लोकसभा निवडणूक देशभरात सात टप्प्यांमध्ये तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. १९ एप्रिलपासून मतदान प्रक्रिया सुरु होते आहे. १ जून पर्यंत सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. तर ४ जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. लोकसभा निवडणुकी भाजपा आणि एनडीएने ४०० पारचा नारा दिला आहे. तर इंडिया आघाडीने भाजपाला २०० जागाही मिळणार नाहीत आमचीच सत्ता येईल असं म्हटलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एबीपी माझा आणि सी व्होटर्सचा सर्व्हे समोर आला आहे. त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

काय आहे एबीपी सी व्होटर्सचा मुंबईविषयीचा सर्व्हे?

एबीपी माझा सी व्होटर्सच्या ओपिनियन पोलनुसार ठाकरे गटाला राज्यातल्या नऊ जागांवर विजय मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई आणि ठाण्यात पक्षाला धक्का बसणार असल्याचं चित्र या पोलमध्ये दिसतं आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेने सर्वाधिक जागा आपल्याकडे ठेवल्या आहेत. तसंच मुंबईतल्या जागाही आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. मात्र एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार मुंबईतल्या सहापैकी सहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आहे. जागावाटपात मुंबईतल्या चार जागा ठाकरेंच्या सेनेकडे आणि दोन जागा काँग्रेसकडे आहेत. ओपिनयन पोलनुसार दक्षिण मुंबई आणि ईशान्य मुंबईत चुरशीची लढत होऊ शकते असा अंदाज आहे. पण मुंबईतल्या सहाच्या सहा जागा महायुती जिंकेल अशी शक्यता या ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा- Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?

मुंबईतल्या सहा जागांवर महायुतीचा विजय

मुंबईतील उत्तर-मुंबई लोकसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड मानला जातो. या मतदारसंघातून भाजपाने पियूष गोयल यांना तिकिट दिलं आहे. त्यामुळे एबीपी सी व्होटर्सच्या अंदाजानुसार भाजपाचा इथला विजय हा निश्चित मानला जातो आहे. दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचं पारडं जड मानलं जात होतं. मात्र ओपिनयन पोलनुसार ठाकरे गटाचे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि अमोल किर्तीकर या तिघांचाही पराभव होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे भाजपाच्या मिहिर कोटेचा यांना काँटे की टक्कर देऊ शकतात. असाही अंदाज आहे. एबीपी आणि सी व्होटर्सचा हा पोल उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा आहे.

काय सांगतो एबीपी सी व्होटर्सचा सर्व्हे?

महाराष्ट्रात एकूण ४८ जागांसाठी निवडणूक पाच टप्प्यांमध्ये पार पडते आहे. भाजपाने ४५ हून जास्त जागांवर दावा केला आहे. मात्र एबीपी सी व्होटर्सच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी महायुतीला ३० जागा तर महाविकास आघाडीला १८ जागा मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे भाजपा आणि महायुतीचं मिशन ४५ प्लसचं स्वप्न भंगू शकतं असं हा ओपनियन पोल सांगतो आहे. प्रत्यक्षात काय होणार ते ४ जून रोजी स्पष्ट होईल. मात्र ओपनियन पोलनुसार जी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची चिंता आणि मुंबईत ठाकरेंचं टेन्शन वाढणार हे दिसून येतं आहे.