Rare Earth Metals Impact On Jobs: चीन-भारत यांच्यातील संबंध हे नेहमीच ताणलेले असतात. परंतु, आता मात्र चीनने घेतलेल्या एका निर्णयामुळे भारतावर भलतंच संकट ओढवण्याची चिन्हं आहेत. चीनने दुर्मीळ मूलद्रव्यांच्या निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांमुळे भारतातील ऑडिओ इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील २१ हजाराहून अधिक नोकऱ्या धोक्यात आल्याची भीती एल्सिनाने (ELCINA-उद्योग संघटना) सरकारकडे व्यक्त केली आहे. टेर्बियम आणि डिस्प्रोसियम निर्यातीवर परवाना अट एप्रिल महिन्यात चीनने टेर्बियम आणि डिस्प्रोसियमसारख्या दुर्मीळ मूलद्रव्यांच्या निर्यातीसाठी कडक परवाना अट लागू केली. हे घटक उच्च क्षमतेचे NdFeB (निओडिमियम-आयर्न-बोरॉन) मॅग्नेट तयार करण्यासाठी अत्यावश्यक असतात. त्यांचा वापर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. याविषयी ELCINA ने सांगितले की, या निर्णयामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या हिअरेबल्स आणि वेअरेबल्स क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. परिणामी, अनेक उपकरण उत्पादक आता चीनकडून पूर्णपणे तयार स्पीकर मॉड्युल्स आयात करत आहेत. त्यामुळे आयातीवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे भारतातील, विशेषतः नोएडा आणि दक्षिण भारतातील स्पीकर आणि ऑडिओ घटक उत्पादन क्षेत्रातील ५,००० ते ६,००० थेट नोकऱ्या आणि १५,००० अप्रत्यक्ष नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ९० टक्के मॅग्नेट आयात चीनकडूनच एल्सिनाच्या अंदाजानुसार, रेअर अर्थवर आधारित मॅग्नेट्स एकूण उत्पादन खर्चाच्या सुमारे ५ ते ७ टक्के भाग तयार करतात. जवळपास १०० टक्के NdFeB मॅग्नेटची गरज भारत आयात करून भागवतो आणि यापैकी ९० टक्के आयात चीनमधून केली जाते. “यातून घटकांचे उत्पादन करण्याऐवजी पुन्हा तयार वस्तूंच्या आयातीवर अवलंबून राहण्याची वृत्ती तयार होते. विशेषतः नोएडा आणि दक्षिण भारतात स्पीकर आणि ऑडिओ घटकांच्या उत्पादन क्षेत्रातील सुमारे ५,००० ते ६,००० थेट नोकऱ्या आणि १५,००० अप्रत्यक्ष नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे,” असे एल्सिनाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

इतर देशांची मॅग्नेट्स महाग आणि कमी क्षमतेची

उद्योग संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, मूलद्रव्यांच्या निर्यातीवर आलेले निर्बंध आणि प्रशासनातील अडचणी यामुळे चीनमधून येणाऱ्या मॅग्नेट्सच्या किमती वाढल्या आहेत. तसेच, जपान, युरोपियन युनियन आणि अमेरिका यांसारख्या इतर स्रोतांकडून येणारी मॅग्नेट्स ही तिपटीने महाग आहेत आणि भारताच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याइतकी क्षमता त्यांच्याकडे नाही.

उत्पादनसाखळी अबाधित ठेवण्याचे प्रयत्न

टीव्ही उत्पादन करणाऱ्या व्हिडीओटेक्स या इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेवा कंपनीने सांगितले की, दुर्मीळ मूलद्रव्यांचा वापर करण्यात आलेली मॅग्नेट्स ही विशेषतः स्पीकर्ससाठी आवश्यक असतात, तसेच टीव्ही उत्पादनात त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि छोट्या आकारामुळे त्यांना अधिक महत्त्व असते. “अद्यापही या घटकांच्या आयातीवर देश मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, त्यामुळे ही एक महत्त्वाची अडचण आहे. मात्र, टीव्ही उत्पादन क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम तुलनेत मर्यादित असेल, असे अपेक्षित आहे. येणाऱ्या हंगामासाठी पुरेशा साठ्याची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या पुरवठादारांशी सततच्या संपर्कात आहोत,” असे व्हिडीओटेक्सचे संचालक अर्जुन बजाज यांनी सांगितले.

व्हिडीओटेक्स ही कंपनी हॅव्हेल्स (लॉइड), रिलायन्स ग्रुप (बीपीएल आणि रीकनेक्ट), विजय सेल्स, टोशिबा आणि २५ पेक्षा अधिक ब्रँडसाठी टीव्ही तयार करते. “तसेच, पुरवठादारांच्या सूचनेनुसार, आम्ही फेराइट मॅग्नेट्ससारख्या पर्यायी उपायांचा सक्रियपणे शोध घेत आहोत. काही प्रमाणात तडजोड करावी लागली तरी हा समाधानकारक पर्याय ठरू शकतो. ही अडथळ्यांची परिस्थिती गंभीर असली तरी, दीर्घकालीन दृष्टीकोनातून विविध घटकांचा पुरवठा- स्रोत स्थानिक पातळीवरच निर्माण होणे महत्त्वाचे आहे,” असेही बजाज यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारकडे एल्सिनाची मागणी

चीनबरोबर भारत सरकारने थेट संवाद (G2G) करावा, अशी विनंती संघटनेने केली आहे. तसेच सेमीकंडक्टर व्यापार क्षेत्रासारख्या विशेष सवलती या उद्योगाला द्याव्यात, इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेंतर्गत स्थानिक संशोधन व उत्पादनाला चालना द्यावी आणि रेअर अर्थ मॅग्नेट्सच्या निर्मितीसाठी प्रोत्साहनपर योजनांचा विचार करावा, असेही एल्सिनाने सुचवले आहे. उद्योग संघटनेने सरकारला आवश्यक खनिजांसाठी उत्पादन- संलग्न प्रोत्साहन योजना (PLI) आणण्याची शिफारसही केली आहे.