पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिंदूहृदयसम्राट होण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी केली. ते लोकसत्ताच्या लोससंवाद कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी राज्याच्या राजकारणातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली.

“गेल्या १० वर्षांत काय केले हे सांगण्यासाठी भाजपाकडे कोणतेही मुद्दे नाहीत. प्रत्येक वेळी निवडणुका आल्यावर असे मुद्दे उकरून काढण्याची भाजपाला सवयच आहे. आमच्यावर ‘व्होट जिहाद’चा आरोप केला जातो. पण भाजपकडून ‘व्होट गद्दार’ केले जाते त्याचे काय?” असा सवाल ठाकरे यांनी केला.

“शिवसेनेला हिंदुत्व शिकविण्याचा कोणी प्रयत्न करू नये. मोदींना हिंदुहृदयसम्राट व्हायचे आहे. पण हिंदुहृदयसम्राट एकच व ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. जनतेने त्यांना ही पदवी दिली होती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, भाजपा आणि संबंध परिवारात मूळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे आता असते तर दुसरा हिंदूहृदयसम्राट बनण्याचा प्रयत्न झाला असता का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट होता येत नाही ही तर त्यांची पोटदुखी आहे. त्यातूनच त्यांनी शिवसेना फोडली. त्याच शिवसेनाप्रमुखांचे छायाचित्र वापरून मते मागण्याची वेळ भाजपा आणि मोदी यांच्यावर आली.”

तसंच, नुसतं बाळासाहेब बाळासाहेब करू नका. बाळासाहेब ठाकरे तुमचे वर्गमित्र होते का? तुम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब म्हणा”, असा सल्लाही त्यांनी भाजपाला दिला. “उद्या कोणी हिंदूहृदसम्राट होणार नाही, असं मी म्हणत नाही. पण बाळासाहेब ठाकरे नाटकं करून हिंदूहृदयसम्राट झाले नव्हते. जनतेने त्यांना सन्मानाने आणि प्रेमाने ही पदवी दिली होती”, असंही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा >> “मुस्लिमांकडे जेवल्यानंतर गोवंश हत्याबंदी कशी केली?” ठाकरेंचा मोदींना उपरोधिक टोला; म्हणाले, “मी ताजिया मिरवणुकीत…”

गद्दारांना दरवाजे बंद

लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यास विधानसभा निवडणुकीच्या वेळी पक्ष सोडून गेलेले काही जण पुन्हा परत येण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी त्यांना पक्षात पुन्हा प्रवेश देण्यात येणार का, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ‘माझ्याबरोबर निष्ठावान राहिलेल्यांवर तो अन्याय ठरेल. काही जण अटकेच्या भीतीने पळून गेले. पण संजय राऊत तुरुंगात गेले. सूरज चव्हाणसारखा आमचा कार्यकर्ता आज तुरुंगात आहे. ते बधले नाहीत. चव्हाण यांना ज्या आरोपावरून अटक झाली त्या कंपनीचा मालक आज शिंदे यांच्याबरोबर उजळमाथ्याने फिरत आहे. त्याच्या विरोधात काही कारवाई नाही. तेव्हा गद्दारांना पक्षाचे दरवाजे बंद झाले आहेत.’

हेही वाचा >> “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू….”, वरून झालेल्या आरोपांवर उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रमोद महाजन असते तर!

कल्याणमध्ये गद्दाराच्या मुलाला निवडून देण्याचे आवाहन करण्यासाठी मोदी यांनी सभा घेतली. पण महाराष्ट्रात भाजपची पाळेमुळे रुजविण्यासाठी खस्ता खाललेल्या प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर भाजपची मंडळी देत नाहीत. भाजप नेते प्रमोद महाजन आज हयात असते तर नरेंद्र मोदी यांचा उदयच झाला नसता आणि महाजन हेच पंतप्रधान झाले असते, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. प्रमोद महाजन हे एक वेगळ्या उंचीचे नेते होते. भाजपच्या वाढीत त्यांचे मोठे योगदान होते. दुर्दैवाने याच भाजपने महाजनांची कन्या पुनम महाजन यांना उमेदवारी नाकारली, असे ठाकरे म्हणाले.