राज्यातल्या सर्व दुकानांवर मराठी भाषेतही पाट्या असायला हव्यात, असा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं देखील शिक्कामोर्तब केलं आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील मराठी टक्का यावर देखील अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा आणि दावे-प्रतिदावे होत असल्याचं ऐकिवात आलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारादरम्यान मुंबईतील हिंदी भाषिकांविषयी आणि शिवसेनेच्या उत्तर प्रदेशसोबत असलेल्या वेगळ्या नात्याविषयी भूमिका मांडली आहे.

उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री!

संजय राऊत यांनी या प्रचारसभेत बोलताना यंदाच्या निवडणुकांनंतर उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असा दावा केला आहे. “जेव्हा मी स्टेजवर आलो, तर मला वाटलं मी मुंबईतच सभा घेतोय. राजू श्रीवास्तव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचा आहे. या धनुष्यबाणानं देशाच्या शत्रूंचा वारंवार खात्मा केला आहे. हा धनुष्यबाण घेऊन तुम्ही राज्याच्या विधानसभेत जाल आणि शिवसेनेचे पहिले मंत्री देखील व्हाल”, असं संजय राऊत म्हणाले.

“आमच्या भाषेविषयी शंका असणाऱ्यांनी मराठी….”; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला

“आम्ही जेव्हा मुंबईत फिरतो, मुंबईपासून पुण्यापर्यंत कुठेही जातो, तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात. मुंबईत म्हणाल तर अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते. त्यातही जिथे आम्ही जातो, तिथे १० पैकी ६ लोक सिद्धार्थनगरचे असतात. हे आमचं नातं आहे उत्तर प्रदेशशी”, असं देखील राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शिवसेना द्वेषाचं राजकारण करत नाही”

“शिवसेना द्वेषाचं राजकारण कधीच करत नाही. आमच्या हातात हिंदुत्वाचा भगवा आहे, पण त्यासोबत शीख, मुसलमान, ख्रिश्चनही आहेत. आम्ही देशभक्तीचं राजकारण करतो. कुणाच्या शरीरात कुणाचं रक्त आहे, हे १० मार्चला कळेल. तुमचं रक्त काय आहे, तुमच्या रक्तात काय फिरतंय ते इथली जनता १० मार्चला दाखवून देईल”, असं राऊत यावेळी बोलताना म्हणाले.