दोन हजार किलोमीटरचा पल्ला असलेल्या अग्नी प्राइम या क्षेपणास्त्राची रेल्वेगाडीतून चाचणी भारतात २५ सप्टेंबर रोजी प्रथमच घेण्यात आली. अतिशय गुंतागुंतीच्या मानल्या जाणाऱ्या या चाचणीमुळे भारत मोजक्या देशांमध्ये जाऊन पोहोचला. अशा प्रकारे रेल्वेतून क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता हस्तगत होणे हे भारताच्या क्षेपणास्त्र सिद्धतेत मोलाची भर घालणारे ठरते. अग्नी प्राइम अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्र असून, ते भूमिगत तळावरून, रस्त्यावरून, विमानातून, पाणबुडीपाठोपाठ आता रेल्वेतूनही डागता येईल.
अग्नी प्राइम क्षेपणास्त्र
अग्नी प्राइम किंवा अग्नी पी हे अग्नी मालिकेतील सहावे क्षेपणास्त्र ठरते. हे २ हजार किलोमीटरचा पल्ला असलेले मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. संपूर्ण पाकिस्तान आणि चीनचा बराचसा भाग या क्षेपणास्त्राच्या मारकटप्प्यात येतो. द्विस्तरीय घनरूप इंधन बॅलिस्टिक प्रकारातील हे क्षेपणास्त्र आहे. ते कुपिबद्ध करून (कॅनिस्टराइज्ड) कुठेही वाहून नेता येऊ शकते. त्यामुळे क्षेपणास्त्राच्या अग्रावर स्फोटके वेगळ्याने चढवावी लागत नाहीत. शिवाय घनरूप प्रणोदकामुळे ते डागण्याचा अवधी कमी होतो. तसेच वारंवार इंधन भरण्याचीही गरज भासत नाही.
रेल्वेतून डागण्याची क्षमता वैशिष्ट्यपूर्ण
भारताचे रेल्वेचे जाळे अत्यंत व्यापक आणि विशाल आहे. त्याचा वापर करण्याचे संरक्षण मंत्रालयाने ठरवले आहे. तब्बल ७० हजार किलोमीटरच्या या जाळ्यामुळे क्षेपणास्त्र डागण्याचे भरपूर पर्याय उपलब्ध होतात. तसेच नेमके कोठून क्षेपणास्त्र डागले जाणार याचा वेध घेणे शत्रूसाठी अवघड बनते. छुप्या पद्धतीने अशी क्षेपणास्त्रे देशभर फिरवता येतील, ही बाब क्षेपणास्त्र युद्धासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या लष्करी तळांची, क्षेपणास्त्र लाँचपॅडची माहिती शत्रूराष्ट्रांना असते. परंतु रेल्वेमार्गावरील एखाद्या बोगद्यातून किंवा रेल्वेमार्गे एखाद्या क्षेपणास्त्राचे वहन होऊन पुढे ते मोठ्या ट्रकवर चढवून डागता येणार आहे. अशा अनेक बाबींमुळे रेल्वेचलित अग्नी प्राइम क्षेपणास्त्र वैशिष्ट्यपूर्ण ठरते. भारताच्या विशाल रेल्वेजाळ्याची इत्थंभूत माहिती मिळवणे शत्रूच्या टेहळणी आणि उपग्रह यंत्रणेसाठी अजिबात सोपे नाही. असे एखादे क्षेपणास्त्र डागले गेल्यानंतर त्याचा वेध घेणे शत्रूसाठी आव्हानात्मकही ठरेल.
क्षेपणास्त्र क्षमतेत मोलाची भर
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओने स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या साह्याने (एसएफसी) या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. २५ सप्टेंबर रोजी पूर्णपणे युद्धसदृश परिस्थितीमुळे त्याची चाचणी घेण्यात आली आणि ती १०० टक्के यशस्वी झाल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले. डीआरडीओ आणि संलग्न संस्था गेली काही वर्षे विविध प्रकारची क्षेपणास्त्रे आणि क्षेपणास्त्र बचाव प्रणाली विकसित करत आहेत. लढाऊ विमानांच्या बाबतीत भारतासमोर आव्हानात्मक काळ आहे. कारण मिग-२१ लढाऊ विमानांची जागा घेण्यास त्वरित तितक्या संख्येने विमाने आयात करता येत नाहीत वा निर्माण करता येत नाहीत. पण क्षेपणास्त्रांच्या बाबतीत भारत अधिक स्वावलंबी आणि सुसज्ज बनू लागला आहे याची प्रचीती गेल्या काही वर्षांतील विविध चाचण्यांमधून येते. रस्त्यावरून फिरत्या ट्रकवरून डागता येऊ शकेल असे अग्नी प्राइम क्षेपणास्त्र भारतीय लष्करात यापूर्वीच दाखल झाले आहेत. रेल्वेचलित अग्नी प्राइममुळे देशभरात कुठूनही मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र डागता येऊ शकेल. यामुळे देशाच्या प्रहारक्षमतेत मोलाची भर पडते.
आणखी किती देशांकडे क्षमता?
अमेरिका आणि पूर्वीचा सोव्हिएत महासंघ आणि आताचा रशिया या देशांनी ही क्षमता गतशतकात शीतयुद्धाच्या काळात हस्तगत केलेली आहे. मात्र सध्या दोन्ही देशांकडे अशा पद्धतीची क्षेपणास्त्रे नाहीत. चीन आणि उत्तर कोरिया यांनी हे तंत्रज्ञान हस्तगत केल्याचे सांगितले जाते. चीनकडे आंतरखंडीय क्षेपणास्त्र रेल्वेतून डागण्याची क्षमता आहे, तर उत्तर कोरिया लघु पल्ल्याचे क्षेपणास्त्र रेल्वेतून डागण्याची क्षमता बाळगून आहे.