लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. आता या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. निकालाच्या आधी एक्झिट पोल समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, दुसरीकडे इंडिया आघाडी सत्ता स्थापन करेल, असा विश्वास विरोधी पक्षातील नेत्यांनी केला आहे. यासंदर्भातील चित्र ४ जून रोजी स्पष्ट होईल.

त्याआधी एक्झिट पोल आणि निवडणुकीचा निकाल काय लागेल? याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही निकालाची वाट पाहत आहोत. आम्हाला खूप आशा आहे की, निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असलेल्या विरुद्ध असतील”, असं सोनिया गांधी यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीए आघाडी देशात ३५० पार करेल असा अंदाज एक्झिट पोलची आकडेवारी सांगत आहे. सरकार स्थापन करण्यासाठी २७२ जागांवर यश मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे हा आकडा महायुती पार करेल, असा अंदाज एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार समोर आला आहे. तर इंडिया आघाडीचा धुव्वा उडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया कशी असेल? निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली महत्त्वाची माहिती

एक्झिट पोलने असा अंदाज वर्तवला असला तरीही वास्तविक इंडिया आघाडी एक्झिट पोलमध्ये २९५ जागा मिळवणार असल्याचा दावा इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भाष्य करत इंडिया आघाडी २९५ जागांवर विजयी होईल, असं म्हटलं आहे. एकीकडे भाजपाचा सत्ता स्थापनेचा दावा आणि दुसरीकडे इंडिया आघाडीचाही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे ४ जून रोजी निकाल समोर आल्यानंतरच केंद्रात सरकार कोणाचं स्थपान होणार? हे स्पष्ट होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. १८ जागांवर भाजपा, शिवसेना ठाकरे गटाला १४ जागा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ तर काँग्रेसला ५ जागा, शिंदे गटाला ४ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज विविध एक्झिट पोलने वर्तवलेला आहे. मात्र, एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचंही म्हटलं आहे. तसेच एक जागा अपक्षाला मिळणार असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? महायुतीला जास्त जागा मिळतात की महाविकास आघाडीला मिलतात,हे उद्या स्पष्ट होणार आहे.