मृतक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष लाल बिहारी हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात वाराणासीतून निवडणूक लढणार आहेत. आजमगढ जिल्ह्यातील मुबारकपूर मध्ये असलेल्या अमीलो गावाचे ते रहिवासी आहेत. मृतक संघाच्या बॅनवरच ते लढणार आहेत. त्यांनी निवडणूक लढण्याची तयारीही सुरु केली आहे.

लाल बिहारी यांनी काय म्हटलं आहे?

पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवून मी माझ्या लढ्याला एक दिशा देण्याचं काम करणार आहे. पेशाने शेतकरी असलेल्या लाल बिहारी यांना सरकारी बाबूंनी १९७२ मध्ये कागदोपत्री मृत घोषित केलं होतं. त्यांच्या नातेवाईकांनी लाल बिहारी यांचा मृत्यू झाला आहे असं भासवून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन लाल बिहारी यांची जमीन लाटली होती.

लाल बिहारी मृतक यांचा प्रदीर्घ संघर्ष

लाल बिहारी यांनी स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी यंत्रणेविरोधात आपला संघर्ष सुरु केला. लाल बिहारी यांनी १९८८ मध्ये व्ही.पी. सिंह यांच्याविरोधात तर १९८९ मध्ये राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली. १९ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर त्यांना १९९४ मध्ये न्याय मिळाला. कोर्टाच्या आदेशानंतर तहसीलदार कार्यालयाने कागदपत्रांमध्ये दुरुस्ती केली आणि लाल बिहारी जिवंत आहेत हे मान्य केलं. लाल बिहारी यांच्या प्रकरणाची सुनावणी सुरु होती तेव्हा त्यांना लाल बिहारी मृतक हजर व्हा असं संबोधलं जात असे. त्यामुळे त्यांनी लाल बिहारी मृतक हे नाव कायम ठेवलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कागज चित्रपटही चर्चेत

लाल बिहारी मृतक यांच्या आयुष्यात घडलेल्या या घटनेवर कागज नावाचा चित्रपटही आला होता. पंकज त्रिपाठी या कलाकाराने त्यात लाल बिहारी मृतक यांचं पात्र साकारलं होतं. लाल बिहारी म्हणतात, मी जिवंत असतानाही मला मृत घोषित करण्यात आलं. तहसीलदार कार्यालय आणि जिल्हा प्रशासन यांच्याशिवाय मी इतरही कार्यालयांचा दरवाजा न्याय मिळण्यासाठी ठोठावला. पण मला १९ वर्षे न्याय मिळाला नाही त्यामुळेच मी मृतक संघाची स्थापना केली. माणसाला त्याचे मूलभूत अधिकार मिळावेत म्हणून मी हा संघ स्थापन केला. तसंच लाल बिहारी असंही म्हणाले की मला ठाऊक आहे मी ज्यांच्याविरोधात लढतो त्यांच्या विरोधात निवडून येत नाही. पण निवडणुकीच्या वेळी लोकांना समजतं की एका जिवंत माणसाला कसं मृत घोषित केलं गेलं. त्याला न्याय मिळण्यासाठी किती संघर्ष करावा लागला. आता हेच लाल बिहारी मृतक मोदींविरोधात लढणार आहेत.