US Pacific Northwest tsunami risk काही दिवसांपूर्वी जपानमध्ये त्सुनामी येण्याची भविष्यवाणी जपानमधील बाबा वेंगाने केली होती; मात्र ती भविष्यवाणी फोल ठरली होती. आता अमेरिकेलाही याबाबतचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे ही कोणी केलेली भविष्यवाणी नसून, तो शास्त्रज्ञांनी दिलेला इशारा आहे. शास्त्रज्ञ नैसर्गिक आपत्तींबद्दल इशारा देत आले आहेत. मात्र, प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस (पीएनएएस)मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासाने या चिंतांमध्ये भर घातली आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की, अमेरिकेला लवकरच त्याच्या इतिहासातील सर्वांत विनाशकारी नैसर्गिक आपत्तींपैकी एकाला तोंड द्यावे लागू शकते. नवीन अभ्यासात नक्की काय समोर आले आहे? काय आहे ‘कॅस्केडिया थ्रेट’? अमेरिकेला नक्की कशाचा धोका? त्याविषयी जाणून घेऊयात…
अमेरिकेला नक्की धोका काय?
- कॅस्केडिया सबडक्शन झोन ३०० वर्षांपासून शांत आहे. हा झोन उत्तर व्हँकुव्हर बेटापासून कॅलिफोर्नियातील केप मेंडोसिनोपर्यंत पसरलेला आहे. त्याला उत्तर अमेरिकेतील भूकंपीयदृष्ट्या सर्वांत सक्रिय प्रदेश म्हणून ओळखले जाते.
- अमेरिकेच्या याच कॅस्केडिया सबडक्शन झोनमध्ये भूकंप येण्याची आणि त्यानंतर १०० फूट उंचीच्या लाटा येणार असल्याची भीती नवीन अभ्यासात वर्तविण्यात आली आहे.
- या आपत्तीमुळे गंभीर नुकसान होऊ शकते आणि अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियापासून कॅनडामधील ब्रिटिश कोलंबियापर्यंत अनेक ठिकाणी जीवितहानी होऊ शकते, असा धोकाही या अभ्यासात वर्तविण्यात आला आहे.

शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, मोठ्या भूकंपाच्या वेळी, जमीन काही मिनिटांत ०.५ ते २ मीटरने खाली धसू शकते. तसेच अचानक समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने पूर येण्याचा धोका वाढू शकतो. अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की, २१०० पर्यंत हा भूकंप येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तोपर्यंत पुराचा धोका असलेल्यांमध्ये लोक, इमारती आणि रस्ते यांची संख्या तिप्पट होऊ शकते. संशोधकांचे म्हणणे आहे की, भविष्यात नुकसान कमी करण्यासाठी या वाढत्या धोक्याकडे अधिक लक्ष देण्याची त्यासाठी नियोजन आखण्याची आवश्यकता आहे.
कॅस्केडिया सबडक्शन झोन म्हणजे काय?
कॅस्केडिया सबडक्शन झोन ही उत्तर कॅलिफोर्नियापासून ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि ब्रिटिश कोलंबियापर्यंत पसरलेली एक मोठी फॉल्ट लाइन आहे. याच भागात समुद्रातील जुआन डी फुका प्लेट्स हळूहळू उत्तर अमेरिकन प्लेटच्या खाली सरकतात. परंतु, या प्लेट्स सरकताना अडकतात आणि त्यामुळे मोठ्या भूकंपाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेवटचा सर्वांत मोठा भूकंप २६ जानेवारी १७०० रोजी झाला होता. भूगर्भीय नोंदींनुसार, त्याची तीव्रता ८.७ व ९.२ च्या दरम्यान होती. अशा प्रकारचा भूकंप पुन्हा येऊ शकतो, अशी भीती वर्तविण्यात आली आहे. यूएस नॅशनल सिस्मिक हॅझार्ड मॉडेलनुसार, पुढील ५० वर्षांत ८.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप येण्याची १५ टक्के शक्यता आहे.
वैज्ञानिकांनी नक्की काय इशारा दिला?
बीबीसी सायन्स फोकसशी बोलताना ‘Increased flood exposure in the Pacific Northwest following earthquake-driven subsidence and sea-level rise,’ या अभ्यासाच्या प्रमुख लेखिका प्राध्यापक टीना दुरा, “आपल्याला हवामान बदलामुळे होणारी समुद्राच्या पातळीतील वाढ ठाऊक आहे. त्यामुळे दरवर्षी तीन ते चार मिलिमीटरने समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. पण, या परिस्थितीत (कॅस्केडिया सबडक्शन झोनमध्ये भूकंप आल्यास) काही मिनिटांत समुद्राच्या पातळीत दोन मीटर वाढ होईल. त्याविषयी अधिक बोलले गेले पाहिजे.” त्या पुढे म्हणाल्या, “अमेरिकेसाठी ही निश्चितच एक अतिशय आपत्तीजनक घटना असणार आहे. हा मोठा धोका आहे. त्सुनामी येणार आहे आणि ती विनाशकारी असणार आहे. परंतु त्सुनामीमुळे काही ठिकाणी खूप मोठा फटका बसणार आहे; तर इतर ठिकाणी याचे कोणतेही गंभीर परिणाम जाणवणार नाहीत. परंतु, त्या क्षेत्रांना भूस्खलनाचे धोके असू शकतात,” असे त्या म्हणाल्या.
पाण्याची वाढती पातळी
अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दरवर्षी अनेक किनारी भाग हळूहळू बुडत आहेत. तर वॉशिंग्टन, ओरेगॉन आणि उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागांत खोल भूगर्भातील हालचालींमुळे जमिनीची उंची वाढत आहे. उत्तर कॅलिफोर्नियातील हम्बोल्ट बे येथे जमीन खाली धसत आहे. शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, २०३० पर्यंत समुद्राची पातळी जमीन जितकी वाढू शकते, त्यापेक्षा जास्त वेगाने वाढेल. २०५० पर्यंत पाण्याची पातळी १० ते ३० सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते आणि जर कार्बन उत्सर्जन जास्त होत राहिले, तर २१०० पर्यंत समुद्राची पातळी ४० ते ९० सेंटीमीटरने वाढू शकते.
भूकंप आणि त्सुनामीचे काय परिणाम होणार?
भूकंप आणि त्सुनामीमुळे रस्ते आणि आपत्कालीन सेवा पाण्याखाली जाऊ शकतात. खाऱ्या पाण्याचा शेतीच्या जमिनीवर परिमाण होऊ शकतो आणि जमीन विषारी होऊ शकते. २०२२ च्या फेमा प्लानिंग अभ्यासात भूकंपामुळे ५,८०० आणि त्सुनामीमुळे ८,००० लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात २००० हून अधिक शाळा आणि १०० प्रमुख सुविधांसह ६,१८,००० हून अधिक इमारतींचे नुकसान होऊ शकते, असेही नमूद करण्यात आले आहे. तब्बल १३४ अब्ज डॉलर्सचे नुकसान होऊ शकते, असे त्यात सांगण्यात आले आहे.
खालील पायाभूत सुविधांना धोका:
- ५ विमानतळ
- १८ आपत्कालीन सुविधा (शाळा, रुग्णालये, अग्निशमन केंद्रे)
- ८ सांडपाणी प्रक्रिया केंद्रे
- १ विद्युत उपकेंद्र
- ५७ दूषित घटकांचे स्रोत (जसे की, गॅस स्टेशन, रासायनिक केंद्रे इ.)