यादी काही त्यांनी पत्रकारांना दाखवली नाही. पण ही यादी त्यांनी वाचून दाखवली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार लवकरच जाहीर होतील अशी चिन्हं आता आहेत. तसंच रावसाहेब दानवेंच्या या कृतीची चर्चा नाशिकमध्ये चांगलीच रंगली आहे. पत्रकार नाशिकचा उमेदवार कोण हे विचारत होते पण तेदेखील रावसाहेब दानवेंनी काही सांगितलं नाही.

हे पण वाचा- “केसाने गळा कापू नका”, म्हणणाऱ्या रामदास कदमांना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “एकनाथ शिंदेंना..”

कुठल्या पक्षाला किती जागा हा सस्पेन्स कायम

रावसाहेब दानवे हे भाजपातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर धुळे, जळगाव, रावेर, भंडारा, अकोला, गडचिरोली, पालघर, भिवंडी या ठिकाणचे उमेदवार ठरले असण्याची शक्यता आहे. मात्र कुठल्या जागा भाजपा लढणार? कुठल्या शिवसेना आणि कुठल्या राष्ट्रवादीकडे येणार याचा सस्पेन्स मात्र कायम आहे. आज अजित पवार यांना याबाबत विचारलं असता पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे त्यासाठी महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं लक्ष्य आम्ही ठेवलं आहे. लवकरच जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल असं त्यांनी म्हटलं आहे.