आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देशपातळीवर आता चौथी यादीही जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांचाही समावेश आहे. मागच्या यादीत काँग्रेसने महाराष्ट्रातील सात जणांना उमेदवारी दिली होती. महत्त्वाचं म्हणजे, यंदाच्या यादीत काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात तगडा उमेदवार जाहीर केला आहे.

यंदा लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही घटकपक्ष महाविकास आघाडीतून एकत्र लढणार आहेत. यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसल्याने महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जाहीर झालेला नाही. परंतु, असे असले तरीही काँग्रेसने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातील चार उमेदवारांची नावे आहेत.

नव्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे

रामटेक – रश्मी बर्वे
भंडारा-गोंदिया – प्रशांत पडोळे
नागपूर – विकास ठाकरे
गडचिरोली – नामदेव किरसान

दरम्यान काँग्रेसने जाहीर केलेल्या या यादीत देशभरातील ४६ जणांची नावे आहेत. यामध्ये दिग्विजय सिंग, कार्ति चिदंबरम यांचीही नावे आहेत.

हेही वाचा >> लोकसभेसाठी काँग्रेसची यादी जाहीर, महाराष्ट्रात सात जागांवर ‘या’ उमेदवारांना संधी; पुण्यातून कोण रिंगणात?

महाराष्ट्रातील पहिल्या यादीत कोणाची नावे?

२१ मार्च रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत ५७ जणांची नावे जाहीर करण्यात आली होती. तर यामध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांची नावे होती. लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. शिवाजीराव काळगे, सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज, नंदूरबार लोकसभा मतदारसंघातून गोवल पाडवी, अमरावती लोकसभा मतदारसंघातून बळवंत वानखेडे, नांदेड लोकसभा मतदारसंघातून वसंतराव चव्हाण, पुणे लोकसभा मतदारसंघातून रविंद्र धंगेकर उमेदवारी देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण?

आतापर्यंत काँग्रेसने ११ जणांना उमेदवारी देऊ केली आहे. महाराष्ट्रातून संसदेत ४८ सदस्य आहेत. त्यापैकी ११ जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने उर्वरित ३७ जागांवर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीत विभागला गेला आहे. तसंच, यापैकी काही जागा काँग्रेसच्याही वाट्याला जाऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीत नक्की कोणता पक्ष मोठा भाऊ ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.