राज्यातील सर्वच औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेपासून प्रदूषण होऊन त्याचा प्रकल्पाच्या परिसरातील गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: वायुप्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनासह इतरही आजाराची बाधा होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. राज्यात हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
राज्यात औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प किती?
राज्यात महानिर्मितीचे सात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प असून त्याची एकूण वीजनिर्मिती क्षमता १० हजार २०० मेगावाॅट आहे. सर्वात मोठा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यात असून त्याची क्षमता २ हजार ९२० मेगावाॅट आहे. येथे २१० मेगावाॅटचे २ आणि ५०० मेगावाॅटचे ५ असे एकूण ७ वीजनिर्मिती संच आहेत. कोराडीत ६६० मेगावाॅटचे ३ संच आणि २१० मेगावाॅटचा १ संच असे एकूण चार वीजनिर्मिती संच आहेत. त्यांची एकूण वीजनिर्मिती क्षमता २ हजार १९० मेगावाॅट आहे. नाशिकला २१० मेगावाॅटच्या ३ संचाची वीजनिर्मिती क्षमता ६३० मेगावाॅट आहे. भुसावळला २१० मेगावाॅटचा १ संच, ५०० मेगावाॅटचे २ संच आणि ६६० मेगावाॅटचा १ संचाची क्षमता १ हजार ८७० मेगावाॅट तर पारसमधील २५० मेगावाॅटच्या दोन संचाची क्षमता ५०० मेगावाॅट आहे. परळीत २५० मेगावाॅटच्या तीन संचाची क्षमता ७५० मेगावाॅट तर खापरखेड्याला २१० मेगावाॅटचे ४ संच, ५०० मेगावाॅटच्या १ संचाची वीजनिर्मिती क्षमता १ हजार ३४० मेगावाॅट आहे. राज्यात अदानी, इंडिया बुल्ससह इतरही खासगी कंपनीचे काही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प आहेत.
प्रकल्पनिहाय कोळशाचा वापर किती होतो?
महानिर्मितीच्या कोराडी प्रकल्पात २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६९.५ लाख मेट्रिक टन, खापरखेडा प्रकल्पात ९६.६ लाख मेट्रिक टन, चंद्रपूर प्रकल्पात १२९.५ लाख मेट्रिक टन, नाशिक प्रकल्पात २४.९ लाख मेट्रिक टन, भुसावळ केंद्रात ६०.९ लाख मेट्रिक टन, परळी केंद्रात २१.६ लाख मेट्रिक टन, पारस केंद्रात २७.१ लाख मेट्रिक टन कोळशाचा वापर झाला. साधारण एवढाच वापर प्रत्येक वर्षी होतो.
प्रकल्पातून निघणाऱ्या राखेचे प्रमाण किती?
वीजनिर्मितीदरम्यान प्रतिटन कोळशाच्या वजनाच्या तुलनेत ३० ते ४० टक्के राख तयार होते. २०२३-२४ या वर्षात नाशिकच्या प्रकल्पातून १०.१ लाख मेट्रिक टन, भुसावळला २२.८ लाख मेट्रिक टन, परळीला १२.१ लाख मेट्रिक टन, पारस केंद्रात १०.६ लाख मेट्रिक टन, कोराडीला २६.७ लाख मेट्रिक टन, खापरखेड्याला ३५.८ लाख मेट्रिक टन, चंद्रपूरला ४८.९ लाख मेट्रिक टन राख तयार झाली. प्रत्येक वर्षी साधारण एवढीच राख तयार होते.
राखेचे आरोग्यावर कोणते परिणाम?
वीज प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राख हवेमुळे वातावरणात पसरत असल्याने तिचे आरोग्यावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी आणि खापरखेडासह, चंद्रपूर आणि इतरही औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाच्या परिसरातील १० किलोमीटर परिघात राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे आजार होत असल्याचे निरीक्षण श्वसनरोग तज्ज्ञांकडून नोंदवले जाते. या प्रकल्पातून सल्फर डायऑक्साइड आणि सूक्ष्म कण (फ्लाय ॲशसह) मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात, जे श्वसनाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये सतत खोकला, दमा, घशाचे आणि डोळ्याच्या संसर्गाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळतात. या समस्या दीर्घकाळ टिकतात. राखेचे सूक्ष्म कण आणि वायू श्वसनमार्गात जळजळ निर्माण करतात, दमा रुग्णांचे त्रास वाढतात आणि नवे रुग्ण सापडतात. विशेषतः मुलांमध्ये. दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास फुप्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकाराचा धोकाही वाढतो. तर या भागात दमा, सीओपीडी, श्वसन संक्रमण, हृदयविकार आणि अकाली मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे निरीक्षण नागपुरातील सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ आणि विदर्भ हाॅस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट यांनी नोंदवले आहे.
राखेमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे धोके कोणते?
औष्णिक विद्युत प्रकल्पातून उडणारी राख परिसरातील १० किलोमीटरहून अधिक परिसरातील शेतातात, जमिनीवर, पाण्यात जाते. त्यामुळे पाण्यात पाऱ्याचे प्रमाण वाढते, आर्सेनिक, ॲल्युमिनियम, लिथियम यांसारखे घटक मिसळत आहेत. त्यामुळे या परिसरातील पाणी असुरक्षित होत आहे. तर परिसरातील विहिरी आणि कालव्यांचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचेही काही भागात आढळून आले आहे. पाण्याची चव बदलते आणि त्याला रंग येतो. या पाणीप्रदूषणामुळे त्वचेचे आजार आणि दीर्घकालीन धोकादायक परिणाम होऊ शकत असल्याचेही डॉ. अरबट यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्या?
अन्न, पाणी, हवा आणि मातीचे प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच स्थानिक समुदायांच्या चांगल्या आरोग्यासाठी औष्णिक प्रकल्पातील राखेचा १०० टक्के वापर होणे आवश्यक आहे. सर्वच वीजनिर्मिती संचाला फ्लू गॅस डिसल्फरायझेशन यंत्रणा (एफजीडी) बसवणे, जेणेकरून प्रकल्पातून निघणारे प्रदूषण कमी होऊ शकेल. १०० टक्के राखेचा वापर साध्य करण्यासाठी कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाईची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे, हरितगृह वायू उत्सर्जन, नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास, जागतिक तापमानवाढ इत्यादी लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी जीवाश्म इंधनावर आधारित ऊर्जास्रोतांचा अक्षय आणि स्वच्छ ऊर्जास्रोतांच्या स्वरूपात पर्याय शोधणे गरजेचे आहे. औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प परिसरात उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून तेथे मुखपट्टीसह इतरही प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.