आम्ही सगळ्यांनी एकत्र काम करत आहोत. आधी देश, मग राज्य, त्यानंतर पक्ष त्यानंतर आम्ही हेच धोरण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस काम करतो आहोत. माझ्यावर आणि अमोल कोल्हेंवर बरीच टीका केली जाते आहे. मला गंमत वाटते हे सगळं पाहून कारण १५ ते १८ वर्षे आम्ही सगळे बरोबर काम करतो आहोत आणि घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत, असा टोला सुप्रिया सुळेंनी आज पुण्यातल्या भाषणात लगावला.

घटस्फोट होऊन सहाच महिने झाले आहेत तरीही

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, आमच्या विरोधात १८ वर्षांत विरोधात न बोलणारे आज आमच्याविरोधात वैयक्तिक टीका करत आहेत. मी आणि अमोलदादा कुणावरही अशी टीका करत नाही. ही निवडणूक आता महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने हातात घेतली आहे. लोकं दबक्या आवाजात फोन करतात आणि मला सांगतात मला धमकीचे फोन आले होते. पण सगळ्यांना मी सांगते जो तुम्हाला धमक्या देतो आहे ना त्याला फक्त माझा नंबर द्या. कारण ते (अजित पवार) ज्यांना दिल्लीत घाबरतात त्यांच्यासमोरच मी आणि अमोलदादा म्हणजे अमोल कोल्हे भाषण करतो आणि अगदी निडरपणे भाषण करतो. असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.

बारामती : आपल्या माणसांसमोर मन मोकळे करायचे नाही का? श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांचा सवाल

ICE ची गरज अनेकांना लागते आहे

मला माहीत आहे उन्हाळा वाढला आहे. त्यामुळे बर्फ लागतो आहे म्हणजेच ICE, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आपण रिकाम्या हातानेच जाणार आहोत. आम्हाला काही घाबरायची भीती नाही. वैयक्तिक टीका काही झालं तरीही करणार नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगते, इतके दिवस मोठ्यांचा मान म्हणून ग्रामपंचायत, कारखाना, जिल्हा परिषद , दूधसंघ यामध्ये लक्ष घातलं नाही. घरातला मोठा माणूस जर ते करतो आहेत तर त्याला मदत करावी असे संस्कार माझ्यावर आहेत. पण आता मी सगळ्यांना सांगू इच्छिते की लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल, त्यानंतर ग्रामपंचायत, कारखाना, सोसायटी, कॉर्पोरेशन ज्या निवडणुका होतील त्यात महाविकास आघाडी ताकदीने लढणार आहे. आता बरंच काय काय सांगितलं जातं आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

माझ्यावरही अमोल कोल्हेंसारखीच टीका केली जाते की मी दहा वर्षांत केंद्रातला कुठलाच निधी आणला नाही. मी विनम्रपणे त्यांना सांगू इच्छिते की माझा मराठीत असलेला कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल. तो कार्य अहवाल मी सगळ्यांना पाठवणार आहे. माझा कार्य अहवाल जर तुम्ही वाचला तर जे सगळे टीका करणारे मलाच मतदान करतील याची मला गॅरंटी आहे. ही शब्द देते म्हणून गॅरंटी आहे तसली गॅरंटी नाही. आम्ही त्यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन भाषण करणार नाही. माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.