कोल्हापूरमधील तपोवन मैदानात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. हातकंणगलेचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सदर सभा पार पडणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेबाबत बोलताना धैर्यशील माने यांनी पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले. तर मोदी भगवान श्रीकृष्णाप्रमाणे आमचे सारथ्य करत आहेत, असे सांगितले.

काय म्हणाले धैर्यशील माने?

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला माहिती देताना धैर्यशील माने म्हणाले की, आजवर ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदींच्या सभा झाल्या, त्या ठिकाणाचे वातावरण बदलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत आणि शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा प्रचार करत असतील तर त्याचा निश्चितच फायदा होईल. तसेच याचा परिणाम महाराष्ट्रातील इतर जागांवरही दिसेल. “पंतप्रधान मोदी हे भाजपाच्या उमेदवारांची सभा घेऊ शकले असते, पण ते घटक पक्षातील उमेदवारांची सभा घेऊन एक संदेश देऊ इच्छित आहेत”, असेही ते म्हणाले.

श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करतोय

तसेच ते पुढे म्हणाले, “रथाचं सारथ्य कोण करतो, याला खूप महत्त्व असतं. भगवान श्रीकृष्ण जेव्हा स्वतःहून सारथ्य स्वीकारतात. तेव्हा अर्जुनाच्या हातात केवळ धनुष्यबाण उरतो आणि दिशा देण्याचं काम श्रीकृष्ण करतात. आज आम्ही रथावर धनुष्यबाण घेऊन उभा राहिलो आहोत. तर आमचे सारथ्य करण्यासाठी श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे.”

पंतप्रधान मोदींच्या कोल्हापूरच्या सभेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “शाहू महाराज छत्रपती यांचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांची कोल्हापूर सभेवरून टीका

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात सभा होत आहे. यावरुनच संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, “शाहू महाराज छत्रपती यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी कोल्हापुरात येत आहेत, पण जनता हे कधीही विसरणार नाही”, असा निशाणा संजय राऊत यांनी साधला.