साताऱ्यात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे असा दुरंगी सामना साताऱ्यात रंगणार आहे. साताऱ्यातली ही निवडणूक नक्कीच रंगतदार ठरणार आहे. कारण २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी पावसात भिजत सभा घेतली होती. त्यानंतर सगळं चित्र पालटलं होतं.

२०१९ मध्ये काय घडलं होतं?

२०१४ आणि २०१९ अशा दोन्ही निवडणुकांच्या वेळी उदयनराजे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरच लढले होते. २०१९ ची निवडणूक जिंकल्यानंतर काही महिन्यांतच उदयनराजे यांनी खासदारकी सोडली आणि राजीनामा देऊन भाजपात जाणं पसंत केलं. रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली तेव्हा शरद पवार पावसात भिजले आणि त्यांनी त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांना जिंकून द्या असं आवाहन केलं. २०१९ ला उमेदवारी देताना चूक झाली असंही त्यांनी उदयनराजेंच्या बाबतीत म्हटलं होतं. त्यामुळे ही निवडणूक उदयनराजे हरले होते. उदयनराजेंच्या त्या पोटनिवडणुकीत ८७ हजार मतांनी पराभव झाला होता. आता भाजपाने उदयनराजेंना पुन्हा लोकसभेची उमेदवारी उदयनराजेंना दिली आहे. ज्यानंतर कॉलर उडवत उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे पण वाचा- साताऱ्यात उदयनराजेंचीच कॉलर टाईट! भाजपाने जाहीर केली लोकसभेची उमेदवारी

काय म्हणाले उदयनराजे?

“मला उमेदवारी मिळणारच होती, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना राबवली. तोच विचार आम्ही पुढे नेत आहोत आणि लोकांची सेवा करत आहोत. तरुण, माता-भगिनींचं प्रेम यांची साथ मला मिळाली. मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की उमेदवारी मिळणार. कोण काय बोलतं त्याकडे मी लक्ष देत नाही. आत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जे सरकार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार राबवणारे सरकार आहे.” असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

मोदी सरकार आणि महायुती सरकारचं कौतुक

माझे मित्र आणि माजी मुख्यमंत्री तसंच आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चांगल्या विकासाची कामं महाराष्ट्रात झाली असं म्हणत उदयनराजेंनी महायुतीच्या सरकारचं कौतुक केलं आहे. जेव्हा अस्थिर सरकार असतं तेव्हा प्रत्येकजण दबाव टाकत असतं. त्यामुळे निर्णय घेताना अडचणी येत असतात. केंद्रात आणि राज्यात खंबीर सरकार आहे. विकासकामं होत आहेत, झाली आहेत. लोकांना अपेक्षित असलेली त्यांची हिताची कामं या सगळ्यांकडून केली जातील असा मला विश्वास वाटतो. असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.