आज लोकसभेचा निकाल लागला आहे. या निकालात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता मात्र भाजपाला २४०+ जागांवर आणि एनडीएला २९०+ जागांवर यश मिळालं आहे. मात्र काँग्रेसने ९९ जागा जिंकल्या आहेत. तर इंडिया आघाडीने जवळपास २३० ते २३५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे हा लोकसभा निवडणूक निकाल एका अर्थाने भाजपाच्या डोळ्यांत अंजन घालणारा ठरला आहे. याबाबत दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण दिलं आहे.

काँग्रेसला एक महत्त्वाची जाणीव दिली आहे

या निकालानं काँग्रेसला काय दिलं? इंडिया आघाडीचं भवितव्य राज्य पातळीवर कसं काम करेल, हा प्रश्न विचारला असता गिरीश कुबेर म्हणाले, “काँग्रेसला निकालानं काय दिलं, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण, या निकालानं काँग्रेसला आपण पक्ष म्हणून जिवंत आहोत ही जाणीव दिली. ही फार मोठी घटना आहे. कारण- गेली १५ वर्षं राहुल गांधी कसे नालायक आहेत, पप्पू आहेत, राजकारणाचं गांभीर्य नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न झाला. अख्खा देश प्रसारमाध्यमांतून आणि समाजमाध्यमांतून त्यांच्याविरोधात बोलत होता. तरीही मनाची उभारी न सोडता, हा माणूस उभा राहिला, काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा केली. राजकीय जग त्यांना मोडीत काढत होतं. मात्र राहुल गांधी उभे राहिले आणि काँग्रेसला उभारी देत राहिले. काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या, ते एक अद्भुत उदाहरण आहे, असं म्हणता येईल. ५० ते ५२ जागांवरून इतक्या जागा मिळवणं हे यश महत्त्वाचं आहे. यापुढचं देशातलं राजकारण दोन ध्रुवांचं असेल. काँग्रेस आणि भाजपा या दोन पक्षांभोवती राजकारण फिरेल. महाराष्ट्रात, हरियाणात निवडणुका आहेत; त्यात बदल होताना दिसतील. हिंदीत सांगायचं झालं तर,‘सारे जमीं पर’ असं वर्णन करता येईल.

Navneet Rana : भाजपाच्या नवनीत राणा अमरावतीतून पराभूत, बळवंत वानखेडेंचा विजय

आस्मानातून लोक आता जमिनीवर आलेत

“आम्ही आस्मानातून कधी खाली येणार नाही, असं ज्यांना वाटत होतं, ते आता जमिनीवर आले आहेत, जमिनीवरचे जमिनीवर होतेच. त्यामुळे समान पातळीवरची लढाई सुरू होईल आणि हा खूप मोठा आश्वासक बदल असेल. निर्णय घेताना भाजपाला आता विचार करावा लागेल. २०१४ मध्ये जेव्हा सरकार आलं त्यावेळी भाजपाकडे बहुमत नसतं आणि इतर पक्षांचा पाठिंबा त्या सरकारला असता, तर निश्चलनीकरणासारखा निर्णय मोदी सरकारला २०१६ मध्ये घेता आला नसता. घटक पक्ष काय म्हणत आहेत, त्यांचं ऐकावं लागेल. चांगल्या लोकशाहीसाठी ही आदर्श घटना आहे. केंद्रातलं मजबूत सरकार म्हणजे प्रगती हा समज चुकीचा आहे. जेव्हा आघाड्यांचं सरकार होतं तेव्हा आर्थिक प्रगती देशानं केली आहे,” असंही गिरीश कुबेर यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९९१ पासून देशाचं चित्र बदलण्यास सुरुवात

“१९९१ मध्ये देशाचं चित्र बदलण्यास सुरुवात झाली. एवढा मोठा देश आहे त्या देशाला काय हवं?, राज्यांना काय हवं? हे समजून घ्यावं लागतं. मी म्हणेन ती पूर्व दिशा या गोष्टींना आळा बसण्यासाठी आघाडी सरकार येणं आवश्यक होतं. ते आता साधलं जाईल असं मला वाटतं. ४०० पारचं सरकार आलं असतं तर केवळ चार राज्यांमधून ६० टक्के खासदार निवडून आले असते आणि इतर राज्यांना किंमत उरली नसती. त्यामुळे जो फुगा फुगवला गेला त्याला एक तडा जाण्याचं काम या निकालाने केलं आहे. एक देश एक निवडणूक यांसारख्या हुकूमशाही कल्पनांना आता आळा बसेल.” असंही मत गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं.