काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या पती रॉबर्ट वाड्रा हे अमेठीमधून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत अमेठीमधील लोक माझी नेहमी भेट घेत असतात. ते विद्यमान खासदार स्मृती इराणी यांना कंटाळले असून मी त्यांचे प्रतिनिधित्व करावे, अशी त्यांची इच्छा असल्याचे रॉबर्ट वाड्रा एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली या दोन मतदारसंघांवर काँग्रेसचे पारंपरिक वर्चस्व राहिलेले आहे. मात्र २०१९ साली भाजपाच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींचा येथून पराभव केला. तर रायबरेली येथून सोनिया गांधींचा विजय झाला. यावेळी रायबरेलीमधून प्रियांका गांधी वाड्रा निवडणूक लढवित आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, “उत्तर प्रदेशमधील अमेठी, रायबरेली आणि सुलतानपूर या मतदारसंघाने अनेक वर्ष गांधी कुटुंबावर प्रेम केले. आता अमेठीची जनता गांधी कुटुंबातील सदस्य आमचा प्रतिनिधी असावा, अशी मागणी करत आहे. जर मला निवडणूक लढवायची असेल तर ती अमेठीतूनच लढवावी, अशी मागणी अमेठीमधील कार्यकर्त्यांनी माझ्याकडे केली आहे.”
अमेठीची जनता विद्यमान खासदार स्मृती इराणी यांच्या नेतृत्वावर नाराज आहे, असेही रॉबर्ट वाड्रा म्हणाले. २०१९ साली त्यांना निवडून देऊन आम्ही चूक केली, अशी कबुली अमेठीवासी देत असल्याचेही ते म्हणाले.
राहुल गांधींची संपत्ती किती? म्युच्युअल फंड ते स्टॉक मार्केट गुंतवणूकीसह सर्व माहिती समोर
उत्तर प्रदेशमधील ८० पैकी १७ जागा काँग्रेस पक्ष लढविणार आहे. त्यापैकी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केलेले नाहीत. अमेठीमधून राहुल गांधींनी यावेळी पुन्हा एकदा निवडणूक लढवावी, अशी मागणी उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. २०१९ साली राहुल गांधी यांनी अमेठी आणि केरळमधील वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यापैकी वायनाडमधून ते विजयी झाले. यावेळीही त्यांनी वायनाड मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रायबरेलीमधून सोनिया गांधी यंदा निवडणूक लढविणार नाहीत, हे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. त्यांच्याऐवजी प्रियांका गांधी यांना रायबरेलीतून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे.
राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात, ‘या’ ठिकाणी होणार जाहीर सभा
अमेठीबाबत बोलताना रॉबर्ट वाड्रा म्हणाले, “मी माझ्या राजकीय जीवनाच्या कामाची सुरुवात अमेठीमधून केली होती. १९९९ साली प्रियांका गांधी यांच्यासह अमेठीमधेच मी काँग्रेसचा प्रचार केला होता. तेव्हापासून माझा अमेठीच्या जनतेशी संपर्क राहिलेला आहे. आजही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने अमेठीतील कार्यकर्ते माझ्या कार्यालय आणि निवासस्थानी येऊन शुभेच्छा देतात. अमेठीमध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त भंडारा आयोजित केला जातो. सोशल मीडियावरूनही माझा त्यांच्याशी संपर्क असतो.”