तीन आठवड्यांपूर्वी कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. राजीनामा देताना त्यांनी कोणत्याही प्रकारे राजकीय भवितव्याबाबत भाष्य केलं नव्हतं. मात्र, दोनच दिवसांत आपण भारतीय जनता पक्षामध्ये जात असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच, यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांवर टीकास्रही सोडलं. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली होती. आता त्यांच्या नावाचा भाजपानं उमेदवारांच्या यादीत समावेश केला आहे.

कोण आहेत अभिजीत गंगोपाध्याय?

अभिजीत गंगोपाध्याय हे कोलकाता उच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ न्यायमूर्तींपैकी एक होते. त्यांनी कारकिर्द पूर्ण होण्याआधीच पदाचा राजीनामा दिल्यामुळे तेव्हा मोठी चर्चा झाली होती. पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दबाव येत असल्याचा दावा त्यांनी राजीनामा देताना केला होता. त्यामुळे ते भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता त्यांच्या राजीनाम्याआधीच वर्तवली जाऊ लागली होती. अखेर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश घेत असल्याचं जाहीर केलं.

काय म्हणाले होते अभिजीत गंगोपाध्याय?

अभिजीत गंगोपाध्याय यांनी भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचं सांगताना तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला हे करायला भाग पाडल्याचा दावा केला होता. “मला हे पाऊल उचलण्यासाठी भाग पाडलं गेलं. सत्ताधारी पक्षाकडून वारंवार मारल्या जाणाऱ्या टोमण्यांमुळे मी हा निर्णय घेतला. त्यांच्या विधानांमुळे मला हे पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळाली. सत्ताधारी पक्षाने अनेक वेळा माझा अवमान केला आहे. त्यांच्या प्रवक्त्यांनी असंसदीय शब्द उच्चारून माझ्यावर हल्ला केला आहे. मला वाटतं त्यांची शिक्षणाची मोठी समस्या आहे”, असं ते म्हणाले होते.

“मी भाजपात जातोय”, राजीनाम्याच्या काही तासांत कोलकात्याचे माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांची घोषणा!

“मला अनेकदा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून जनतेमध्ये उतरून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं गेलं आहे. त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा मी विचार केला”, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

पश्चिम बंगालमधून मिळाली उमेदवारी

दरम्यान, आता अभिजीत गंगोपाध्याय समोरासमोर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर व उमेदवारांवर हल्लाबोल करताना दिसणार आहेत. भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगालमधील तामलुक लोकसभा मतदारसंघातून अभिजीत गंगोपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे तामलुक हा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा प्रभाव असणारा मतदारसंघ मानला जातो. २००९ च्या निवडणुकांपासून तिथे तृणमूलचाच उमेदवार निवडून येत आहे.