तिहार तुरुंगातून अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींच्या ‘पंचाहत्तरी’चा यॉर्कर टाकून भाजपची दाणादाण उडवली आहे. नरेंद्र मोदी हे पुढील वर्षी ७५ वर्षांचे होत असून त्यांच्याजागी अमित शाह देशाचे नवे पंतप्रधान बनतील असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चव्हाण म्हणाले, केजरीवालांचा ७५ वर्षे वयाचा मुद्दा मास्टर स्ट्रोक आहे.

२०१४ मध्ये मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर, भारतीय जनता पार्टीने ७५ वर्षे पूर्ण झालेल्या नेत्यांना राजकारणातून निवृत्त करण्याचा नियम केला. त्यामुळे लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते ‘भाजपाच्या मार्गदर्शक मंडळा’त गेले. पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये मोदींना ७५ वर्षे पूर्ण होत असून भाजपाच्या नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्ती घेऊन भाजपाच्या मार्गदर्शक मंडळात जायला हवं, असं केजरीवाल म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केजरीवाल यांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. मोदींनी भाजपा नेत्यांसाठी जो नियम बनवला आहे तो नियम त्यांनादेखील लागू होतो. केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मोदी यांनी उत्तर द्यायला हवं.

‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजपाचे लोक काय म्हणतात तर मोदी त्यांचा पंतप्रधानपदाचा तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील. परंतु, खरंच ते तिसरा कार्यकाळ पूर्ण करणार आहेत का? याबद्दल स्वतः मोदींनी उत्तर द्यावं. पक्षाचा नियम पंतप्रधानपदासाठीसुद्धा लागू असायला हवा. ते पंतप्रधानपदात अडकून बसलेत का याचं त्यांनी उत्तर द्यायला हवं. त्यामुळे आम्ही आमच्या प्रत्येक सभेत ‘जवाब दो मोदी’ असं म्हणून त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आहोत.

हे ही वाचा >> “प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समोर आल्यामुळे…”, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य; आघाडी फिस्कटण्याबाबत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २७२ पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि त्यांना इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करावं लागलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टीतील इतर ज्येष्ठ मंडळी निमुटपणे मोदींना पंतप्रधानपदावर स्वीकारतील का असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे कदाचित ४ जूननंतर ते विचार करू शकतात की, मोदींची पंच्याहत्तरी येतेय तर आपण आत्ताच पंतप्रधानपदाबाबत वेगळा विचार करुया, त्यात बदल करुया. मला ठामपणे सांगता येणार नाही. मात्र असं घडू शकतं. याआधी भाजपाने पंच्याहत्तरीचा नियम लावून लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा यांना बाजूला केलेलं आपण पाहिलं आहे. परंतु, मोदी कदाचित ‘तो नियम माझ्यासाठी नाही’ असंही म्हणतील. मोदींनी यावर उत्तर द्यायला हवं.