लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त मतं मिळवण्यासाठी मतदारांना आश्वासनं देत आहेत, विकासकामांच्या आणि निधीच्या घोषणा करत आहेत. अनेक पक्ष साम-दाम-दंड-भेद हे धोरण राबवत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमधील सरपंचांना मतांसाठी सज्जड दम भरल्याचं प्रकरण ताजं असतानाच भाजपाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरचे खासदार आणि उमेदवार संजय मंडलिकांसाठी अनोखी शर्यत (पैज) लावली आहे. कागलमधील प्रचारसभेत बोलताना धनंजय महाडिक यांनी संजय मंडलिकंना लीड (मताधिक्य) द्या आणि पाच कोटींचा निधी मिळवा अशी ऑफर तालुक्यातील रहिवाशांना दिली आहे.

धनंजय महाडिक यांनी कागल आणि चंदगड या दोन तालुक्यांमध्ये अनोखी शर्यत लावली आहे. महाडिक म्हणाले, कागल तालुक्यात हसन मुश्रीफ आणि स्वतः संजय मंडलिक आहेत. तर चंदगड तालुक्यातही चांगली परिस्थिती आहे. यामुळे संजय मंडलिक यांना कोणत्या तालुक्यातून जास्त मताधिक्य मिळतंय पाहू. मी सर्वांना आवाहन करतो की चंदगड तालुक्यापेक्षा तुम्ही (कागल) जास्त लीड दिलं तर पाच कोटी रुपयांचा अधिकचा निधी देऊ. चला तर मग लागली शर्यत… यामध्ये मी आणि संजय मंडलिक आम्ही दोघेही आहोत. मी अडीच कोटींचा निधी देणार आणि संजय मंडलिक अडीच कोटी देतील. या शर्यतीत आम्ही दोघे आहोत हे ध्यानात ठेवा, नाहीतर तुम्ही उद्या मला एकट्याला धराल.

धनंजय महाडिक म्हणाले, राज्यात आणि देशात आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे. हे सरकार म्हणजे आपलं सरकार आहे. जो कोणी जे काही मागेल ते इथे मिळेल.

हे ही वाचा >> नितेश राणेंचा मतांसाठी सरपंचांना सज्जड दम; बावनकुळे पाठराखण करत म्हणाले, “चांगलं आहे, ते काही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नितेश राणे आणि धनंजय महाडिकांच्या वक्तव्यांवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे यांनी या दोन्ही नेत्यांची पाठराखण केली आहे. बावनकुळे म्हणाले, चांगलं आहे, ते काही अमिष दाखवत नाहीत. त्यांनी केवळ विकासाचा प्रश्न मांडलाय. आम्ही काही सन्यासी नाही आहोत. त्यांचं वक्तव्य आम्हाला मान्यच आहे. आम्ही भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी आहोत. सहाजिकच आम्हाला वाटतं की, आम्ही समाजासाठी एवढं काम करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण आयुष्य देशाला, समाजाला आणि जनतेला दिलं आहे, त्यामुळे सहाजिकच आम्हाला वाटतं की अमुक गावातून आम्हाला मतं मिळायला हवीत.