एलॉन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सने दहशतवाद्यांकडून सबस्क्रिप्शन फी स्वीकारल्याचे एका अहवालात आढळून आले आहे. सध्या भारताने दहशतवादाविरोधात आक्रमक भूमिकेचा पवित्रा घेतला असताना दहशतवाद्यांनी एक्सचा वापर करणे हीच मूळात गंभीर बाब आहे. मोठमोठ्या टेक कंपन्यांवर देखरेख करणारी ना-नफा संस्था ‘टेक ट्रान्स्परन्सी प्रोजेक्ट’ने ही चौकशी केली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, एक्सने हिजबुल्लाहच्या काही कार्यकर्त्यांच्या आणि हुथी गटाच्या अधिकाऱ्यांच्या खात्यांमधून ब्ल्यू टिकसाठी पैसे घेणं अद्यापही सुरू आहे.
एक्सच्या सेवांसाठी पैसे देणाऱ्यांमध्ये अल-कायदाचा सल्लागार, हिजबुल्लाहचा संस्थापक, अमेरिकन सैन्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या इराकी मिलिशियाचा प्रमुख व हुथीचा एक वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असल्याचा उल्लेखही या अहवालात करण्यात आला आहे. या संस्थेच्या मते, अमेरिकेतील दहशतवादी किंवा संघटनांशी जोडलेल्या २०० हून अधिक खात्यांनी एक्सवर ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन खरेदी केले आहेत.
या संस्थेने केलेल्या चौकशीत नेमके काय आढळले, असे सबस्क्रायबर कोण आहेत आणि निधी उभारण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर कसा केला जात आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
चौकशीत काय आढळले?
टेक ट्रान्स्परन्सी प्रोजेक्ट या संस्थेला चौकशीदरम्यान असे आढळून आले की, एलॉन मस्कच्या प्लॅटफॉर्म एक्सवरील २०० हून अधिक खाती ही अल-कायदा, हिजबुल्लाह, हमास, हुथी, सीरिया व इराकमधील मिलिशिया गटांशी जोडलेली आहेत. अमेरिका सरकारने ज्या संघटनांना परदेशी दहशतवादी गट म्हणून जाहीर केले आहे, त्या सबस्क्रिप्शनसाठी एक्सला पैसे देत आहेत.
ट्रेझरी डिपार्टमेंटचे ऑफिस ऑफ फॉरेन अॅसेट्स कंट्रोल (OFAC) हे अमेरिकन कंपन्यांना परवानगी असल्याशिवाय अमेरिकन निर्बंधांखालील व्यक्ती किंवा गटांसोबत व्यवसाय करण्यास मनाई करते. महत्त्वाची बाब म्हणजे एक्सच्या स्वतःच्या नियमांनुसार OFAC निर्बंधाखालील वापरकर्त्यांना एक्सच्या प्रीमियम वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी नाही.
द इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार, यापैकी अनेक खात्यांवर आयडी व्हेरिफाइड लेबल असल्याचे अभ्यासात आढळून आले. वापरकर्त्यांनी सरकारमान्य आयडी आणि सेल्फी अपलोड केल्यानंतर हा बॅज दिला जातो. हा बॅज एक्सकडून त्या वापरकर्त्यांबाबत व्हेरिफिकेशनसाठी वापरला जातो.
त्यापैकी अनेक वापरकर्त्यांनी एक्सच्या वैशिष्ट्यांचा म्हणजेच टिप बटणाचा वापर केल्याने त्यांना पैसे मिळू शकतात.
पूर्वी ट्विटर म्हणून ओळखले जाणारा हा प्लॅटफॉर्म एकेकाळी प्रसिद्ध लोकांना निळे चेक मार्क देत होता. एलॉन मस्कने पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी त्यासाठी पैसे आकारण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता वापरकर्ते सर्चमध्ये वरच्या यादीत येण्यासाठी, पोस्ट संपादित करण्याची क्षमता वाढविण्यासाठी आणि मोठे व्हिडीओ अपलोड करण्याचा पर्याय यांसारख्या प्रीमियम सेवांसाठी पैसे देतात.
तपासात असेही दिसून आले आहे की, अमेरिकेतील दहशतवादी गटांशी जोडलेल्या २०० हून अधिक खात्यांनी या ब्ल्यू टिक्ससाठी पैसे दिले आहेत.
फेब्रुवारीमध्ये मस्क यांनी ट्रेझरी विभागावर त्यांच्या नियंत्रणाबाबत टीका केली होती. दहशतवादी गटांपर्यंत किंवा अयोग्य लोकांपर्यंत पैसे पोहोचू नयेत यावरचे नियंत्रण कमकुवत असल्याचे त्यांनी सांगितले.
नेमकी खाती कोणती?
एक्सच्या म्हणण्यानुसार, प्रीमियम खात्यांना पुनरावलोकनानंतरच चेकमार्क मिळतो, जेणेकरून सदस्यत्व घेतलेली खाती सर्व पात्रता निकष पूर्ण करतात याची खात्री होते.
टेक ट्रान्स्परन्सी प्रोजेक्टला आढळलेल्या काही खात्यांवर तोतयागिरी करणाऱ्यांची नजर असू शकते. अनेक खात्यांवर आयडी व्हेरिफाइड लेबल होते. हे लेबल वापरकर्त्याने सेल्फी आणि अधिकृत आयडी सबमिट केल्यानंतरच दिले जाते. असेच एक खाते हिजबुल्लाहचा संस्थापक व गटाचे पहिले सरचिटणीस सुभी तुफैली याचे असल्याचे दिसून येते. तो १९९५ पासून अमेरिकेच्या निर्बंध यादीत आहेत.
ऑक्टोबर २०२३ पासून सक्रिय असलेल्या त्याच्या आयडी व्हेरिफाइड खात्याचे ४०,७०० हून अधिक फॉलोअर्स आहेत आणि या खात्यावर नियमितपणे त्याच्या भाषणांचे अर्ध्या तासाचे व्हिडीओ पोस्ट केलेले असतात, असे द न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
येमेनच्या हुथी बंडखोरांशी जोडलेल्या खात्यावर एकेकाळी ब्ल्यू टिक होती. मात्र, पहिल्या टेक ट्रान्स्परन्सी प्रोजेक्ट रिपोर्टनंतर एक्सने गेल्या वर्षी हा बॅज काढून टाकला.
एका नवीन अहवालात असे म्हटले आहे की, नंतर काळातही किमान पाच वरिष्ठ हुथी अधिकाऱ्यांनी एक्सवर चेकमार्कसाठी पैसे दिले. या खात्यांमध्ये ज्यांचे एकत्रितपणे ८,२०,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, त्यात हुसेन अल-एझी नावाचे एक खाते समाविष्ट आहे. ज्याची ओळख हुथींचे उप-परराष्ट्रमंत्री म्हणून झाली आहे. त्याबाबत एक्सला या खात्याची पुन्हा पडताळणी करण्यास सांगण्यात आले आहे.
यापैकी काही खात्यांच्या वापरकर्त्यांनी निधी उभारण्यासाठी एक्सचा वापर केला. त्यांनी एक्सच्या टिपिंग आणि सबस्क्रिप्शन टूल्सचा वापर केला. तसेच त्यांच्या अनुयायांना क्रिप्टोकरन्सी लिंक्सद्वारे निधी पाठविण्यास सांगितले.
टेक ट्रान्स्परन्सी प्रोजेक्टचे नेतृत्व करणाऱ्या केटी पॉल यांनी द न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले की, “या गटांनी एक्सद्वारे नफा मिळवला आणि निधी उभारला याचे स्पष्ट पुरावे आहेत. त्यांना एका कारणासाठी मंजुरी देण्यात आली आणि त्याच वेळी संघराज्य सरकारमध्ये इतक्या प्रभावी आणि शक्तिशाली असलेल्या एखाद्या व्यक्तीने या नियुक्त दहशतवादी गट आणि व्यक्तींकडून नफा मिळविणे ही वस्तुस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.”
संघटनेच्या पहिल्या अहवालानंतर काय झाले?
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये टेक ट्रान्स्परन्सी प्रोजेक्टने पहिल्यांदाच एक्सवर प्रीमियम सेवा वापरणाऱ्या मंजुरी असलेल्या गटांबाबत चिंता व्यक्त केली. अहवाल बाहेर आल्यानंतर काही तासांतच, एक्सने उल्लेख केलेल्या सर्व खात्यांमधून चेकमार्क काढून टाकले आणि नंतर त्यापैकी अनेक खाती तात्पुरती बंद केली आहेत. असे असूनही द न्यूयॉर्क टाइम्सच्या मते, एका महिन्याच्या आत यापैकी अनेक खात्यांनी पुन्हा निळे बॅज खरेदी करण्यात यश मिळवले आणि तेव्हापासून ते कायम आहेत.