Baramati Loksabha Election Result : देशात नुकतीच १८ व्या लोकसभेसाठी निवडणुक पार पडली आणि आज या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार आणि कोणाच्या हातात देशाची सुत्रे येणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. पक्षा-पक्षामध्ये फूट पडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ही लोकसभा निवडणूक अधिक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट महायुतीमधून तर शरद पवार गट महाविकास आघाडीतून निवडणूक लढवित आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनुसार शरद पवार गट आघाडीवर आहे. यावर शरद पवार गटातील नेते आनंद व्यक्त करत समाज माध्यमांवर प्रतिक्रिया देत आहे.

याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी अजित पवारांना टोला लगावला. त्यांनी लिहिलेय, ” बच्चा बडा हो गया! काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय!”

त्यांनी पुढे लिहिलेय, “बारामतीत सुप्रियाताईंचा विजय हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे.या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन!”

हेही वाचा : “मी स्मृती इराणींविरोधात निवडणूक लढलो नाही, तर…”; अमेठीत आघाडीवर असलेल्या काँग्रेस उमेदवाराची प्रतिक्रिया

पाहा पोस्ट

अठराव्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गट हे महायुतीमधून तर शरद पवार गट हे महाविकास आघाडीतून निवडणूक लढवित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १९ जागांवर निवडणूक लढविली होती. यापैकी बारामतीमधून सुप्रिया सुळे, रायगडमधून सुनील तटकरे, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे आणि साताऱ्यात उदयनराजे भोसले यांचा विजय झाला होता. दोन महिन्यांनी उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील विजयी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला महाविकास आघाडीमध्ये केवळ १० जागा मिळू शकल्या. दोन गटात फूट पडल्यानंतर शरद पवारांकडे सुप्रिया सुळे, श्रीनिवास पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे हे तीन विद्यमान खासदार उरले आहेत. तर अजित पवार गटाकडे सुनील तटकरे हे निवडून गेलेले एकमेव खासदार आहेत. महायुतीमधून निवडणूक लढवित असताना अजित पवार यांना मात्र जागावाटपात फार यश मिळाले नाही. रायगड, शिरूर, बारामती आणि धाराशिव हे चार मतदारसंघ त्यांच्या वाट्याला आले. त्यातही शिरूर आणि धाराशीवमध्ये त्यांना शिंदे गट आणि भाजपामधून उमेदवार आयात करावे लागले. बारामती आणि शिरूर या दोन मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत होत आहे. या दोन जागांचा निकाल दोन्ही गटांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो.