Karnataka Assembly Elections : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला तीन दिवस उरले असताना आता एक खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. विद्यमान भाजपा सरकार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याचे षडयंत्र रचत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप सादर केली. ज्यामध्ये चितापूरचे भाजपा उमेदवार मणिकांत राठोड आणि स्थानिक भाजपा पदाधिकारी यांचे संभाषण आहे. ज्यामध्ये खरगे यांची पत्नी आणि मुलांना संपवून टाकेन, असे विधान राठोड याने केले असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला आहे. दरम्यान राठोडने मात्र काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत. सदर ऑडिओ क्लिप खोटी असून त्यातील आरोप बिनबुडाचे आणि खोटे असल्याची प्रतिक्रिया त्याने दिली.

२६ वर्षीय मणिकांत राठोड हा चित्तापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचा उमेदवार आहे. हैदराबाद-कर्नाटक क्षेत्रात असलेल्या या मतदारसंघात मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियंक खरगे विद्यमान आमदार आहेत. राठोड हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपाचे तिकीट मिळण्याआधीच राठोड यांच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. हत्येचा प्रयत्न, अमली पदार्थांची तस्करी, अन्न भाग्य योजनेतील तांदळाची अवैध वाहतूक, बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणे आणि फौजदारी स्वरूपाचा छळ असे अनेक गुन्हे राठोड यांच्यावर दाखल आहेत. आतापर्यंत ४० गुन्हे दाखल असून तीन प्रकरणांत त्यांना दोषी ठरवले गेलेले आहे आणि एक वर्षाचा कारावासदेखील भोगलेला आहे. इतर गुन्ह्यांमध्ये जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आलेली आहे.

दोषी ठरविण्यात आलेल्या तीन गुन्ह्यांपैकी एक गुन्हा २०१३ साली दाखल करण्यात आला. लोकांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेजबाबदार आणि वेगात वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल होऊन यात २,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच २०१५ साली, राज्य सरकारकडून लहान मुलांना वितरित करण्यात येणारी दुधाची भुकटी चोरल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात राठोडला एक वर्षाचा कारावास भोगावा लागला आहे. तसेच २०१५ साली, सरकारी अधिकाऱ्यांना खोटी माहिती पुरविल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन दोन हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता.

हे वाचा >> “सत्तेत आल्यास राज्यात हनुमान मंदिरे बांधू”, काँग्रेसकडून आश्वासन, हनुमानाच्या जन्मस्थळाच्या विकासासाठीही मोठी घोषणा

दहावीपर्यंत शिकलेला राठोड चितापूरच्या गुरमितकल परिसरात राहणारा आहे. या परिसरावर मल्लिकार्जुन खरगे यांचा विशेष प्रभाव असल्याचे सांगितले जाते. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्याने सांगितले की, मागच्या सहा महिन्यांपासून राठोड चितापूर मतदारसंघात तयारी करत होता. पण भाजपा तिकीट देईल, याची त्याला बिलकूल खात्री नव्हती. गावात होणाऱ्या विविध उत्सवांत त्याने हजेरी लावली. स्वतःचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला. तरुणांमध्ये लोकप्रिय होण्याची त्याने एकही संधी सोडली नाही. प्रियंक खरगेंना पराभूत करणे हे आपले ध्येय असल्याचे राठोड याने वारंवार सांगितले आहे. पण भाजपाकडून यंदा तिकीट मिळेल, अशी त्याने बिलकूल अपेक्षा केली नव्हती, अशीही माहिती भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिली.

दरम्यान राठोड मात्र स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेतो. कर्नाटकात गंभीर गुन्ह्यांबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या राठोडवर शेजारील आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्यांतही गुन्हे दाखल झालेले आहेत, अशी माहिती भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याने दिली. राठोड चितापूरमधून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होता, पण कुणालाही वाटले नव्हते की, भाजपा त्याला तिकीट देईल. जेव्हा भाजपाने त्याची उमेदवारी घोषित केली, तेव्हा अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून त्याला विरोध केला. राठोड भाजपाचा पदाधिकारी नसतानाही त्याला तिकीट दिले याबद्दल पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. काहींनी भाजपाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर काहींनी राठोडला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. राठोडने इतर नेत्यांप्रमाणेच दिल्लीत जाऊन स्वतःच्या उमेदवारीबाबत लॉबिंग केले होते. ज्या पदाधिकाऱ्याने ही माहिती दिली त्याने पुढे सांगितले की, आम्ही राठोडसारख्या गुन्हेगारासाठी मत मागू शकत नाही. त्यामुळे मी पक्ष सोडला.

हे ही वाचा >> देशकाल : कर्नाटकात काँग्रेसची ‘हवा’; कारण..

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चित्तापूर विधानसभेत प्रचार करणार होते. मात्र राठोडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मिळाल्यानंतर कर्नाटक भाजपाने हा दौरा रद्द केला. निवडणुकीच्या तोंडावर कोणताही वाद अंगलट येऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. चितापूर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. राठोड हा बंजारा या अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करतो. चितापूरमध्ये कोळी समुदायाची मते विजय मिळविण्यासाठी निर्णायक ठरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोव्हेंबर २०२२ मध्ये, राठोडने विद्यमान आमदार प्रियंक खरगे यांना ठार मारण्याची धमकी दिल्याबद्दल कलबुर्गी येथे गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यात राठोडला हैदराबाद येथून ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणात कालांतराने त्याला जामीन मिळाला. उमेदवारी अर्ज भरत असताना निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात राठोडने त्याच्याकडे ११.३४ कोटींची जंगम मालमत्ता आणि १७.८३ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. तर १५.३३ कोटींचे कर्ज असल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्थावर मालमत्तेमध्ये- विशेषतः जमीन, राईस मिल आणि हैदराबाद, कलबुर्गी, महाराष्ट्रातील ठाणे येथील फ्लॅटचा समावेश आहे.