महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांचा दबाव झुगारत विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे. विशाल पाटील सांगलीतून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांविरोधात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू केला आहे. विशाल पाटलांना या निवडणुकीसाठी ‘लिफाफा’ हे चिन्हदेखील मिळालं आहे. विशाल पाटील यांनी आज (२३ एप्रिल) त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारसाहित्याचं वाटप केलं. सांगलीत भाजपा उमेदवार आणि विद्यमान खासदार संजयकाका पाटील, ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि विशाल पाटलांमध्ये तिरंगी लढत होणार आहे.
विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी काँग्रेसने विशाल पाटलांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मविआ नेत्यांनीदेखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दरम्यान, पक्षाविरोधी भूमिका घेतल्यामुळे काँग्रेस पक्ष विशाल पाटलांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना विशाल पाटलांना कारवाईचा इशारा दिला आहे.
नाना पटोले म्हणाले, धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. लोकांनीदेखील तसा निर्णय घेतला आहे. मतांचं विभाजन होऊ देणार नाही असं लोकांनीच ठरवलं आहे. त्याचे चांगले परिणाम तुम्हाला आगामी काळात दिसतील.
विशाल पाटलांच्या उमेदवारीबाबत नाना पटोले म्हणाले, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. आम्ही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी माघार घेतलेली नाही. त्यांना कोणीतरी फूस लावतंय असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. येत्या २५ एप्रिल रोजी आमची सांगलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतले जातील.
संजय राऊतांचा रोख विश्वजीत कदमांकडे
दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनीदेखील यापूर्वी अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं. पलुस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम हे विशाल पाटलांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. तसेच कदम आणि पाटील सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी दोन वेळा दिल्लीवारी करून आले. तसेच त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीदेखील भेट घेतली होती. त्यावरून संजय राऊत म्हणाले होते की, विशाल पाटलांचे पायलट कोणीतरी दुसरेच आहेत. पायलट नेतील तिकडे विशाल पाटील जातायत. आता त्यांचं विमान गुजरातला उतरू शकतं.
प्रकाश आंबेडकर पाटलांना म्हणाले, हिंमत असेल तर अपक्ष लढा
दुसऱ्या बाजूला, विशाल पाटील यांचे मोठे बंधू आणि माजी खासदार प्रतीक पाटील हेदेखील भावाला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान, प्रतीक पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचीदेखील भेट घेतली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने सांगलीत विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, विशाल पाटील सांगलीतून अपक्ष लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणू,
हे ही वाचा >> “अटकेची शक्यता निर्माण झाल्यावर फडणवीस शिंदेंना म्हणाले, तुम्ही…”, संजय राऊतांचा दावा
प्रकाश आंबेडकर म्हणाले, प्रतीक पाटील मला भेटून गेले. त्यांनी मला विचारलं की सांगली लोकसभेचं काय करायचं? मी त्यांना म्हटलं तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. आता आम्हाला बघायचंय की त्यांच्यात हिंमत आहे की नाही. ते (प्रतीक पाटील किंवा विशाल पाटील) लढले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणू, असा आम्ही त्यांना शब्द दिलाय.
दरम्यान, विशाल पाटील अपक्ष लढल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होऊन भाजपा उमेदवार संजयकाका पाटील यांनाच फायदा होऊ शकतो. त्यामुळे नाना पटोलेंचा रोख भाजपाकडे होता का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.