उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या आघाडीने मोठे आव्हान उभे करूनही भाजपा सत्ता राखेल, असा अंदाज एग्झिट पोलने वर्तवला आहे. पंजाबमध्ये सत्तांतर होण्याचे संकेत असून तिथे आप सत्तेत येईल असं चित्र सध्या तरी एग्झिट पोलमध्ये दिसत आहे. उत्तराखंड आणि गोव्यात त्रिशंकू स्थिती राहील तर मणिपूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा कल एग्झिट पोलमधून दिसतो. आता या पाच राज्यांचा कौल काय, हे १० मार्चला स्पष्ट होईल. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हे एग्झिट पोलचे अंदाज खोटे ठरतील असं मत व्यक्त केलंय.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी “एग्झिट पोलवर जाऊ नका. यापूर्वीही याचा फज्जा उडाल्याचा बघितलं आहे. १० तारखेला प्रत्यक्ष मतपेटीतून काय बाहेर येतं त्यावर मत व्यक्त करुयात. या देशातील अनेक राज्यांमध्ये प्रस्थापितांविरुद्ध राग आहे आणि तो मतपेटीतून स्पष्ट दिसेल. एग्झिट पोल खोटे सिद्ध होतील असा मला विश्वास आहे,” असं म्हटलंय. राऊत यांनी थेट कोणत्याही निवडणुकीचा संदर्भ दिला नसला तरी मागील काही वर्षांमध्ये अनेक वेळा असं घडलं आहे की जेव्हा एग्झिट पोलचे अंदाज चुकले असून त्या पोलऐवजी वेगळेच निकाल समोर आलेत. असं कधी कधी झालंय पाहुयात…

jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Household Consumption Expenditure Survey report
विश्लेषण : दरडोई घरगुती खर्च किती वाढतो आहे?
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित

२०१५ तसेच २०२० मधील दिल्ली विधानसभा निवडणूक

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वर्षभरानंतर दिल्लीत विधानसभा निवडणूक पार पडली. केंद्रातील मोदी सरकारसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची समजली जात होती. दिल्लीत भाजपा विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आप अशी तिरंगी लढत होती. मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर जनतेला काय वाटते, या दृष्टीने भाजपासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. तर दिल्लीत स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची संधी आपकडे होती आणि १५ वर्षांच्या सत्तेनंतर दिल्लीत काँग्रेसची स्थिती काय आहे, हे या निवडणुकीतून समोर येणार होते. बहुसंख्य एग्झिट पोलमध्ये दिल्लीत आम आदमी पक्षाचा विजय होणार असे म्हटले होते. मात्र, ‘आप’कडे काठावरचे बहुमत असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा आहेत. पण दिल्लीत एग्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे चुकले. आम आदमी पक्षाने ४० ते ४५ ऐवजी तब्बल ६७ जागांवर विजयी मिळवला. ‘आप’ ला एग्झिट पोलमधील अंदाजापेक्षा तब्बल २२ जागा जास्त मिळाल्या.

नक्की वाचा >> विश्लेषण: Exit Poll म्हणजे काय? त्याचा अंदाज कसा व्यक्त केला जातो? ओपिनियन पोल कशाला म्हणतात?

असाच प्रकार २०२० साली घडला होता. यावेळी भाजपा आपला थेट टक्कर देईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तसं काहीही घडलं नाही. अरविंद केजरीवाल यांची मतदारांवरील जादू कायम असल्याचं या निवडणुकीतून स्पष्ट झालं. भाजपा दुहेरी आकडा गाठेल असा अंदाज अनेक एग्झिट पोलने व्यक्त केलेला. मात्र भाजपाला ८ जागांहून पुढे मजल मारता आली नाही. केजरीवाल यांच्या आपने ६२ जागा जिंकल्या.

बिहारमध्ये चुकलेला अंदाज

बिहारमध्ये २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही एग्झिट पोलचे अंदाज चुकले होते. त्यावेळी बिहारमध्ये भाजपा विरुद्ध महाआघाडी अशी लढत होती. महाआघाडीत नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश होता.

महाआघाडीची भिस्त नितीशकुमार यांच्यावर होती. तर बिहारमध्ये भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपा ही निवडणूक लढवत होती. विशेष म्हणजे त्यावेळी नितीशकुमार आणि नरेंद्र मोदींमधील संबंधांमध्ये तणाव होता. त्यामुळे दिग्गजांच्या या लढाईत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा आहेत. एग्झिट पोलमधील अंदाजात भाजपाप्रणित ‘एनडीए’ला १०० ते १२७ जागा आणि महाआघाडीला त्या पेक्षा कमी जागा मिळतील, असे म्हटले होते. पण निकालात एग्झिट पोलचे अंदाज चुकल्याचे स्पष्ट झाले. भाजपाप्रणित एनडीएला फक्त ५८ जागांवर समाधान मानावे लागले. तर महाआघाडीने १७८ जागा जिंकून बहुमताचा आकडा सहज ओलांडला होता. सहा पैकी दोन एग्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तरी चार एग्झिट पोलचे अंदाज चुकले होते. विशेष म्हणजे अंदाज चुकल्याने ‘चाणक्य’ या एग्झिट पोलमधील ख्यातनाम संस्थेला दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.

२००४ मध्ये वाजपेयींचा एग्झिट पोलमध्ये विजय, पण प्रत्यक्ष निकालात पराभव

२००४ मध्ये भाजपाने ‘इंडिया शायनिंग’ ही मोहीम राबवत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले होते. त्यावेळी एग्झिट पोलमध्ये वाजपेयी सरकारला दुसरी टर्म मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भाजपाप्रणित एनडीएला ५४३ पैकी २३० ते २७५ जागांवर विजय मिळणार, असे एग्झिट पोलमध्ये म्हटले होते. पण मतमोजणीच्या दिवशी एग्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकल्याचे स्पष्ट झाले. ‘इंडिया शायनिंग’ ही मोहीम भाजपाला विजय मिळवू देऊ शकली नाही. भाजपाप्रणित एनडीएला फक्त १८५ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसप्रणित यूपीएला तब्बल २१८ जागांवर विजय मिळाला. निकालानंतर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, डावे पक्ष यांनी काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा दिला होता.

या काही महत्वाच्या निवडणुकांमध्ये एग्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकल्याचे दिसत असले तरी अनेक निवडणुकांमध्ये एग्झिट पोलचे अंदाज खरे ठरले होते. त्यामुळे एग्झिट पोलवर पूर्णपणे अविश्वास दाखवणेही चुकीचे ठरु शकते.