वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा खरा चेहरा राज्यातील जनतेने ओळखला आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक, काँग्रेसचा प्रचार, महाविकास आघाडीची कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनिती यासह वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केलं. चव्हाण म्हणाले, यंदाच्या निवडणुकीत फार मोठा बदल जाणवतो. आताच्या घडीला माझं महाराष्ट्राचं जे आकलन आहे, त्यानुसार महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळतील, ही संख्या वाढू शकते. आम्ही या निवडणुकीत पाच मुद्द्यांवर भर दिला आहे. त्यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, दोन्ही प्रकारचा भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि सरकार पाडले वगैरे नैतिक भ्रष्टाचार, शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान बचाव, या मुद्द्यांचा समावेश आहे. हे सगळे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आम्हाला दिले आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील दलित समाज भाजपापासून दूर गेला आहे. या लोकांच्या (भाजपाच्या) ४०० जागा आल्या तर आपलं संविधान बदललं जाईल हे दलित समुदायाच्या डोक्यात पक्कं झालं आहे. संविधान धोक्यात आहे याची त्यांना जाणीव आहे. त्याचबरोबर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आमचं नुकसान केलं खरं, मात्र आता तसं होणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला ७ टक्के मतं मिळाली होती. मात्र त्यावेळी त्यांची असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएमशी (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाशी) युती होती. त्या युतीत त्यांना ७ टक्के मतं मिळाली होती. त्यापैकी तीन ते साडेतीन टक्के मतं कदाचित वंचितची असतील. मात्र यावेळी वंचितला ती साडेतीन टक्के मतंही मिळणार नाहीत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकांना प्रकाश आंबेडकरांचा खरा चेहरा समजला आहे. त्यामुळे यावेळी त्यांना एक टक्का मतं मिळतील की नाही याबाबत शंका आहे. महाविकास आघाडीत आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या पाच जागा देत होतो. त्यांनी त्या घ्यायला हव्या होत्या. मात्र त्यांनी त्या जागा घेतल्या नाहीत.

हे ही वाचा >> “…म्हणून आम्हाला ४०० जागा जिंकायच्या आहेत”, भाजपा नेत्याने स्पष्ट केली भूमिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार चुका केल्या आहेत. तसेच त्यांच्या भाषणांचा स्तर घसरला आहे. त्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. हे लोक ४०० पार जाणार असतील तर त्यांनी भाजपाच्या जाहिरनाम्यावर बोलावं. हे लोक काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर का बोलत आहेत? त्यांनी अद्याप भाजपाच्या जाहीरनाम्यावर एकही शब्द उच्चारलेला नाही. काँग्रेस तुमची संपत्ती काढून घेईल, अमुक करेल, तमुक करेल अशा गप्पा ते मारत आहेत. तसेच मोदी यांनी नुकतंच उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांचा उल्लेख करून जी वक्तव्ये केली आहेत ती त्यांच्याच अंगलट आली आहेत.