सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. अखेर, आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून समाधान न झाल्याने त्यांनी दिल्लीत धाव घेतली होती. दिल्लीतील अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरही उमेदवारी लांबणीवर पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते . उमेदवारी लांबल्याने त्यांच्या समर्थकांच्या नाराजीत भर पडली. उदयनराजे भोसले यांना सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी भाजपमधून विरोध असल्याची चर्चा होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांना सातारा आणि माढा मतदारसंघांवर दावा केला होता. मात्र माढा मतदारसंघाची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना अगोदर जाहीर करण्यात आली. साताऱ्याची जागा अजित पवार गटाने हक्काने मागून घेतली आहे. त्यांचा उमेदवार तयार असतानाही उदयनराजे यांनी शक्ती प्रदर्शन करत प्रचाराला सुरुवात केली. अजित पवार गटा कडून उदयनराजेंना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असे सांगण्यात आले. धनंजय मुंडे यांनी तसा निरोप दिला. मात्र उदयनराजे भाजपच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम होते. अजित पवार जागा सोडायला तयार नव्हते आणि उदयनराजे ठाम असल्यामुळे भाजपची अडचण झाली होती. अखेर महायुतीने त्यांना उमेदवारी जाहीर केली.

हेही वाचा >> “राजेंबद्दल आम्ही प्रजा…”, उदयनराजेंच्या उमेदवारीवर शरद पवारांची प्रतिक्रिया, भाजपाला टोला

म्हणून उमेदवारी जाहीर व्हायला लागला वेळ

उदयनराजे यांची राज्यसभेची मुदत अजून शिल्लक आहे. भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांना राज्यसभेतूनच पक्ष संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत विचार करता येईल परंतु आपण साताऱ्याच्या जागेचा हट्ट सोडावा असे सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे पक्षश्रेष्ठींचा निरोप घेऊन भाजपने गिरीश महाजन साताऱ्यात येऊन उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंना भेटून गेले. भाजप पक्षश्रेष्ठींच्या निरोपानंतरही उदयनराजे कमळ या चिन्हावर निवडणूक मिळविण्यासाठी अडून राहिल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नाराज होते. त्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला.

अजित पवार गटाची भूमिका ठरणार निर्णायक

उदयनराजेंना उमेदवारी भाजपाकडून मिळाली तर राष्ट्रवादी चे दोन्ही गट शशिकांत शिंदेंना मदत करतील अशी भीती भाजपाला होती. राष्ट्रवादीचे नेते वेगवेगळे झाले असले तरी कार्यकर्ते मात्र एकत्रच आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भाजपा कोणाची नाराजी आणि जोखीम ओढून घ्यायला तयार नाही. त्यामुळे अजित पवार गट आता उदयनराजेंना समर्थन देतात की शशिकांत शिंदेना मदत करणार हे पाहावं लागणार आहे.