राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. ठिकठिकाणी प्रचारसभा सुरु आहेत. या सभांमध्ये राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात आताच आता रामदास आठवले यांनीही त्यांच्या कवितेतून जोरदार फटकेबाजी केली आहे.

अकोल्यात आज महायुतीची सभा

अकोल्यात आज महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे ( एकनाथ शिंदे) नेते आनंदराव अडसुळ उपस्थित होते. यावेळी बोलताना, रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर हल्लाबोल केला.

हेही वाचा – ‘मशि‍दीवरील भोंगे उतरणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही’, रामदास आठवलेंची खोचक टीका

कविता करत केलं पंतप्रधान मोदींचे स्वागत

रामदास आठवले म्हणाले, “मोदीसाहेब अकोल्यामध्ये येत आहेत. आत्ता.. मग का येणार नाही राज्यात महायुतीची सत्ता? पंतप्रधान मोदी आहेत पळणारा चित्ता, म्हणून तर गिरवत आहेत विकासाचा कित्ता”, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.

प्रकाश आंबेडकरांना पुन्हा एकत्र येण्याची साद

यावेळी बोलताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याची साद घातली. “तुकड्या-तुकड्या विखुरलेला समाज एकत्र करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी आमच्याबरोबर यावं. त्यांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावं. मी दुसरं कोणतही पद घ्यायला तयार आहे. मी त्यांना मोदींकडे घेऊन जाईल. आम्ही दोघंही एकत्र येऊ, सोबत मिळून थोडं-थोडं खाऊ,” अशा मिश्किल भाष्य त्यांनी केलं.

“कलम ३७० वरून विरोधकांवर हल्लाबोल”

“नरेंद्र मोदींना हटवू पाहणाऱ्यांना आम्ही मिटवल्या शिवाय राहणार नाही. कलम ३७० हटविण्याचा निर्णय क्रांतीकारी निर्णय आहे. मात्र, इंडिया आघाडीला काश्मिरमध्ये परत कलम ३७० लागू करायचे आहे. या देशाचे संविधान कुणीही बदलवू शकत नाही. राहुल गांधी मोदींवर संविधान बदलण्याचा आरोप करतात. मात्र, नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहेत”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Ramdas Athawale : ‘डोनाल्ड ट्रम्प आणि मी ‘रिपब्लिकन’ पक्षाचेच’, रामदास आठवलेंची मिश्किल टिप्पणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधींवरही सोडलं टीकास्र

दरम्यान, रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणात राहुल गांधी यांनाही लक्ष केलं. “राहुल गांधी आज महाराष्ट्रात फिरत आहे. त्यांनी फिरावे आणि निवडणुकीत हारावं. राहुल गांधी हे संविधान बदलणार असं सांगून दोन समाजात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही कुणाच्याही विरोधात नाही. आम्हाला देशाची अखंडता अबाधित ठेवायचं आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.