पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून येत्या २० फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचार शिगेला पोहोचला असताना भाजपाला मोठं ‘बळ’ मिळाल्याचं बोललं जात आहे. याला कारण ठरली आहे ती ‘दी ग्रेट खली’ म्हणून ओळख असणारा भारतीय व्यावसायिक रेसलर दलिपसिंग राणा याची राजकारणातली एंट्री. खलीनं आज भाजपामध्ये प्रवेश केला असून आत्तापर्यंत विरोधी रेसलर्सला फाईटच्या आखाड्यात चितपट करणारा खली आता राजकीय आखाड्यात भाजपाकडून प्रचार करताना विरोधी उमेदवाराला निवडणुकीत चितपट करण्यासाठी सज्ज झाला आहे!

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यानंतर भाजपात प्रवेश!

WWE सारख्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळणारा खली त्याची उंची आणि धिप्पाड देहयष्टी यासाठी ओळखला जातो. मात्र, आता हाच दलिपसिंग राणा उर्फ खली पंजाबमध्ये भाजपाकडून प्रचार करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी खलीनं दिल्लीच्या सीमारेषांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता त्यानं भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन देखील खलीनं केलं होतं.

“मी भाजपामध्ये प्रवेश घेतला याचा मला आनंद होतोय. मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेल्या कामामुळे ते योग्य पंतप्रधान ठरतात. त्यामुळे मी विचार केला की आपण देशाच्या विकासातील त्यांच्या कामाचा हिस्सा का बनू नये? भाजपाच्या राष्ट्रीय धोरणांमुळे प्रभावित झाल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया खलीनं दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००० साली खलीनं त्याच्या रेसलिंग करिअरला सुरुवात केली होती. WWE मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी खली पंजाब पोलिसात अधिकारी पदावर कार्यरत होता. त्यानंतर WWE मध्ये त्यानं जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. खलीनं हॉलिवुडमध्ये चार चित्रपटांमध्ये तर बॉलिवुडमध्ये दोन चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. २०२१मध्ये खलीचा WWE हॉल ऑफ फेमध्ये समावेश करण्यात आला आहे.