काँग्रेस पक्ष निवडून आल्यास संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील, असं विधान अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानानंतर आता काँग्रेसने आक्रमक पावित्रा घेतला असून अमित शाह आणि भाजपाविरोधात तक्रार दाखल केली आहे. प्रक्षोभक विधाने, द्वेष पसरविणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ट्वीट करत माहिती दिली.
हेही वाचा – मोदींच्या प्रचारसभा शुक्रवारपासून, योगींच्या आज तीन जाहीरसभा
काय म्हणाले रणदीप सिंह सुरजेवाला?
काँग्रेस सत्तेत आल्यास कर्नाटकात दंगळी उसळतील, असा दावा अमित शाहांनी केला आहे. तसेच काँग्रेसने पीएफआयवरील बंदी हटवण्याचे आश्वासन दिल्याचंही ते म्हणाले. अमित शाहांची ही दोन्ही विधानं द्वेष पसरविणारी आणि काँग्रेसला बदनाम करणारी आहेत. त्यामुळे आम्ही अमित शाह आणि भाजपाविरोधात बंगळुरुतील हाय कमांड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी दिली.
हेही वाचा – Karnataka : नव्वदीतही एचडी देवेगौडा उतरले प्रचाराच्या रणधुमाळीत, जेडीएसच्या विजयासाठी रणरणत्या उन्हात प्रचार
अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेरडल येथील सभेत बोलताना कर्नाटकमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास घराणेशाहीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू होईल, तसेच राज्यात दंगली होतील असा दावा केला होता. तसेच राजकीय स्थैर्यासाठी भाजपला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. भाजपाच कर्नाटकचा विकास करू शकते, काँग्रेस सत्तेत आल्यास विकास खुंटेल, राज्य मागे जाईल. तसेच तुष्टीकरणाच्या धोरणाला बळ मिळेल, असेही ते म्हणाले होते.